दिवाळी अंकासठी न निवडलेले धागे इथे पेस्ट करत आहे. कोणीतरी ५ तारखेपर्यंत लेखकाना घेत नाही म्हणून कळवा.
१) या ग्लोबल शहरात [कविता] शामल गरुड
Primary tabs
द्रश्य(active tab) संपादन What links here
प्रेषक, दिवाळी अंक, Thu, 29/10/2015 - 21:19
एखादी सल सादळून जाते आतल्या आत कुठेतरी
मग येवू लागतो वास कुजून नासून आंतर्बाह्य
उगाच पोकळी,अवकाश सारखे जड शब्द वापरुन
कशाला करायचा वाड:मयीन भंकसपणा ?
रोजच्या जगण्यात न आवडणारी नातीही सांभाळतोच
त्यातली विशविशीत बेंड न फोडताही
अगदी तशीच सल या शहरातल्या एकटेप्णाविषयीची
कितीही गर्दीतून फिरुन आलो तरी उंबरठ्यापर्यंत सोबत येणारी
मॉल मधून भरगच्च ट्राली भरल्यानंतरही
विकएंड घराबाहेर साजरा केल्यानंतर
ही सल शरीराआत पसरत जाते कंटाळ्यासारखी
इथं भाकरीसोबत न संपणारी स्वप्नही फुकटच मिळतात
आपण आपलं गाव वेस सोडून येतो इथं
पण नाही लपवता येत चेह-यावरचं पोरकेपण
सतत भयही सोबत असतं मातीचे पाय विरघळ्याचे
या शहराची ओळखच आता गर्दी आहे
एलिट-कॉर्पोरेट-बिजनेस-क्रियेटीव्ह आणि मिडल क्लास मधे विभागलेली
त्यांच्या डियो पासून चड्यांपर्यंतचे ठरलेले ब्रांड
त्याचे वेस्टन-सेंट्रल-हार्बर प्रवासही नित्याचेच
त्यांची कळपाची संस्कृतीही एकच
उरलेले राहतात सडलेल्या झोपड्यांमधे आणि पुलाखाली
जगण्याची खाज म्हणून करतात सारंच उघड्यावर
यांच्यापैकी कोणाचेच मानववंशीय जैविककणं
सापडणार नाहीत कुठल्याच उत्खनात !
कारण हे शहर आधुनिक रोज नव्या गरजांसोबत जातं वाढतं
इथं जागतिकीकरणाचीही आय-माय प्रथं इकडंच येऊन
बदलून जाते लुगडं
मग गिरवतो आम्ही त्यांच्या फॆशनची सिग्नेचर स्टाईल !
अजबच हे शहर,
भाकरी देतं पण एकटेपणाच्या जळमटाचं जाळ
विणून ठेवतं अंगभर
या सादळलेल्या जखमेचं कुरुप होवू नये एवढंच
वाटतं मनोमन
पण हल्ली इथल्या गर्दीच्या जथ्थ्याकडे बघतांना माझा
पान्हा येतो ओथंबून करुणेनं
इथल्या महागड्या ग्लोबल बाजारात सामान्य-मध्यमवर्गीय माणूसही धावत असतो ट्राली घेऊन इतरांबरोबर
स्वत:चं डेबीट कार्ड स्वाईप करतांना तोही होतो मगरुर
चिमुटभर मास चढतं त्याच्याही डोळ्यांवर
फक्त मला दिसत नाहीत विकणा-यांचे चेहरे
दिसतात फक्त त्यांचे लांबच लांब डगले, ज्यात असतात असंख्य खिसे
त्या साल्यांच्या हसण्याचा अदृश्य आवाज मला ऐकू येत राहतो आभाळभर
आमच्या वितभर पोटाच्या खळगीसाठी ते देतात एकावर एक
कित्येक गोष्टी फ्री
त्यांनी वाढवल्या इथल्या भूका....पोटासह पोटाखालच्याही
आता या महाभारपेठेत सारंच काही मिळतंय
फक्त मिळत नाही तो
इथल्या एकटेपणाच्या सादळलेल्या जखमेवरचा मलम
आताही देशी जखम हळदीच्या चिमटीने सहज बसेल
इतकी छोटीही राहिलेली नाही.
हे शहर हळूहळू पोसत जातं आपल्या आत गुबगुबीत अल्सेशन कुत्र्यासारखं
फक्त इथे गुरगुरता येत नाही
शहर दिवसेंदिवस चकाकतंय आणि कधी कधी मी आतल्या आत
होत जाते आदीम.
बाईपणाच्या जेनेटीक गुंतावळीत अडकून भोवळ्ते
खैबर खिंडीच्या दाराची कडी लावायला विसरुन या शहराच्या गर्दीत येवून
बेमालुमपणे मिसळते
पण इथेही येत राहतो वास मला घुसखोरांचा
त्यांच्या बदललेल्या कपड्यांचा
माझ्या मातृसत्ताकावर त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या
नाही पुसल्या जात कुठल्याच खुणा
हल्ली म्हणे हेच लोक पुरोगामी असल्याचे मुखवटे होवून फिरायलेत
निपित्तर अवलादीचे आमच्या लागवडीच्या झाडावरच घेत आहेत संशय
मूळ मातीतल्या आमच्या इतिहासाचे पानच करताहेत गहाळ
यांच्या आयातीच्या शाईला असतो खोटा उग्र वास
कितीही टेक्नोसॆवीचा आव मिरवला तरीही
नाही पुसला जात कुठलाही इतिहास
कळतच नाही माझ्या तीक्ष्ण इंद्रियांचे काय करायचे
मेंदूभर चालू असतं सतत उत्खनन
मॆकडोनाल्डचा बर्गर खात असो किंवा डॉमिनोजचा पिझ्झा
माणसांच्या भाकरीसाठीच्याच लढाया मला मोठ्या वाटतात
कधी कधी माझ्यातला विद्रोह नॆचरलच्या आईस्क्रीम सारखा
जरी विरघळत राहिला तोंडातल्या तोंडात
तरी माझे पाय मोर्चाचीच वाट बघत असतात
या शहरातल्या अफाट गर्दीतही
माझ्यातळी चळवळ एका जिवंत काडतुसासारखी आतल्या
आत असते धगधगत
बाबा, तुझ्या विचारांचा श्वासच मला इथं तगवत असतो
या पृथ्वीतलावरच्या शेवटच्या माणसालाही करुणेने
बघण्याची आर्तता तू बांधली पदरी
भाकर आणि माणसातलं चिरंतर नातंच इथं मोथं
आता हे महानगर वाढू दे कितीही बरकतीने
किंवा रुतू दे एकटेपणाची सल माझ्या हाडा-हाडांत
येऊ दे विंडोज कितेही मोठ्या आकड्यांचे
किंवा पसरु दे टेक्नोसॆवी जाळं इथल्या संस्क्रुतीच्या खोल मुळाशी कितीही
मात्र या ग्लोबवर माणसापेक्षा
काहीच मोठं होवू शकणार नाही.
- शामल गरुड
ई-५, प्राध्यापक सहनिवास,
मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी परीसर,
कलिना, सांताकृझ (पूर्व), मुंबई -९८
___________________________________________________
२) जेव्हा तान्ह्याबाळाला वाचा फुटते (श्रीकृष्ण सामंत)
Primary tabs
द्रश्य(active tab) संपादन What links here
प्रेषक, श्रीकृष्ण सामंत, Wed, 28/10/2015 - 09:53
जेव्हा तान्ह्याबाळाला वाचा फुटते.
