सुंदर रूपाचं चांदणं....! (भारत उपासनी)

.
.

तुझ्या रूपाचं चांदणं

पोरी जपून ठेवावं

आणि नक्षत्राचं दान

त्यात ओतून ठेवावं //१//

असं टिपूर पडलं

तुझ्या रूपाचं चांदणं

तुला कसं गं सुचलं

माझ्या नावाचं गोंदणं //२//

तुझ्या रूपाचं चांदणं

माझ्या नावाचं गोंदणं

तुझा मेंदीचा गं हात

माझं नक्षीचं कोरणं //३//

तुझ्या हातावर नक्षी

माझ्या नावाची कोरली

चंद्रकोर आकाशीची

उगा स्वतःशी लाजली //४//

कशापायी लाजली गं

चंद्रकोर आकाशीची

मिठी पडली पृथ्वीची

दूरवर क्षितिजाची //५//

माझ्या काळजाच्या पोटी

तुझी पृथ्वी किती मोठी

तुझ्या रूपाचं चांदणं

त्याला क्षितिजाची मिठी //६//

1
.
.
(चित्रः पियुशा)
.
.

कवि : भरत उपासनी

शारदाकुंज,एन थ्री एल २४,सिडको कॉलनी,पहिली स्कीम,नाशिक ४२२००९.

भ्रमणध्वनी : ८०५५८५२९७८.
.