मला आणि माझ्या लेकाला नॅशनल जिओग्राफिकवरचे फूड हिस्टरीवरचे कार्यक्रम बघायला खूप आवडतात. मध्ये एक कार्यक्रम बघताना रोचक शोध लागला की पिझ्झा हा जगात सर्वाधिक खाल्ले जाणार्या पदार्थांमध्ये मोडतो! अमेरिकेत तर म्हणे दर तिसरा मनुष्य पिझ्झा खात असतो. मुळातला इटालियन पदार्थ अमेरिकेत जाऊन कसा बरं एवढा प्रसिद्ध झाला याचे कुतूहल वाटून पिझ्झा काय "चीज" आहे बघुया तरी. म्हणून पिझ्झाचा इतिहास शोधायला घेतला आणि साकार झाली ही पिझ्झाची गोष्ट.
तसा पिझ्झाच्या चपट्या ब्रेडचा प्रकार फार जुना. अगदी सात हजार वर्षांपूर्वी देखील भाजलेले ब्रेड संशोधकांना मिळालेले आहेत. इटलीतल्या पोंम्पे शहरात तर दोन हजार वर्ष जुन्या लाकडाच्या भट्ट्या अजूनही दिसतात. प्राचीन ग्रीक लोक प्लाकोउस नावाचा ब्रेड, त्यावर कांदा, लसूण आणि हर्ब़्ज घालून खात असत. हा ब्रेड पिझ्झाचा जनक मानला जातो! तरी पिझ्झाला खरी ओळख मिळाली ती इटलीतल्या नेपल्समध्ये!
इसपूर्व ६००च्या आसपास नेपल्स हे समुद्र किनार्यावरचे एक भरभराटीला आलेले संस्थानच होते. इथे बंदर असल्याने काहीतरी काम मिळेल या आशेने अनेक गरीब लोक नेपल्सला येऊन रहात. नेपल्स अशा गरीब, बेघर लोकांचे गाव म्हणूनच प्रसिद्ध होते. या लोकांना पटपट खाणे संपवून कामावर जाता येईल अशा स्वस्त आणि मस्त अन्नाची गरज असे. गरज ही शोधाची जननी या न्यायाने तिथे अनेक फेरीवाले, छोटे हॉटेलवाले चपट्या ब्रेडवर निरनिराळे पदार्थ घालून त्याला चविष्ट बनवून विकत असत. या कळकट हाटीलात खाल्ल्या जाणार्या गरीबांच्या या पदार्थाची त्या काळात कुचेष्टाच होत असे.
कालांतराने कोलंबसाच्या अमेरीकावारीमुळे इटलीत टोमॅटो खर्या अर्थाने प्रवेशला. उच्चभ्रू लोकांनी त्याला विषारी फळ म्हणून नाकारले तरी गरीबांना मात्र ते फार आवडले. त्यामुळे पिझ्झा ब्रेडवर टोमॅटोचा सढळ हस्ते वापर होऊ लागला. एव्हाना टोमॅटो, चीज, ऑलिव्ह ऑइल आणि अॅन्चोवीज यांची पखरण असणारा पिझ्झा नेपल्समधला प्रसिद्ध खाद्य पदार्थ झाला होता. त्यात १८६१मध्ये इटलीचे एकत्रीकरण झाले. नेपल्स आता इटली देशाचा एक भाग झाले. १८८९ मध्ये त्यावेळचा इटलीचा राजा उम्बर्टो आणि राणी मार्गारिटा, इटली भ्रमण करता करता नेपल्सला आले. आत्तापर्यंतच्या प्रवासात त्यावेळची डेलिकसी असणारे फ्रेंच खाद्यपदार्थ खाऊन कंटाळलेल्या राणीने पिझ्झा खाऊन बघायचे ठरवले. आले राणीच्या मना तेथे कोणाचे चालेना! मग त्यावेळचा प्रसिद्ध पिझ्झानिर्माता एस्पोसितोला राणीसाठी पिझ्झाचे निरनिराळे प्रकार बनवायची ऑर्डर दिली गेली. त्या सर्वातला राणीला भावला तो इटलीच्या राष्ट्रध्वजाचे रंग असणारा पिझ्झा. यात लाल टोमॅटो, पांढरे चीज आणि बेसिलची पानं वापरली होती. राणीला आवडलेला पिझ्झा म्हणून या पिझ्झाला पिझ्झा मार्गारिटा हेच नाव पडले!

