कोलकत्त्याची कुंभार आळी

अनेक वर्षानंतर कोलकत्त्याला जाण्याचा योग आला होता आणि तोही दुर्गापूजेच्या फक्त काही दिवसच आधी - त्यामुळे आधी ठरवलेल्या घाईगर्दीतच "कुंभार आळीला भेट" हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडता आला . त्या भेटीचे हे चित्रमय वर्णन !

लगेच प्रश्न नका विचारू - ही कुठली आळी आणि येव्हढ काय तिच कौतुक ? किंवा वारही नका करू - आळ्या बघायला कोलकत्त्याला कशाला जायला हव - यांच्या गावामध्ये काय उकिरडे नाहीत की काय आळ्या बघता यायला? का एकदम smart city मध्ये रहायला लागले? (smart city मध्ये तर आळ्या असणारच, नाहीतर गांडूळखत कसं तयार होईल?)

ही आळी जरा खासच म्हणायला हवी. जेव्हा १८व्या शतकात इंग्रजांनी प्लासीच्या लढाईनंतर कोलकाता शहर आपली भारतातील राजधानी म्हणून वसवायला सुरवात केली तेव्हां बऱ्याच व्यावसायिक तंत्रकुशल लोकांकरता शहराचे वेगवेगळे भाग आखून/राखून देऊन त्यांचे उद्योग भागवार करायला लावले. जसे गवळी किंवा सुतार किंवा कुम्भार या प्रत्येकाला त्यांची त्यांची गल्ली किंवा आळी किंवा पाडा नेमून दिला आणि त्यांचे व्यवसाय फक्त तिथेच करायला परवानगी दिली. तर अशी ही कुंभार आळी (कोणी जीवजंतू नव्हे) जिचे बंगाली नाव आहे "कुमोरटूली" (কুমোরটুলি).

जरी या आळीची स्थापना झाल्यावेळी (सुमारे २५० वर्षांपूर्वी) इथले कुंभार गाडगी, मडकी इ. इ. नित्योपयोगी मातीच्या वस्तू बनवत असले तरी आता तिथला प्रमुख उद्योग दुर्गापूजेकरता लागणाऱ्या उत्सवमूर्ती -सर्व तऱ्हेच्या सजावटीसह - बनवणे हा आहे. मी दुर्गापूजेच्या काही दिवसच आधी कोलकत्त्यात पोचत असल्याने या सगळ्या मूर्ती "अपूर्ण" रूपात बघण्याची संधी घेणे - की ज्या एरवी बघायला मिळणार नाहीत - हे या आळीत धावती भेट देण्याचे कारण होते.

या उत्सवमूर्तीचे रूप साधारण सगळीकडेच "अष्टभूजेचे" असते. एकूण संचात एक दानव (उग्र, बलदंड शरीर, हातात किंवा अंगाभोवती साप), देवीचे वाहन सिंह आणि दानवाचे अर्धवट रूप दाखवणारा रेडा (महिष) असा साधारण गोतावळा असतो. जोडीला गणपती, हंसावरची सरस्वती असे "guest artists" देखील असतात. माझ्या सुदैवाने या धावत्या भेटीत हे सगळेच लोक मला हवे तसे "अपूर्ण" रूपात दिसले आणि त्यांचे "अंतरंग" पहायला अणि चित्रित करायला मिळाले. सुदैवाने फारसे कुणी चित्र काढू नका असे म्हणणारे निघाले नाही पण एका ठिकाणी मात्र "नुसते पहा" असे म्हणत चित्र काढण्यास प्रतिबंध केला गेला. मूर्तिकारांचा "धंद्याचा टैम" असल्याने फारसे प्रश्न विचारणेही शक्य झाले नाही.

अनेक दुकानांत फक्त सजावटीचे साहित्य बनवण्याचे काम चालू होते ते बहुतेक देवीचा (छापील ?) चेहेरा आणि बरीच झगमगीत कापडे, माळा आणि "थर्मोकोल" च्या कातीव वस्तू ("शुभेच्छा", दीप, स्वस्तिक इत्यादी शुभ चिन्हे) असे वेगवेगळे "भाग" एखाद्या मखमली/लाल/झगमगत्या कापडावर फेव्हीकॉलने चिकटवून तयार झालेले सगळे चित्र सजावट म्हणून सहज टांगता येईल असे आकर्षक "poojo decorative material" झपाट्याने बनवले जात होते. काही ठिकाणी नुसतेच "थर्मोकोल"च्या कातीव वस्तू रंगवण्याचे काम चालू होते.

मूर्तींकरता कच्चा माल आणि सांगाडा

ऐकीव माहितीप्रमाणे या मूर्तींकरता वापरलेल्या मातीत थोडीशी गणिकेच्या दाराबाहेरील माती देखील घातलेली असते ("देवदास"च्या कुठल्या तरी आवृत्तीत देखील हा उल्लेख आहे). त्याचे कारण (जालावरून साभार) असे समजले की "सभ्य माणसे आपले सगळे पावित्र्य आणि पुण्य गणिकेच्या दाराबाहेर सोडून मगच गणिकेच्या घरात प्रवेश करत असल्यामुळे (असेलही बुवा, आपल्याला काही अनुभव नाही) तिच्या दाराबाहेरील मातीत अमाप पावित्र्य आणि पुण्य साठलेले असते".

