
मंदमंद पावडरी, लाडिकलाडिक लिपष्टिका
छंदीफंदी अत्तरं, हलक्याहलक्या टवाळ्या
तिन्ही ऋतू सातही वार, सगळ्या ड्युटया मारतो,
एकपण खाडा करत नाही,
महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही!
नाजुकनाजुक पर्सा, मखमली पिशव्या
झुळझुळीत साड्या, झिरझिरीत ओढण्या
त्यांच्या रुमालातली नाजुक चिल्लर
मी कधी मोजत नाही,
महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही!
गरोदर बाईला, ऐंशीच्या म्हातारीला
शाळकरी पोरीला, कॉलेजच्या ताईला
सगळ्यांना जागा मिळते, फुल्ल्ल असली बस तरी
मी ष्टॉपला कट मारत नाही,
महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही!
सगळ्या मला दादा म्हणतात,
मीही सगळ्यांना ताईच म्हणतो,
पण पाचव्या शीटच्या, अबोलीच्या गजर्याला
मी तिकीट कधी विचारीत नाही,
महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही!