पान्हा गाईचा आणि आईचा.
अग आई,मला तान्हाबाळच राहू दे.मला नाही जास्त मोठं व्हायचं.आणि आई तू पण नको मोठी होऊस. मोठं अगदी खोटं असतं आई.
रोज सकाळीच तू मला मागच्या पडवीत गोधडीवर धोपटं टाकून झोपवतेस.आणि आजी दुधाची चरवी घेऊन कपिलेचं दुध काढण्याच्या तयारीत असते.त्यावेळी तू तिला मदतही करीत असतेस.नंतर आजी, तान्ह्याचं दावं सोडून,कपिलेकडे जायला मोकळं करीत असते.मला माहित आहे,कपिलेला पान्हा फुटावा म्हणून हे सगळं आजी करीत असते.कपिलेचं थोडं दुध पिऊन झाल्यावर पुन्हा आजी बळेच तान्ह्याला दूर ओढत नेऊन पुन्हा दाव्याला बांधते.मग आजी चरवीतलं पाणी कपिलेच्या आंचळावर मारून ती धुऊन झाल्यावर कपिलेचं दुध काढीत बसते.
मला नाही आवडत आजी.
चरवी भरून दुध काढून झाल्यावर तान्ह्याला पुन्हा मोकळं करून सोडते.शेपूट वर करून आनंद दाखवित, किती ढूम ठोकत ते आपल्या आईचं दुध प्यायला तिच्या जवळ जातं.
आता मला आजी आवडते.
तान्ह्या कपिलेला किती लुचत असते.मधुन मधून ती कपिलेला ढुसक्यापण मारते.कपिला तिला पाजत असताना आपल्या जिभेने तान्ह्याचं अंग चाटून तिला प्रेम करीत असते. तान्ह्यापण आपली शेपूट वर करून किती आनंद होतो ते दाखवीत असते.दोघं एकमेकाच्या आनंदात सहभागी होतात.
आई,हे मुके प्राणी असले तरी त्यांचं मुकं प्रेम किती सूचक असतं.त्यांना तुझ्यासारखे हात कुठे आहेत पण प्रेम कसंही सुचवता येतं ना?
त्या मुक्या प्राण्यांचा हा मुका आनंद किती निरागस असतो.हे सर्व मी धोपट्यावर झोपलो असताना पहात असतो.
आई,मला भूक लागली की मी रडून आकांत करतो.जोराने माझ्या लाथा आणि हात हलवतो. आजी म्हणते, रडूदेत त्याला तेव्हडाच त्याचा व्यायाम होईल.
मला आजी नाही आवडत.
पण जेव्हा तुला म्हणते,” जा,भूक लागली असेल त्याला पाज.”तेव्हा मला आजी आवडते.
तू हातातलं काम टाकून माझ्याकडे येतेस.मला माहित आहे माझ्या रडण्य़ाने तुला पण कपिलेसारखा पान्हा फुटलेला असतो.मला पटकन जवळ घेऊन पाजायला लागतेस.त्यावेळी तू मला किती आवडतेस. तान्ह्या सारखा आनंद दाखवायला मी पण माझे पाय हलवत असतो.तान्ह्यासारखं तुला लुचतो.कधी कधी तुला चावतो पण.
"हाय रे!”
असं म्हणून तू माझ्या कुल्ल्यावर चापटी मारतेस.खूळा अपमान झाला म्हणून मी पण खूळ्यासारखा रडतो.मग तू मला आणखी जवळ घेतेस.हे मला खूप आवडतं ग,आई.मला नाही मोठं व्हायचं.तू पण नको मोठी होऊस.
तू मोठी होत गेलीस की एक दिवस म्हातारी होणार.मला तुला अशी पहायला नाही आवडणार. तुझा छळ झालेला मला आवडणार नाही.आई,ह्या व्यवहारी जगात सूख अगदीच कमी आहे.दुःख मात्र भरभरून आहे. तुझे केस पिकलेले असणार,त्तुझे गुढघे दुखत असणार.आई वार्धक्य खूप वाईट असतं.मला ते पाहून सहन होणार नाही.
आई,हे सर्व तुला माहित आहे पण तू माझ्यासाठी जगणार आहेस,मोठी होणार आहेस.
पण मला नाही मोठं व्ह्ययचं.आई,तू पण नको मोठी होऊस.
"आ" "ई" हे दोनच स्वर मला आवडतात.आई एव्हडच बोलायला मला आवडेल.आई ह्या शब्दात किती अर्थ भरला आहे."आ"काशासारखी मोठी आणि "ई"श्वरासारखी महान माझी आई.दुसरे स्वर मला नाही आवडत.
उ,ऊ हे दुःख झाल्यावर रडण्याचे स्वर.
ए,ऐ हे खडसावण्यासाठी,खेकसण्यासाठी वापरलेले स्वर.
ओ,औ हे फुकाचा मान देण्यासाठीचे स्वर.
अं,अः हे खोटा आनंद दाखवण्याचे स्वर.
व्यंजनं तर मला मुळीच आवडत नाहीत.आणि ती वापरून केलेल्या बाराखड्या सुद्धा.
"आई" ह्या पवित्र शब्दाला ह्या व्यंजनातल्या बाराखड्यांचा वापर करून ह्या मोठ्या झालेल्यानी आईवरून शिव्या केल्या आहेत.किती अश्लिल,किती असभ्य आहे हे जग.
अशा ह्या जगात मला नाही मोठं व्हायचं.आई,तू पण नको मोठी होऊस.
आई,तुझ्या उबदार मांडीवर झोपायला मला आवडतं.मला झोप यावी म्हणून तू मला थोपटतेस. माझ्या नाजूक टाळूवर तू तुझ्या नाजूक बोटाने तेल लावतेस.माझ्या इवल्याश्या भुंवयावरून हात फिरवतेस.मला झोप यावी म्हणून तू अंगाई म्हणतेस.मला झोप यावी म्हणून अंगाईच्या तालावर तुझी मांडी हलवतेस. मी तुझ्याकडे आणि तू माझ्याकडे टकमक पहात असतेस. मांडीवरच्या उबेत मी झोपतो.मी किती सुरक्षित असतो तुझ्या मांडीवर.
मोठा होऊन अलिशान पलंगावरच्या उबदार गाद्यावर लोळताना मिळणारं सूख तुझ्या उबदार मांडीच्या सुखाशी बरोबरीचं होईल का?
मला नाही मोठं व्हायचं.आई,तू पण नको मोठी होऊस.
"स्वरूप त्याचे किती मनोहर
रती मदनाहूनी किती तरी सुंदर"
हे देवाला उद्देशून तू म्हणतेस.
मी त्या देवाला पाहिलं नाही.पण माझ्या आई इतका सुंदर तो खचित नसणार.
"ममतेने भरती नयन जिचे
देवमुर्ती पहाण्याची काय जरुरी?
अगं,आई
कमलमुखी तूं सुंदर असतां
रुप "देवाचे" कसे वेगळे?
नसेल पाहिले त्या देवाला जरी
परि पहाण्याची असे काय जरूरी
अगं,आई
कमलमुखी तू सुंदर असता
रुप देवाचे कसे वेगळे ?"
"तुझ्या उदरातून येण्याचा प्रथम क्षण
नऊ महिने केलेस ज्यातून माझे पोषण
तो दुवा तुझा नी माझा कापिते सुवीण
विसरून जाईन कदाचित तुझी आठवण
म्हणुनच ठेवली का गं आई!
ही माझ्या उदरावर कायमची खूण?”