मातीमुळे जरी मूर्तींचे बाह्य शरीर बनत असले तरी "सांगाडा" भाताचा पेंढा, दोऱ्या आणि अगदीच मोजक्या तारा यांचा बनवतात. चित्र १ मध्ये कालवलेली माती आणि चित्र २, ३, ४, ५, ६,७ आणि ८ मध्ये अर्धवट बनवलेले दुर्गादेवी, राक्षस इ. इ. आकार दिसत आहेत. हे आकार/"सांगाडे" बनवणारे कारागीर पटापट मोजका पेंढा हाताने किंवा मांडीवर दोर वळल्याप्रमाणे वळवत, दोऱ्या/काथ्या बांधून त्या पेंढ्या ची जाडी कमी जास्त करत (जसे कोपरावरच्या भागातले दंडाचे स्नायू फुगीर दाखवण्याकरता पेण्ढ्याला त्या खाली आणि वर गच्च दोरी बांधल्याने आणि मधल्या भागातला पेंढा थोडा हाताने फ़िस्कारल्याने मधला भाग जाडसर दिसतो) आणि जरूर असेल तर त्यांत तारांचा किंवा कामट्या वापरून आधार देत हात, पाय, मुठी असे वेगवेगळे अवयव प्रथम बनवून ते एकत्र करून सगळ्याच आकृतींचे सांगाडे तयार करत होते. ते उभे रहाण्याकरता कधी मागे बांबूच्या कामट्या लावून मखरासारखे काही किंवा एखादे दांडके लावलेले की जे नंतरच्या सजावटीत लपवले जात असेल, (चित्र ४). "अपूर्ण" स्वरूपातल्या मूर्तीला मूर्तिकार शेवटी काय रूप/आकार देईल हा अंदाज घेणे कठीण, सर्वांगीण असा देखावा फक्त मूर्तिकाराच्या कल्पनेत असावा.

Picture 1

Picture 2

Picture 3

Picture 4
Picture 5

Picture 6

Picture 7

Picture 8
मूर्तीन्चा आकार आणि त्यावर शेवटचा हात (finishing)

देवीच्या शरीराचा "सांगाडा" जरी पेंढा आणि इतर वस्तू वापरून बनत असला तरी चेहेऱ्याचा भाग मात्र मुखवट्याकरताचा एखादा ठराविक साचा वापरून करत असावेत त्यामुळे देवीचे नाक, डोळे वगैरे चेहेऱ्याचे भाग साधारणतः कुठल्याही मूर्तीत सारखेच दिसतात (चित्र ३). जितकी उत्सवमूर्ती मोठ्या आकाराची तितके प्रत्येक आकृतीचे स्नायू, कातडी इ. इ. बारकावे मूर्तिकार आपल्या स्वतःच्या हातानी बनवतो. अगदी प्रत्येक वळी आणि आविर्भाव - जसे रागीट मुद्रा, उंचावलेल्या भुवया, दैत्याचे six packs, दैत्याच्या ताणलेल्या शिरा, सिंहाची आयाळ इ. इ.- बनताना पहाण्याइतका वेळ हाताशी नव्हता पण पुढील चित्रात अशा अनेक लहान मोठ्या बारकाव्यांना अर्धवट स्वरूपांत पाहता येईल.

सिंह बनताना अर्धवट अवस्थेत जो पाहिला तेव्हां लक्षात आले की एका पेण्ढ्याच्या ढिगाऱ्याला किती कौशल्याने अक्राळ विक्राळ रूप दिले जाते. चित्र ९ मध्ये सिंहाचा जबडा जो दिसत आहे तो माती आणि पेण्ढ्याच्या प्राथमिक आकारावर एक टॉवेलचे कापड लपेटून त्यावर/खाली मातीचे थर देऊन बनवलेला आहे, हे मूर्तीकाराने कृपावंत होऊन सांगितल्याने कळले, मूर्तिकाराची नजर नसताना सिंहाच्या डोळ्यांच्या वरच्या भागाला हात लावला असताना खरेच टॉवेलचे कापड हाताला लागले फक्त त्यावरचे रंग काम असे बहारदार केले आहे की हा सिंह केव्हांही डरकाळी फोडेल असे वाटते. चित्र ६ आणि ७ मध्यॆ सिंहाची अपूर्ण आयाळ अजूनही पेण्ढ्याचा पाचुंदा या रूपात दिसते आहे.

