डोनट्सचा इतिहास-जुइ
नमस्कार,
विशेष अंक काढायचा आहे असे कळल्यावर आणि तोही रुची या विषयाशी निगडित असणार हे कळल्यावर माझी चांगलीच गोची झाली. असे वाटले, अरे आपल्याला तर पाक कौशल्यातील लिहिण्यासारखे काहीच येत नाही. मग या विषयावर आपण काय लिहू शकतो? काही तरी लिहिण्याची खूप इच्छा होती पण विषय आपल्याला झेपणारा हवा असेही वाटत होते. शेवटी एक दिवस चेपू वर एक बातमी दिसली "डोनट डे", अरेच्या ही काय भानगड आहे. मग ती बातमी वाचली आणि ठरले की यावरच आपण लिहायचे.
तर जाणून घेऊयात "डोनट डे" ही काय भानगड आहे. ७ जून १९३८ रोजी पहिला राष्ट्रीय डोनट दिवस अमेरिकेत साजरा केला गेला. लष्करातील एका तरुण डॉक्टर Morgan Pett याला एका ठाण्यावर पाठवण्यात आले. तिथे जाताना रस्त्यातल्या एका बेकरीतून डोनट्स विकत घेऊन गेला. ठाण्यावरील जखमी सैनिकांवर उपचार करताना त्याने प्रत्येकाला एक डोनट दिले. त्याच्या रुग्णांपैकी एक लेफ्टनंट जनरल सॅम्युअल गेअरी याच्याबरोबर मिळून जखमी सैनिकांसाठी निधी गोळा करायला सुरुवात केली ज्यातून प्रत्येक जखमी सैनिकाला एक डोनटही दिला हात असे. या निधी संकलनात पुढे Salvation Army ने देखिल भाग घेतला. १९३८ सालापासून सॅल्वेशन आर्मी आजही डोनट डे चा उपयोग निधी गोळा करण्यासाठी करते.
१९१७ साली अमेरिका पहिल्या महायुद्धात सहभागी झाली. त्यावेळी सॅल्वेशन आर्मीतर्फे काही लोक माहिती गोळा करायला फ्रांसला पाठवण्यात आले होते. त्यांच्या अहवालात असे मांडण्यात आले होते की अमेरिकन सैनिकांसाठी काही कॅन्टिन्स सुरू करावीत. ज्यामध्ये बेकरी चे पदार्थ, डिटर्जंट व स्टेशनरी पुरवण्यात यावी.
सदर सूचनेनुसार कॅन्टिन्सचा उपक्रम सुरू करण्यात आला. अशा कॅन्टिन्सला 'हट्स' हे नाव दिले गेले. यामध्ये प्रत्येकी ६ स्वयंसेवकांपैकी ४ महिला असत. अशा हट्स अमेरिकेत आर्मीच्या ट्रेनिंग सेंटर्सजवळ उभारल्या जात.

सॅल्वेशन आर्मीचे जवळजवळ २५० स्वयंसेवक फ्रांसला गेले. त्यांच्या हट्स आता युद्धभूमीजवळील ओसाड इमारतींतून चालवल्या जात. त्यामुळे या हट्स मधून ताज्या पदार्थांचे उत्पादन करणे अवघड जाऊ लागले. त्यावर उपाय म्हणून सॅल्वेशन आर्मीच्या दोन स्वयंसेविका Margaret Sheldon आणि Helen Purviance यांनी अधिक सुटसुटीत पर्याय म्हणून डोनट्स पुरवायचे ठरवले.
ही कल्पना लगेच लोकप्रिय झाली आणि बरेच सैनिक सॅल्वेशन आर्मीच्या या हट्सला भेट देऊ लागले. Margaret Sheldon एकदा असे लिहिले आहे की आज मी २२ पाय बनवले, ३०० डोनट्स आणि ७०० कप कॉफी केली. लवकरच या स्वयंसेविका सैनिकांमध्ये "Doughnut Dollies" या नावाने प्रसिद्ध झाल्या.


हेलनने लिहून ठेवलेल्या नोंदीप्रमाणे सुरवातीला डोनट तळायची शेगडी लहान असे व तळण्याकरिता गुडघ्यातून वाकावे लागे. तरीही दिवसाला दीडशे डोनट्स तयार करण्यात येत असत. नंतर मात्र दिवसाला आठ हजार डोनट्स तयार करण्यापर्यंत मजल पोचली. सुरवातीचे डोनट्स हे डोनट्स सारखे दिसत नसत कारण त्यावेळी डोनट कटरचा वापर केला जात नसे. ती पुढे असेही सांगते की त्यावेळी हटबाहेर लागलेल्या रांगेतील पहिला सैनिक म्हणाला की हे जर युद्ध असेल तर ते असेच चालू राहो!
आता पाहूयात या डोनट्स चा नंतर प्रसार कसा झाला. १९५० साली विल्यम रोसेनबर्ग यांनी क्वीन्सी मॅसेच्युसेटस डंकीन डोनट्स ही बेकरी सुरू केली. या बेकरीचे रूपांतर फ्रंचायझी तत्त्वावर चालणार्या कंपनीमध्ये झाले. स्थापना झाल्यापासून सुमारे ११,००० रेस्टॉरंट्स ३३ वेगवेगळ्या देशांमध्ये सुरु झाले आहेत.
क्वीन्सी येथील डंकिन डोनट्सच्या पहिल्या दुकानाचा सध्याचा फोटो.
![]()
ओल्ड फॅशन्ड डोनट्स

विविध प्रकारचे डोनट्स

सर्व माहिती व फोटोज जालावरून साभार.