आई, मला आता गाई येते.
"निज निज माझ्या बाळा-----"
हे अंगाई-गीत म्हण.मी निवांत झोपेन.
पण परत तुला मी सांगतो.मला नाही मोठं व्ह्यायचं.आई,तू पण नको मोठी होऊस.
_______________________________________
स्वगृह » पुणे ते ठाणे व्हाया सातारा. [मनमोहन रोगे]
पुणे ते ठाणे व्हाया सातारा. [मनमोहन रोगे]
Primary tabs
द्रश्य(active tab) संपादन What links here
प्रेषक, दिवाळी अंक, Sat, 24/10/2015 - 10:20
पुणे ते ठाणे व्हाया सातारा.
डॉ. प.वि. वर्तक हे पुण्यातील नामवंत सर्जन आणि अद्वितीय संशोधक. त्यांचे काही ग्रंथ वाचल्यावर, २००७ साली त्यांची प्रत्यक्ष भेट झाल्यावर २००९पासून त्यांच्या वाढदिवसाला मी आणि माझा मित्र आशिष अशोक पडवळ नेहमी त्यांना भेटायला जातो. २००९मध्ये वाढदिवसाला किंवा त्यानंतर अध्येमध्ये दोन तीन-वेळा डॉक्टरांना भेटल्यावर थोडेफार पुणे फिरल्यामुळे २०१०च्या वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यावर कुठेही फिरायला नको, म्हणून मिळेल ती गाडी पकडून लवकर मुंबई गाठायची होती.
एरवी आम्ही नेहमी ठाण्यावरून ६:१३ची इंद्रायणी एक्स्प्रेस पकडून दुपारी पुण्याहून १५:३०च्या डेक्कनने मुंबईत यायचो. पण त्या दिवशी काहीच काम नसल्याने आशिष म्हणाला, "माझा एक मित्र मार्केटिंगच्या निमित्ताने आठवड्यातून दोन वेळा पुण्यात येतो. त्यामुळे त्याला सगळ्या गाड्या माहीत आहेत. त्याला फोन करतो." त्याने मित्राला फोन लावला व म्हणाला, "लवकर चल, १२:५०ची कुठलीतरी एक्स्प्रेस आहे." गाडी चुकू नये म्हणून आम्ही शिवाजीनगर-शनिवार वाडा येथून रिक्षाने पुण्याला आलो. तिकीट घेऊन पुलावर आलो, तर 'फलाट क्रमांक दोनवर कोयना एक्स्प्रेस (सीएसटीकडे जाणारी) येत आहे' अशी घोषणा झाली व काही मिनिटातच गाडी आली. आम्हाला मस्त बसायला ऐसपैस जागा मिळाली. गर्दी अजिबात नसल्याने आम्ही दोघेही निवांत बसलो व डॉक्टर वर्तकांबद्दलच्या गप्पांत रंगून गेलो. गाडी जिथे जिथे थांबत होती, तिथे तिथे आम्ही बाहेर बघत होतो, पण स्थानके अपरिचित दिसत होती. मी एक-दोनदा तसे म्हणून दाखवले, पण आशिष म्हणाला, "तू टेन्शन घेऊ नकोस. माझा मित्र नेहमी येतो. त्याने सांगितलंय, २-३ वाजताच्या सुमारास गाडी कर्जतला पोहोचेल, तिथे उतरा. कारण ती गाडी कर्जतहून पनवेलला जाईल व तिथून पुन्हा कल्याण करून पुढे जाईल. तुम्ही कर्जतवरून लोकलने जा." तरीही मी समोरच्या माणसाला विचारून गाडी सीएसटीला जाणार असल्याची खातरी करून घेतली. सगळीच अनोळखी स्टेशने, त्यात दीड-दोन तास प्रवास करूनही लोणावळा न आल्याने मी आशिषकडे संशय व्यक्त केला. अडीचच्या सुमारास त्याने मित्राला फोन लावला. त्या दोघांच्या बोलण्यावरून काहीतरी घोळ झाल्याचे माझ्या लक्षात आले.
मित्राने आशिषला १२:५० वाजताची पुण्यावरून मनमाड-मुंबई सीएसटी गाडी सांगितली होती. आशिषने स्टेशनात आल्यावर कोयना सीएसटी ऐकली व तिथेच घोटाळा झाला. आता मी माझ्यासमोरच्या माणसाला विचारले, "ही गाडी कुठे जाणार?" तो प्रवासी म्हणाला, "कोल्हापूरला." "अरे, तुम्ही तर मघाशी म्हणालात सीएसटी म्हणून!" "हो ना! मग सीएसटीलाच जाणार." जरा राग आवरतच मी पुन्हा प्रश्न केला, "अहो, कोल्हापूरला जाणार आणि सीएसटी काय सांगताय? तुम्ही सीएसटी म्हणालात म्हणून आम्ही आतापर्यंत शांत बसलो." तो प्रवासी तितक्याच शांतपणे म्हणाला, "सीएसटी माहीत नाही होय तुम्हास्नी? सीएसटी म्हणजे छत्रपती शाहू टर्मिनस!"
मला आणि आशिषला हसावे की रडावे ते कळेना. आम्हाला सीएसटी म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस इतकेच माहीत होते. आता उतरायचे कुठे आणि ठाण्याला पोहोचायचे कसे, हा प्रश्न पडला. गाडीतील दुसर्या एका माणसाने आमची अडचण ओळखून सांगितले की आता १०-१५ मिनिटांनी सातारा स्टेशन येईल, तिथे उतरा. तिथून तुम्हाला ट्रेन, लक्झरी किंवा एसटी मिळेल. सातारा स्टेशन म्हटल्यावर मला आमच्या वि.रा. भोसलेंची आठवण झाली. माझ्या कार्यालयात तीन-चार जण सातार्याचे होते. त्यांच्यापैकी वि.रा. भोसले खूप फिरणारा माणूस होता. गमतीत त्याला आम्ही 'वि.रा. आणि कुठेही फिरा' असे म्हणत असू. आज मात्र आम्हीच 'कुठेही' फिरत होतो. मी विराला फोन लावला. "बोला राजे, मी मुंबईत नाहीये. आज दुपारीच सातारला आलोय." विरा म्हणाला. मी म्हणालो, "बरंच झालं, मी ही दहा मिनिटात सातार्याला पोहोचतोय." त्याला गंमत वाटली, पण मी त्याला झालेली हकीकत थोडक्यात सांगितली व स्टेशनला येतोस का म्हणून विचारले. तो स्टेशनपासून दहा मिनिटांवर राहत होता. तसे त्याचे गाव वाईजवळ, पण शिक्षणामुळे तो इथे राहत असे. आमच्या सुदैवाने तो थोड्या वेळापूर्वीच सातार्यात आला होता. भोसले स्टेशनवर आम्हाला भेटला. आम्हाला दोघांना त्याने मोटरसायकलवर बसवून आपल्या घरी नेले. त्या दिवशी भारत-पाक वन डे चालू होती. ती बघत चहापाणी झाल्यावर त्याने आम्हाला एसटी स्टँडवर सोडले.
