काजू/खजूर रोल

.
.
रामराम मंडळी,
सर्वप्रथम सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा :)

दिवाळी सण मोठा नाही रेसिपींना तोटा :)

नेहमीच्याच खमंग फराळासोबत हे रोल नक्की करून पाहा. सोपी अन कमी साहित्यातली चविष्ट मिठाई / रोल/ बर्फी हवं ते बारसं करा.
तर मंडळी, घ्या साहित्य लिहून.
साहित्य : -
१) ओले खजूर - २ वाटया (मी काळे वापरलेत.)
२) काजू - १ १/२ वाटी
३) तुप - २ चमचे
४) साखर- २ चमचे
५) मिल्क पावडर - ३ चमचे ( ऐच्छिक )

कृती : -
खजुराच्या बिया काढून घ्याव्यात. एका नॉनस्टिक पँनमध्ये २ चमचे तूप घालून बिया काढलेले खजूर घालावेत. मंद आचेवर परतत राहावेत. खजूर हा चिकट असल्यामुळे परतायला शक्यतो लाकडी चमचा घ्यावा अथवा स्टील चमच्याला थोडं तेल लावून मग परतावं. साधारण ५ मिनिटात खजुराचा गोळा व्हायला लागतो. ५ ते ७ मिनिटे परतून घ्यावं. मऊसूत गोळा तयार झाला की हा गोळा पोळपाटाला / परातीला तुपाचा हात लावून त्यात काढून घ्यावा. आता लाटण्याला तेल लावून गरम असतानाच खजूर गोळ्याची थोडी जाडसर पोळी लाटून घ्यावी.

आता काजूकडे वळू या..
मिक्सरमध्ये काजूची बारीक पूड करून घ्या . आपल्याला थोडासाच साखर पाक करायचाय, म्हणून पॅनमध्ये साधारण १ छोटी पळी पाणी घेऊन त्यात २ चमचे साखर घालून मंद आचेवर साखर वितळू द्या. साखर वितळली की किंचित सैल आणि चिकट पाक तयार होईल. त्यात काजूपूड घालून चमच्याने छान व्यवस्थित हलवून घ्या.
पाक आणि पूड एकजीव झाले की त्यात ३ चमचे मिल्क पावडर घाला. हे मिश्रण खजुरासारखं चिकट आणि घट्ट नसतं. थोडं सैल असतं. म्हणून लाटायची गरज नाही.
आता हे मिश्रण खजुराच्या पोळीवर चमच्याने व्यवस्थित पसरून घ्या आणि थोडं गार झालं की हाताने थापून गोल आकारात पसरून द्या.
झालं.....
आता ह्याचा हळूहळू रोल करून घ्या (अळूवडीची करतो तशी गुंडाळी.)
आता हा रोल फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवून द्या. मी २० मिनिट ठेवला. मस्त सेट झाला होता.
आता हा बाहेर काढल्यावर सुरीला तेलाचा हात लावून रोल मस्त कापून घ्या.
आता त्यातला एक तुकडा खाउन बघा. तुमचा विश्वास बसणार नाही, मग एक स्वतःला एक चिमटा काढून खात्री करून घ्या ;) हे प्रकरण आपण बनवलंय - इतकं स्वादिष्ट अन तेही घरच्या घरी!
कमी वेळात कमी साहित्यात एक स्वादिष्ट प्रकार बनवल्याबद्द्ल तुमचं कौतुक होतं की नाही बघा :)

.
.