

सांज ती तेजाळलेली हासली लाजून वदली
डोंगराच्या पायथ्याशी उजळला अंधार आहे
चंद्र सजला चांदण्याने मुग्ध सारी रात्र झाली
छेडलेला राग कोमल धुंद तो गंधार आहे
मेघतोरण बांधलेले, स्वागता आकाश नटले
नभधरेच्या संगमाचा आगळा शृंगार आहे
वृक्षगर्भी दाटलेले ओज ओसंडून न्हाले
या धरेने अन नभाने गायला मल्हार आहे
देखणी ती सोनपुष्पे, रातराणी अन बहावे
पारिजाताच्या सवे बघ रंगला मंदार आहे
स्वार जलदांच्या रथावर जाहला आनंद आता
तेज आले अंगणी आनंदला परिवार आहे
विशाल कुलकर्णी