तो थांबत होता, पण त्याला मॅच बघायची असेल म्हणून मीच जा असे सांगितले व पुन्हा फसलो. पुढे तासाभरात मुंबई-ठाण्याच्या तीन-चार एसटी जाऊनही आम्हाला जागा मिळेना. कंडक्टर फक्त रिझर्वेशनवाल्यांनाच आत घेत होता. मी पुन्हा विराला फोन केला. तो म्हणाला, "कंडक्टरला मुंबई पोलीस सांगा आणि सीट नंबर १,२वर बिनधास्त बसा." जरा वेळाने मुंबई गाडी आली. मी वाहकाला मुंबई पोलीस असे सांगितल्यावर त्याने विचारले, "रिझर्वेशन केलंय का? असेल तर बसा." आम्ही रिझर्वेशनच्या खिडकीवर गेलो असता खिडकी बंद दिसली. तिथे असलेल्या हमालांनी आम्हाला पहिल्या मजल्यावर संगणक कक्षात पाठवले. तिथे मुंबई पोलीस असे सांगून दोन तिकिटे आरक्षित केली व नंतरच्या ठाणे गाडीत बसलो.
नाही म्हणायला सातारा स्टेशनवर अर्धा अर्धा किलो कंदी पेढे घेतले. सातारचे कंदी पेढे घ्यायला आम्हाला पुण्यावरून सातार्याला जावे लागले. तिथून पुन्हा पुणेमार्गे ठाण्याला आलो. रात्री १२:३० वाजता वंदना टॉकीजजवळ उतरलो. तो दिवस होता रविवार २७ फेब्रुवारी २०१०चा. एका इंग्लिश शॉर्टफॉर्मने - सीएसटीने - आम्हाला इतके फिरवले. हा प्रसंग ज्यांना ज्यांना सांगितला, ते हसले. फसगत झाली खरी, पण तो दिवस कायम स्मरणात राहील. आणि सीएसटी म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी टर्मिनस नाही, हेही.
लेखक - मनमोहन रोगे.
ठाणे.
९८६९१ ८०९५८
________________________________________
४)तुझ्या रूपाने [अमर]
Primary tabs
द्रश्य(active tab) संपादन What links here
प्रेषक, दिवाळी अंक, Sat, 24/10/2015 - 10:10
तुझ्या रूपाने
प्रेमाला एक नाव भेटलंय तुझ्या रूपाने
प्रेमाला एक गाव भेटलंय तुझ्या सहवासाने
प्रेमाला एक रूप भेटलंय तुझ्या दिसण्याने
प्रेमाला एक गंध भेटलाय तुझ्या असण्याने
प्रेमाला एक भाषा भेटलीय तुझ्या शब्दाने
प्रेमाला एक आशा भेटलीय तुझ्या होकाराने
प्रेमाला एक ध्येय भेटलंय सोबत तुझ्या चालण्याने
प्रेमाला एक ठिकाण भेटलंय सोबत तुझ्या राहण्याने
प्रेमाला एक महत्त्व भेटलंय तुझ्या प्रेमात पडल्याने
प्रेमला एक सत्त्व भेटलंय तुझ्या प्रेमात सामावल्याने
प्रेमाला एक दृष्टी भेटलीय नजर तुझी पडल्याने
प्रेमाला एक सृष्टी भेटलीय नजरेत माझ्या सामावल्याने
अमर
_______________________________________
६) स्वगृह » माझं गाव [आनंद कांबीकर]
माझं गाव [आनंद कांबीकर]
Primary tabs
द्रश्य(active tab) संपादन What links here
प्रेषक, आनंद कांबीकर, Sat, 24/10/2015 - 09:28
माझा गाव. .
माझा गाव
अता गाव नाही राहिला.
नदीचा ओढा अन ओढ्याचा नाला
झालाय.
तुंबलाय, बरबटलाय आणि सडलाय पण.
पूर्वी दाट वडांच्या सावलीत गार निजायचा
आज रखरखत्या इमारतींत तगमगतोय.
सुटू शकत नाही.
निसटूही शकत नाही.
नाही, तसा प्रयत्नच होत नाही.
रानं काळवंडलीत..
पूर्वी ती फुलायची
अता त्यांचे लिलाव होतायत.
आजू-बाजूने, आडवा-तिडवा
नुसता फुगत चाललाय.
डांबरी नांग्या फुटतायत त्याला
इखानं डबडबलेल्या.
भुलवतोय मला, तेवढेच आतून छळतोय मला
माझा गाव अता माझा राहिला नाही.
______________________________________
७) स्वगृह » हौशी मराठी नाटक प्रेमी [अनिवासी]
हौशी मराठी नाटक प्रेमी [अनिवासी]
Primary tabs
द्रश्य(active tab) संपादन What links here
प्रेषक, अनिवासि, Sat, 24/10/2015 - 09:20
गेले काही आठवडे लंडनच्या महाराष्ट्र मंडळात गणपती उत्सव चालू आहे. गणपती म्हंटले की निरनिराळे कार्यक्रम आलेच.
साठ वर्षापुर्वी लंडन मध्ये गणपती बसत नव्हता. लोक अधुनमधुन एकत्र यावयाचे- गप्पा- चहा- आणि एखादेवेळी स्थानिक हौशी कलावंतांचा कार्यक्रम येथपर्यंतच आमची मजल !
१९५४ च्या जून/जुलै मध्ये कांही तरुण मंडळी गप्पा मारत असताना मराठी माणसाचा आवडता विषय – नाटक- निघाला. आणि मग काय? बघता बघता नाटक करावयाचे ठरले. त्या वेळेस नाटकात काम केल्याचा अनुभव असलेले एक –दोघेच होते आणि ते सुद्धा शाळेत असताना. पण उत्साह मात्र खूप!.
पहिले नाटक! आणि ते सुद्धा निवडले – संगीत ३ अंकी लग्नाची बेडी. मग पात्रांची जमवाजमव. मुले खूप होती प्रश्न होता स्त्री पात्रांचा. गार्गीचे काम करायाला सौ पैगणकर तयार झाल्या. रश्मी साठी सौ रानडे व नंतर इतर पात्रांसाठी कुमारी मंदा भिडे आणि कला कुलकर्णी .
पुरुष्पात्रे जमली मग शोधाशोध सुरे झाली दिग्दर्शकासाठी. यातही अनुभवी कोणी नाही त्यातून सार्वजण नोकरी करणारे. शेवटी दोन दिग्दर्शकानी काम वाटून घेतले. डॉक्टर शेणोलीकर व विनायक म्हैसकर.
ह्या सर्व खटाटोपीचां म्होरक्या बेळगांवचा सुपुत्र गोपाळ चिटणीस –वय वर्षे २५. बाकी बहुतेक सगले २०-२२. – हो मी—मुकुंद नवाथे – वय २१. मला काम मिळाले अवधूतचे. अनुभव? शाळेत एकदा एका mob scene मध्ये मावळ्याचे.
जमवा जमव झाली.
त्या वेळेस मी Belsize park ह्या ठिकाणी एक खोली घेऊन रहात असे. आम्ही सर्वच तरुण लोक असे रहात होतो पण माझ्या जागेच वैशिstya म्हणजे मालक तेथे रहात नसे आणि बहुतेक इतर भाडेकरू देखील भारतीय होते. त्यामुळे आव जाव घर तुमारा अशी परिस्थिती होती. अर्थात तालमी साठी हीच जागा निवडण्यात आली.
जुलै ते सेप्टेम्बर रोज संध्याकाळी – शनिवार-रविवार तालमींना पात्त्रे येऊ लागली. मग मी घरी असो वा नसो- किल्ली दारावर ठेवलेली. जसे जमेल तसे पात्रे/दिग्दर्शक येत – तालीम करीत- चहा पिऊन जात. अत्ता आठवले म्हणजे हसू येते- आज रश्मी आहे तर कांचन नाही – एक दिग्दर्शक एक सांगून जातो- दुसरे दिवाशे दुसरा दुसरे काहीतरी सांगतो.