Picture 9

देवी, गणपती आणि दानव यांच्या कातडी करता मात्र जास्त तलम/तुळतुळीत कापड वापरले जाते, चित्र ४ मध्यॆ गणपतीच्या पाठीवर अजून न सांधलेले असे कापड दिसत आहे. असे कापड लावतानाच पुन्हा माती आणि रंग यांच्या सहाय्याने स्नायू, शिरा, रागीट आविर्भाव असे मूर्तीविशेष बनवले जातात. चित्र ११ मध्ये अनेक गोष्टी अपूर्ण असतानाही बऱ्याच भागाला सोनेरी रंग आणि देवीचा पूर्ण साज लेववण्याची तयारी सुरू आहे. त्या वरून असे वाटते की काही गोष्टी ज्या येन केन प्रकारेण झाकल्याच जाणार असतील (जसे देवीच्या पोशाखाने), त्या पूर्ण न करताच झाकल्या जात असाव्यात. चित्र ७ मध्येही अपूर्ण भाग असतानाही देवीचा पेहेराव पूर्ण झालेला दिसतो. चित्र ७, ८ आणि १० मध्ये दिसत असल्याप्रमाणे दानवमूर्तीचे केस (नाटकाकरता जसे खोटे केस लावतात तशासारखे लोकर वगैरे पासून बनवलेले), स्नायू, शिरा आणि एकूणच उग्रपणा यावर बरेच काम केले जात असावे.

Piacture 10

Picture 11
आभूषणे (चित्र १२ आणि १३)

वेगवेगळी आभूषणे कापडी (किंवा तत्सम) पट्ट्यांवर माती पसरवून तिला साच्याने आकार देऊन तयार ठेवलेली असतात. अशी "पट्टेदार" तयार आभूषणे आभूषणविरहित पुतळ्यांवर "चढवण्या"करता फक्त कुंचल्याने थोडे पाणी पुतळ्यावर तसेच "पट्टेदार" आभूषणांवर लावून हाताने दाबून थोडा वेळ उन्हात सुकवणे हे काम कुशल हाताने करावे लागते. चित्र १२ मध्ये गळ्यातली माला चढवून झालेली आहे आणि त्याकरता वापरलेल्या पाण्याचे ओघळ अजूनही दिसत आहेत. चित्र १३ मध्ये कमरेवर मेखला चढवली जात आहे.

Picture 12

Picture 13
"इतर" मूर्ती (चित्र १४, १५, १६ आणि १७)

हा व्यवसाय दुर्गापूजेव्यतिरिक्तच्या काळातला असतो. चित्र १४ आणि १५ कुणा एका "षौकीनाचा", त्याच्या छायाचित्राबरहुकूम पुतळा बनवण्याचे काम चालू आहे. चित्र १६ आणि १७ मध्ये दोन भागात तयार झालेला "Dragon" योग्य त्या रंगरंगोटीनंतर एकसंध करून पूर्ण होईल. हा बहुतेक fiber glass मध्ये बनवलेला असावा.

Picture 14

Picture 15

Picture 16

Picture 17
अनेक ठिकाणी तयार असलेल्या मूर्तीन्मध्ये बऱ्यांच रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या होत्या. गणपती, सरस्वती अशा असलेल्या मूर्ती कदाचित इतर दुर्गापूजेशी संबंधित मूर्तीन्शी एकत्रित होण्याच्या प्रतीक्षेत असतील.

ज्या ठिकाणी "नुसते पहा" असे म्हणत चित्र काढण्यास प्रतिबंध केला गेल्यामुळे काय चालले आहे हे फक्त पाहता आले तेथे एक वेगळ्याच तऱ्हेचे काम चाललेले होते. तेथे fiber glass मध्ये केलेले एक relief panel पूर्णावस्थेला नेले जात होते. त्या panel मध्ये उमटलेले ढोबळ आकार कानस वगैरे वापरून जास्त कलाकुसरीचे बनवले जात होते. त्या भित्तिचित्रात अनेक वेगवेगळे कारागीर त्यांची कामे करताना दाखवले होते, जसे लोहार, सुतार आणि त्यांच्या हातांत वेगळी बनवलेली त्यांची आयुधे "चिकटवली" जात होती. हे भित्तिचित्र कुठल्यातरी प्रदर्शनात किंवा त्यानंतर कुठल्या तरी सभागृहात लागणार होते - नीटसे कळले नाही कारण काम करणारी मंडळी काम आटपण्याच्या धांदलीत फारसे बोलू इच्छित नव्हती. किम्बहुना अशीच परिस्थिती मी डोकावलेल्या साधारण २०० -२५० गाळ्यात होती.

कुंभार आळीत जायला वेळच अशी निवडली होती की "पूर्ण तयार" अशी एखादीही मूर्ती दिसली नाही, जिथे दुर्गादेवी पूर्ण तयार होती, तिथे कापडी किंवा वर्तमानपत्राच्या आच्छादनाने ती मूर्ती झाकलेली होती. पण येव्हढे मात्र दिसले की देवाची जास्त चिकित्सा करायला गेल्यावर "भाव तिथे(च) देव" याची प्रचिती येते, नाहीतर पेंढा, माती आणि कापड अशा "मर्त्य" वस्तू वापरून (पण अतिशय आकर्षक) बनवलेल्या मूर्तींना आपण का पवित्र, आदरणीय मानतो?

अंतर्जालावरून साभार :
http://www.speakingtree.in/slideshow/maa-durga-murti-real-reasons-why-s…

https://en.wikipedia.org/wiki/Kumortuli