आणि सर्व रंगात आले असताना सौ रानडे ह्यांनी सांगितले की त्या काम करू शकणार नाहीत!!
चिटणीस परत एकदा खंबीरपणे उभा राहिला. पुन्हा परत नायिकेचा शोध! त्यावेळचे अध्यक्ष, केसरीचे श्री ताम्हणकर मदतीला आले व त्यांच्या ओळखीच्या डॉक्टर आचरेकरांच्या सौ तयार झाल्या. प्रश्न होता – अंतराचा. ते रहावयाचे लंडनच्या बाहेर- Ilford ला. भुयारी गाड्याच्या जाल्यापलीकडे-- ना कोणाकडे गाड्या – त्या बाजूची माहितीही नाही. पण – उत्साह अजून तेवढाच. एका वेळेस एक-दोघांनी एका दिग्दर्शका बरोबर जाऊन तालीम करणे सुरु केले. तालमीपेक्षा प्रवासातच वेळ जास्त. मग त्याही मधून अधून आमच्याकडे येऊ लागल्या. त्या असल्या की तालीम शेजारी रहाणार्या सौ कुलकर्णीकडे होऊ लागली.
लंडनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेळे Unity नावाचे थिएटर घेण्याचे ठरले. अर्थात हे सर्वे चिटणीस व त्या वेळचे इतर सिनियर लोकांचे निर्णय! आम्हाल एवढेच माहीत की प्रथमच एवढा खर्च करत आहोत! म्हणून सर्व कलाकारानी स्वत:साठी महाग तिकिटे विकत घेतली.
रंगीत तालमीचा दिवस जवळ आला तेव्हां नाटकासाठी अनेक वस्तूंची जरूर असते हे लक्षात आले आणि मग धावपळ सुरु झाली. अवधूतला बिगुलाची जरूर होती तेव्हां तो मिळविण्यासाठी माझी मोहीम सुरु झाली. तसेच इतरांचे!
रंगीत तालीम झाली- नेहमीच्याच पद्धतीने- गोंधळ-गडबड ई. आणि पडद्यामागे आणखी एक नाटक सुरु झाले !
सौ आचरेकर तालमीसाठी सौ कुलकर्णींच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी रश्मीसाठी एक साडी आणली होती ती त्यांना आवडली व त्यांना ती शोभून दिसत होती. ताल्मीनंतर त्या घरी गेल्या. ( घरी जायला दीड तास लागत असे) तेवहा म्हैसकरने डॉक्टरना पोहोचल्या का ? असे विचारण्यासाठी फोन केला. बोलताना तो म्हणाला की त्युम्च्या सौ साडीत फारच सुंदर दिसत होत्या ! डॉक्टर रागावले – दोघांची काहीतरी बोलाचाली झाली आणि डॉक्टर म्हणाले त्या काम करणार नाहीत.
दुसर्या दिवशी नाटक- तिकिटे विकलेली- बराच खर्च झालेला. शेवटी श्री ताहाम्न्कार मध्ये पडले आणि नाटक उभे राहिले. नाटकाची संगीत बाजू श्री पैगणकर (दिग्दर्शक) पुण्याच्या MODERN OPTICIAN चे श्री पंडित गानू व Air India चे श्री वालावलकर ह्यांनी सांभाळली होती.
(अशा प्रकारे) ५ सेप्टेम्बर १९५४ (रोजी) --- बरोबर ६० वर्ष्यापुर्वी भारताबाहेरचे पहिले मराठी – कदाचित भारतीय भाषेतील पहिले नाटक लंडनच्या रंगभूमीवर उभे राहिले.
ह्या नाटकाबद्दल आणि येर्थील मान्दालाबाद्द्दल आणखी खूप लिहिता येण्यासारखे आहे. फक्त ह्या नाटकात पडद्यासमोर आणखी पडद्यामागे ज्यांनी ज्यांनी काम केले ऱ्यांची नावे घेऊन थांबतो.
फोटोत: खुर्चीवर: (डावीकडून) कला कुळकर्णी,मंदा भिडे , सौ आचरेकर ,श्री कुळकर्णी, डॉक्टर आचरेकर, श्री ताम्हणकर,सौ कुलकर्णी,सौ पैगणकर. ??
खाली बसलेले: डॉक्टर भाटे, म्हैसकर (मांडीवर ?) रमेश गुडी, डॉक्टर शेणोलीकर. पंडित गानू ,
मागे उभे: खर्चे, हेमंत कानिटकर, वालावलकर ,अस्मादिक – मुकुंद नवाथे – सुरेश गुडी, विठ्ठल चव्हाण, ( ? एकुलता एक गोरा –make up artist) ( पुढे)
पिसोळकर मागे गोपाळ चिटणीस, साठे, कुमार कुलकर्णी, श्री पैगणकर, गाजू गोडबोले , ? कदाचित देशिन्कर?
असे हे नाटक आणि हौशी मराठी नाटक प्रेमी!
हे सर्व आठवणीतून लिहिले आहे – चू भू दे घे. वाचकांपैकी कोणास कांही आठवले तर संपर्क साधण्यास आनंद होईल.
mukund nawathe
mukundn@hotmail.com.
______________________________________________
पृथ्वीराज - एक पराभूत तत्त्वज्ञानी [बाजीगर]
Primary tabs
द्रश्य(active tab) संपादन What links here
प्रेषक, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, Wed, 04/11/2015 - 15:19
तो अफगाण सैनिक महाराज पृथ्वीराजांना खांद्याला धरून फिरवत होता आणि त्याचबरोबर महाराजांचे विचारही फिरत होते. अचानक एका दिशेला तोंड करून त्या सैनिकाने महाराजांना उभे केले. पण भ्रमणवेगाच्या संवेगाने पृथ्वीराजांच्या मनातले विचार फिरतच राहिले!
कुठे आहे मी, कुठे होतो मी....अभ्यासू वृत्तीचे पृथ्वीराज त्या सर्वस्व हरण्याच्या क्षणीदेखील अभ्यास करत होते. खरंच, कुठे चुकलं? असामान्य योद्धा अशा पद्धतीने पराभूत व्हावा? बहुधा असामान्य योद्धा अशाच पद्धतीने हरवला जाऊ शकतो... महाराज विचारात हरवत चालले....
किती जणांनी मला सावध होण्याचा हितोपदेश केला होता.... आणि मला स्वत:ला काय धोका समजत नव्हता? मग का मी तेव्हाच त्यांच समजावणं ऐकलं नाही?
कुठं आहे मी... गवाक्षातून येणारा मंद सुगंधित वारा मला दिशा सांगतोय.... विशिष्ट फुलांच्या सुगंधावरून मी अनुमान काढतोय मी कुठे आहे आणि सिंहासन किती दूर आहे.....
आठवतयं, नव्हे अगदी काल घडल्यासारखं मनश्चक्षूंपुढं दिसतंय... घोरीला सहाव्यांदा परतून लावल्यावर विजय-आरती घेऊन तिष्ठत उभ्या राहिलेल्या संयुक्ताराणींच्या डोळ्यांची निरांजनं मात्र विझल्यासारखी दिसली. ते पाहाताक्षणी आपण दुखावलो होतो. औक्षणाची औपचारिकता पूर्ण झाल्यावर स्वत:शीच बोलल्यासारखी महाराणी हलकेच बोलली,
"दान हे नेहमी सत्पात्रीच असावं, वारंवार आक्रमण करणार्याने आपला मनोदय स्पष्ट केलाचं होता. म्हणून या वेळी त्याला सोडणं, जीवनदान देणं मोठीचं चूक आहे."
त्यावर आपण आपल्याच धुंदीत त्याकडे दुर्लक्ष केलं होतं.
आणि अमात्य... त्यांनी कोरडेपणाने आपलं अभिनंदन करून गंभीरपणे वीरगती प्राप्त झालेल्या सहा युद्धातील सैनिकांची यादी सादर केली व म्हणाले,
"तिसर्या ते सहाव्या युद्धातील सैनिकांचे बलिदान व्यर्थ वाटते.."
यावर उसळून आपण त्यांना अपमानित केले होतं. योद्ध्याच्या गोष्टी तुम्हा विचारवंतांना काय कळणार असे म्हणून त्यांना चतुरंग खेळण्याचे आव्हान दिले.
आज आपण विचारांनी चतुरंग खेळू या असे सुचवत अमात्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तो धुडकावून लावत आपण त्यांना चतुरंग सिद्ध करण्याची आज्ञा दिली.
"आता वर्षभर घोरी येत नाही, तो विषय नको."
पहिली चाल... आज चतुरंगावरदेखील आपलाच दिवस होता. धडाकेबाज आक्रमण करून आपण अमात्यांची दाणादाण उडवली.
अमात्य गहन विचारात पडले होते, अचानक अमात्यांचे डोळे चमकले, ते थरथर कापत होते.
आपण प्याल्यातून मोठा घोट घेतला, त्यासरशी अमात्यांनी चाल केली व म्हणाले,
"शह आणि मात"
आपण विस्फारल्या डोळ्यांनी पटाकडे पाहतचं राहिलो, हे कसं शक्य आहे?
"तो उंट मारून मी केव्हाचं पटाबाहेर फेकला होता, मग तो पटावर कसा आला?" आपण गरजलो होतो.
"मी तो पुन्हा पटावर आणला, हे सांगायला की घोरी पटाबाहेर गेलाच नाही." अमात्य नजरेला नजर भिडवून म्हणाले.
त्याच क्षणी गुप्तचर अवतरला, त्याने वार्ता आणली होती, घोरी यावेळी माघारी पळून न जाता निवडक सैन्यासह राज्यातच लपून बसलाय.
आपल्यावर जणू तडिताघात झाला.
विद्युतगतीने झालेल्या गनिमी काव्याच्या आक्रमणात आपण केव्हा कैद झालो ते महाराजांना कळलेच नाही. घोरी महाराजांकडे पाहत होता, महाराजांच्या विशाल कमलनेत्रात भीतीचा लवलेशही नव्हता. त्यांच्या निर्भय डोळ्यांची घोरीला भीती वाटू लागली. एक क्षण त्याला असेही वाटले की आपले सर्व सैन्य फितूर आहे आणि महाराज बंदी झाल्याचा खेळ खेळताहेत. घोरीने आपल्या सेनापतीकडे पाहिले, मनातले ओळखून क्रूरकर्मा महाराजांच्या दिशेने सरसावला.
अश्वत्थामाच्या वेदना भोगणार्या पृथ्वीराजांचं मन भूतकाळात जाऊन महाभारतातले संदर्भ शोधत होतं. अफगाण... कंधार... घंधर शकुनी कपटीपणा तर दुस-या क्षणी भविष्यात फार पुढे जावून हजार वर्षानंतरचा विचार करीत होते हे मी काय पाहतोय
चर्मचक्षु गमावलेल्या मला काही दिव्य दृष्टी तर नाही ना प्राप्त झाली,की हे केवळ भास. हजार वर्षांनंतर कुणी सांगावं त्या वेळचा प्रगत मानव कदाचित माझ्या नावाचे क्षेपणास्त्र सुद्धा निर्माण करतील जे अति दूर अंतरावरील लक्षाचा वेध घेईल.पण प्रश्न हा आहे कि माझ्या अपयशातून भारतीय काही शिकणार आहेत कि नाही .
हे परमेश्वरा मी काही पुण्य केलं असेल तर असा राजा ह्या भारत वर्षाला दे जो अखंड सावध असेल ज़ो निश्चयाचा महामेरू असेल ज़ो पुढे जाण्या साठी प्रसंगी चार पावले मागे जाण्यात कमीपणा मानणार नाही जो अहंकारी नसेल ज़ो जाणता राजा म्हणून अढळ स्थान प्राप्त करेल .
त्यांच्या मनाने मानसशास्त्राच्या निबिड अरण्यात प्रवेश केला .भारतवर्ष सुजलाम, सुफलाम, सुबत्ता त्यामुळे अतिथी देवोभव हि उदार संस्कुती निर्माण झाली.त्याउलट वाळवंट पाण्याचे दुर्भिक्ष, कधी तरी अन्न मिळणार म्हणून जीवनकलह लुटारू खुनशी वृत्ती कृतघ्नता .दोन वेगळ्या परिस्थितीमुळे दोन वेल्वेल्ल्या मानसिकता निर्माण झाल्या याचे आपल्याला का विस्मरण झाले . एकच धोरण असफल ठरते लवचिकता हवी, निरनिराळ्या उदाहरण अनुरूप धोरणाची गरज असते. एकच धोरण ठेवले तर अपयश निश्चित हे आपल्या का ध्यानी आले नाही .एक यत्किंचित परदेशी लुटारू काय माझे भाग्य बदलू शकणार आहे? ह्या अहंकाराने घात केला .
काही गदारोळाने महाराजांची विचार शृंखला भंगली .
नेहमी धीर गंभीर असणारे अमात्य आज सोंगाड्या सारखी लगबग करतांना ऐकू येत होते. बडबड करतांना ऐकू येत होते काय करताहेत ते? प्राणभयाने तर त्यांच्यात हे परिवर्तन झाले नाही?नाही, त्यांच्या निष्ठेबाबत मला तिळमात्र संदेह नाही .लांबच्या प्रवासामुळे व युद्धामुळे श्तांत झालेल्या अफगाणी सैनिकांना मनोरंजनाची आवश्यकता असणार हे गृहीत धरुन त्यांनी गारूड्याच्या खेळासारखी उत्सुकता निर्माण केली होती . बुद्धिमान व व्यासंगी अमात्य तोडक्या मोडक्या अफगाणी भाषेत काहीतरी आर्जव करून विनंती करताहेत हे जाणवत होते पण काय ते कळण्या एवढे महाराजांचे मन स्थिर होत नव्हते क़य म्हणताहेत ते?विश्वासू सहकार्यांची ओळख अश्या प्रसंगातच होते.महाराजांचे मन कडवट होत चालले मन अशांततेले भरले .श्वास वाढला महाराज आपल्या मनाला शांत करण्यासाठी योग अभ्यासात चिंतन केलेल्या गोष्टी आठवण्यात मन एकाग्र करू लागले हळुहळू श्वास नियंत्रणात येवू लागला .भरकतलेल्या मनाचा अश्व हि थोडा नियंत्रणात येवू लागला.स्तत:ला न फसवता महाराजांनी वास्तवतेचा स्वीकार करण्याचे ठरवले. आपण आता बंदी आहोत .प्रजेचे रक्षण करण्याच्या कर्तव्यात अयशस्वी ठरलो आहोत अफाट क्षमता, अमर्याद कर्तृत्व व्यर्थ ठरले होतें.महाभारताचा अभ्यास व गीतेवरील चिंतन शुन्य ठरले होते.आपण कर्तव्यात कमी पडलो या विचाराने मन जळू लागले,आपल्यानंतर प्रजेवर होणा-या अत्याचारांची त्यांना कल्पना येवू लागली, याक्षणी आपण जास्तीतजास्त काय करू शकतो,काय करू शकतो?
अचानक अमात्य काय विचार करताहेत त्या विचारलहरीवर पोचल्यासारखे वाटले!
अमात्य हाच विचार करताहेत आपण काय करू शकतो.
अमात्य कसे तरी आपली विनंती घोरीच्या गळी उतरवण्यात यशस्वी ठरले .सर्व अफगाणी सैनिक अमात्यांना विदुषक समजून हसत होते.
अचानक महाराजांच्या हाती दोन बाण दिले गेले व एक अफगाणी कमान... एक पुसटसा स्पर्श.
बाण दोन का? क्रूरकर्मा विचारात पडला
कमानीची प्रत्यंचा प्रमाणाबाहेर आवळत महाराज विचार करत होते. मला लक्षासाठी एक बाण पुरेसा असतो,
मग याचा अर्थ लक्ष दोन आहेत दुसरे पहिले कि पहिले दुसरे !
शांतता .....घंटानाद... वेदनांकडे दुर्लक्ष ..भटकणारे मन आवरून एकाग्र करण्याची पराकाष्टा.
महाराज आपल्या शरीरातील अणूरेणूंनी घोरीचा ठाव घेत होते .वा-याला प्रार्थना करत होते सुक्ष्म घर्मगंध हि पुरेसा ठरला असता दरबारात निरव शांतता पसरली श्वास रोखले गेले जणू कुणीतरी शक्तिशाली व्यक्तीने खुणेने सर्वांना शांत रहाण्याची आज्ञा केली होती
आणि घंटानाद करण्यात आला .त्या नादाचे अनेक प्रतिध्वनी ऐकल्याचा भास झाला.कमानीतून बाण सुटला व तो घंटे वर आढळताच पुन्हा घंटानाद झाला. मंत्रमुग्ध सैनिक पाहताच राहिले नि:शब्द!
"शाबास" घोरीकडून उत्फूर्त दाद निघाली.
महाराज १८० अंशाच्या कोनात वळले.दुसरा लक्षवेध!
कधी बाण धनुष्यावर चढला,प्रत्यंचा कधी खेचली गेली ते कुणालाच कळले नाही,खुद्द कमानीलाही नाहि.
महाराजांच्या जवळच उभ्या असलेल्या क्रूरकर्माच्या संतापाचा स्फोट झाला,समशेर जोरात हलली
नियतीचा नाईलाज झाला.
तिथे उपस्थित असणारे सांगतात , त्यांनी पाहिले.
घोरी उच्च सिहसनवरुन गडगडत महाराजांच्या पायाशी आलेला आणि महाराजांचे मस्तक सिंहासनावर विराजमान झालेले.
_________________________________________________
स्वगृह » अमेरिकेची सफरीतील किस्सा... लक्षाधीश ते भिक्षाधीश [शशिकांत ओक]
अमेरिकेची सफरीतील किस्सा... लक्षाधीश ते भिक्षाधीश [शशिकांत ओक]
Primary tabs
द्रश्य(active tab) संपादन What links here
प्रेषक, दिवाळी अंक, Wed, 04/11/2015 - 15:57
अमेरिकेची सफरीतील किस्सा... लक्षाधीश ते भिक्षाधीश
अमेरिकेची सफरीतील किस्सा... लक्षाधीश ते भिक्षाधीश
हरवले ते गवसेल का?
मित्रांनो,
काही काळापुर्वी मी व पत्नी अलका अमेरिकेची सफर करून आलो, त्याची वेगळी फोटोसह हकीकत मी मित्रांना वेळोवेळी व्हॉट्स ऍप वरून पाठवत असे. तो ग्रुप आता बंद झाला आहे. मिपाकरांना अमेरिकेचे अप्रुप राहिलेले नाही काऱण अनेक जण तिथे बसून आपल्याशी संपर्क साधतात. म्हणून ते टाळून एक मजेशीर किस्सा कथन करतो. कदाचित आमच्यावर गुदरलेल्या प्रसंगामुळे काहींना आपले किस्से सांगायला सुरसुरी येईल...असो.
हरवल्या वस्तू परत माघारी यांना मिळतातच कशा? याची मजा वाटून तोंडावर कौतुकाचे भाव लोक आणत असले तरी मनात हा प्राणी इतका कसा घांदरट कसा? असे वाटत असेल. नेव्हर माइंड!
झाले असे की न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावर वाहनाच्या गर्दीतून वेळेवर पोहोचायला कटकटीचे असते, कधी कधी लोकांच्या फ्लाईट्स चुकतात त्यापेक्षा रात्रीच जवळच्या एखाद्या हॉटेलात राहून मग वेळेवर विमान पकडायला सोईचे राहील असा सल्ला अनुभवींनी दिल्यावरून आम्ही सॅन फ्रान्सिस्कोला जायला जेएफके विमानतळाच्या अगदी जवळ असलेल्या एका ‘इन मधे रात्र काढायला पोहोचलो. आम्ही भारतातून मल्टीकरन्सी कार्ड बरोबर नेले होते. त्यामुळे कुठेही पैसे द्यायची वेळ आली की आम्ही ते वापरून काम होत असे. तसे आम्ही तिथे वापरून रात्र काढली. सकाळी उठून ह़ॉटेलच्या वाहनाने एअरपोर्ट बाहेर सोडले. मग सामान ट्रॉलीवर टाकून, लिफ्टचा वापर करून, इंटर्नल रेल्वेने प्रवास करत, टर्मिनल 4 वर आलो व पुढे सनकंट्रीच्या विमानातून प्रवास करत सायंकाळी मिलपिटास ग्रँडमॉल जवळील भागात नातेवाईकांच्याकडे पोहोचलो. पुढचा दिवस विश्रांती घेत जवळील तिरुपतीभीमा हॉटेलात इडली-डोसा खाऊन घरी परतलो. वायफायचे कनेक्शन चालू झाले आणि आधीच्या दिवसातील तुंबलेले एक एक मेसेजेस मोबाईलवर उत्पन्न व्हायला लागले. ‘विज्ञानाची करामत काही और’ म्हणत मी कौतुकाने एक एक वाचत होतो. पहाता पहाता माझ्या क्रेडिट कार्डावरील वापरामुळे कमी होणारा शेकडो डॉलर बॅलन्स होता होता फक्त 2 $ दाखवायला लागल्यावर मला घाम फुटला! मी न वापरलेल्या बिलांनी तो माझ्या डोळ्या देखत कमी होत गेला. चपापून मी आपल्या खिशातील कार्डाचा चाचपून फील घेतला. कार्ड तर माझ्यापाशी सुरक्षित होते! बिना कार्डाने कोणीतरी बिलंदराने विज्ञानाच्या प्रगतीचा गैरफायदा घेत आमच्या पैशावर डल्ला मारला होता! फक्त हात चोळत बसून पहात राहण्या पलिकडे आम्ही काही करू शकत नव्हतो. दुसऱ्या दिवशीचे एलए, लासवेगास, ग्रँड कॅनियन अशा 7 दिवसाच्या भरगच्च सहलीचे बुकिंग झाले होते. भाचा विनय कमरकरला दुसऱ्या दिवशी रात्री विमानाने जायचे असल्याने आमच्या सहलीसाठी त्याच्या मित्राने आम्हाला पोहोचवाची सोय झाली होती.
विमनस्क मनस्थितीत 5-10 मिनिटे गेल्यावर मी योग्य नंबरांवर फोनाफोनी करून घडलेला प्रकार सांगून कार्ड देणाऱ्या बँकेशी संपर्क केला. त्यांच्या सांगण्यावरून कार्ड ब्लॉक करायची सूचना दिली. पण “चिडिया चुग गई खेत अब काहे का पछतावा” असा मामला होता. पैसे तर गेलेच होते. वरखर्चसाठीचे तीन एकशे डॉलर सोडता आम्ही परदेशात “लक्षाधीशाचे भिक्षाधीश” झालो ...
‘तरी मी म्हणत होते कार्डा बिर्डाच्या नादी लागूया नको पण’... वगैरे कटू शब्दांना झेलत झेलत भाच्याला फोन करून सर्व प्रकार सांगितला. ‘काही काळजी नको. मी पैशाची व्यवस्था करतो. मामा असे आम्ही पण ‘मामा’ झालोय. होते असे कधी कधी. वाईट वाटून घेऊ नकोस म्हणाव मामीला...’ त्याच्या शब्दांनी धीर आला... त्याने दिलेल्या पैशांतून आमची पुढील महिनाभराची सहल आरामात पार पडली...
पण आमच्या गेलेल्या पैशासाठी केलेल्या हालचालींतून बँकेने मेसेजेस् मधून तुमच्या कार्डाचा विमा उतरवलेला आहे. अमुक अमुक कागदपत्रांची पुर्तता करा. तुम्ही न वापरलेल्या व्यवहारांची चौकशीकरून ते पैसे परत मिळतील असे ईमेल धडकायला लागले. मी जमेल त्या कागदांची पुर्तता करत होतो. काही पटकन मिळणारे होते. काहींना वेळ लागणार होता. त्यात जवळच्या पोलिसठाण्यतील FIR ची मागणी मँडेटरी होती. आम्ही मध्यल्याकाळात जो भेटेल त्याला घडलेल्या प्रकाराची वाच्यता करत होतो. अनेकांनी आम्हालाही असा फटका बसलाय असे सांगून सांत्वन केली. अनेकांचे मत पडले, ‘हा सायबर फ्रॉडचा गुन्हा आहे. तुमचे कार्ड तुमच्यापाशी शाबूत आहे. कार्डाची चोरी झालेली नाही. शिवाय आपण मी परदेशात आहात. इथे FIR करायला येणार नाही कारण इथे अमेरिकेत तशी प्रथा आमच्या ऐकिवात तरी नाही. भारतात गेल्यावर पहा FIR करून’ प्रत्येक आपापल्या अनुभवांशी इमान धरून बोलत होता. नक्की काय करावे कोणाला माहित नव्हते. ‘अहो आमचे पैसे असे गेले तर आम्ही फक्त बँकेला कळवतो की या या बिलांच्या गोष्टींशी आमचा संबंध नाही. ते पेमेंट आम्ही करणार नाही. बँक आणि इन्सुरन्सवाले पाहून घेतात आपापसात आणि 2-3 आठवड्यात आमचा कार्डावरील बॅलन्स परत मिळतो. FIR वगैरे की काय करायला लागलेले आम्हाला तरी आठवत नाही.’
भारतात जाऊन मी पोलिसस्टेशनात FIR करायला बसलोय. त्यावेळी पोलिसी खाक्यात मला एकजण, ‘काय राव तुम्ही! इतके शिकलेले म्हणवता, अमेरिकेत घडलेल्या गुन्ह्याचा इथे कसा करता येईल FIR? जरा समजून घ्या राव!’ असे म्हणून वाटेला लावलेले चित्र रंगवून भयभीत व्हायला होई!
‘बर का अलका-शशी, आपण इथेच पोलिस रिपोर्ट करायला हवा. त्या रिपोर्टचे कागदपत्र तुम्ही बँकेला पाठवलेत तरी पुरेले आहे! एका खमक्या सीनियर नातलगाचा सल्ला पटला. त्याने लगेच आपल्या जावयाच्या हातात रिसीव्हर पकडवून, ‘बोल पोलिसस्टेशवाल्यांशी’ म्हणून पुढाकार घेतला. थोड्या बोलाचालीनंतर एक पोलिस अधिकारी पुढच्या अर्ध्यातासात आमच्या नातलगांच्या घरी बेल वाजवून हजर झालेला पाहून आमच्या डोळ्यावर विश्वास बसेना! एक गोरागोरापान, काळाकभिन्न पोलिसी गणवेषात हडेलहप्पासारखा दिसणारा सणसणीत कॉप समोर उभा होता! कमरेला खोचलेले रिव्हॉल्व्हर, वेऴ पडली तर पटकन काढून हातात टाकायसाठी बेड्यांचे ‘कंगन’ मागे लटकलेले, दंडावर विविध लोगोज, शर्टाला छातीवर दोन्ही बाजूच्या पॉकेट्स, त्यात खच्चून काही काही कामाच्या गोष्टी भरलेल्या, ‘य़ेस, हू इड शॅशी? अँड अलकॅ?’ असे म्हणत त्याने घराची पहाणी केली. सर्व प्रकार ऐकून त्याने म्हटले, ‘सर्व चक्रावून सोडणारे आहे. मँचेस्टर वगैरे गावांची नावे वाचून नक्की सायबर गुन्हा कुठे घडलाय ते कळत नाही. यातील बऱ्याच रक्कमा GBP म्हणजे पौंडातील दिसतात. झाल्या प्रकाराचा खेद आहे. आम्ही छडा लावल्याशिवाय राहणार नाही. मी हा रिपोर्ट तयार करून पाठवतो. मिलपिटासच्या पोलिस स्टेशनातून तो परवा मिळवता येईल. काही लागले तर मला कळवा. हे माझे कार्ड घ्या’ म्हणून हाती देत तो पोलिस ऑफिसर गेला. तो घरी इतक्या झटपट आला काय! नोंदी करून 20 मिनिटात गेला काय! तो झपाटा पाहून आम्ही चक्रावून गेलो!
‘इथे असेच असते…’ म्हणत अमेरिकी तत्परतेचा मासला पहायला मिळाला. पोलिस ठाण्याचे चित्र वेगळेच होते. बँकेच्या टाईप ऑफिसात काचेमागे बसलेले काळ्यावेषातील महिला-पुरुष कॉपनी सहा डॉलरची रीसिट फाडून आम्हाला तो प्रिंटेड रिपोर्ट हाती दिला. त्यात आम्हाला गरजेची सर्व माहिती नोंदलेली होती. शेवटच्या वाक्याने आमचे लक्ष वेधले. त्यात म्हटले होते, ‘वरील भेटीच्या वेळी व्हीडिओ कॅमेरा ऑन होता.’ अमेरिकेतील पोलिसांकडे आमच्या येण्याची अशी फिल्म घेतली होती तर! आता आम्ही परतल्यावर बँकेने आपल्या क्लेमचे काय झाले आहे ते लवकरच कळवतो म्हणून 2-3 वेळा म्हटले आहे. होपफुली ते पैसे दिवाळी आधी बोनस प्रमाणे मिळावेत अशी माफक इच्छा!
अरे हो आणि ते सांगायचेच राहिले! भाच्याने गरजेच्याकाळी तत्परतेने दिलेले पैसे मामाने भारतात आल्यावर परत केले.
‘हरवलेले गवसेल काय?’ असे सध्या म्हणतो आणि सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.