अशा रीतीने राणीचा आशिर्वाद मिळाल्याने पिझ्झा की तो चल पडी! इटलीच्या निरनिराळ्या भागात तिथल्या वैशिष्ट्यानुसार पिझ्झा बनायला लागले.अजूनही तिथल्या स्थानिक वैशिष्ट्यासह बनतात. पिझ्झा मरिनारा हा एक लोकप्रिय पिझ्झाचा प्रकार. हाही नेपल्सचाच एक पारंपारिक पिझ्झा. याचे नाव मरिनारा पडायचे पण एक कारण आहे. हा पिझ्झा खलाशांच्या बायका, त्यांचे नवरे मासेमारी करून दमून घरी आले की त्यांच्यासाठी बनवायच्या! यात ओरिगॅनो, अॅन्चोवीज आणि लसूण वापरलेला असतो.

कॅप्रीच्या पिझ्झामध्ये मश्रुम, ऑलीव्ह्ज, उकडलेले अंडे वापरले जाते.

तर सिसिलीच्या पिझ्झामध्ये हिरवे ऑलिव्ह्ज, सी-फूड, वाटाणे, अंडी वापरली जातात.

अश्या या बहूढंगी पदार्थाची ख्याती महायुद्धापर्यंत तरी इटलीपुरतीच मर्यादित होती. मात्र महायुद्धाच्या आसपास आणि नंतर इटालियन लोक मोठ्या प्रमाणात अमेरीकेत स्थलांतरित होऊ लागले. गरीब नेपल्सवासियांना अमेरीकेतल्या कारखान्यांमध्ये नोकर्या मिळू लागल्या. स्थिरस्थावर झाल्यावर त्यांना आपल्या लाडक्या खमंग पिझ्झाची आठ्वण येऊ लागली. मग हळूहळू तिथेच बिनापरवाना पिझ्झेरिया सुरू होउ लागले! मॅनहॅटनमध्ये १९०५साली लोम्बार्डीजचा पहिला अधिकृत पिझ्झेरिया सुरू झाला. मात्र अमेरिकन लोक पिझ्झाला फास्ट फूड म्हणूनच बघायला लागले आणि पिझ्झा मध्ये खास अमेरीकन बदल होऊ लागले. फक्त ऑलिव्ह, चीज, टोमॅटो असणार्या पिझ्झावर चिकन, अंडी, सलामी ते स्मोक्ड सामन अशी टॉपिन्ग्ज येऊ लागली. पिझ्झाने अमेरीकेला वेड लावले. इतके की पिझ्झा हा इटलीतला पदार्थ हे विसरून अमेरिकनच झाला!



इटलीत मात्र आता पारंपारिक पिझ्झाच्या बनवण्याच्या पद्धतीचे युरो सर्टिफिकेशन झाले आहे. २०१० पासून नेपल्सच्या पिझ्झाला STG हे युरोपियन युनियनकडून मानांकन मिळालंय. STG चा अर्थ पारंपारिक पद्धतीची गॅरेंटी असणारा पिझ्झा. या प्रकाराने पिझ्झा बनवण्याचे साहित्य, कृती हे सर्व आता कायद्याने नियंत्रित झाले आहे. त्याच प्रमाणे आता या पिझ्झासाठी ठराविक कणीक वापरली जाते, मळली जाते. त्याचा आकारही ठराविक असतो. हा पिझ्झा लाकडाच्या भट्टीतच भाजला जातो. अशा प्रकारे नियंत्रण आणून जुनी चव जपण्याचा प्रयत्न होतोय. नेपल्समध्ये STG नामांकन असलेल्या पिझ्झेरियात पिझ्झाचा स्वाद जरूर घ्यावा.

एकीकडे असे नियंत्रित पिझ्झे बनत आहेत तर दुसरीकडे पिझ्झा हट, डॉमिनोज, पापा जोन्स सारख्या पिझ्झा दुकानांच्या साखळ्या जगभरात पसरत आहेत, जे अर्ध्या तासात पिझ्झा हातात आणून द्यायला लागले आहेत. पिझ्झाला खरेखूरे वर्ल्डफूड बनवण्यात या साखळ्यांचा मोठ्ठा वाटा आहे.

तर अशी ही गरीबाचे अन्न म्हणून खाल्ले जाऊ लागलेल्या ते आताचे महागडे अन्न बनलेल्या पिझ्झाची शुक्रवारची कहाणी! सुफळ संपूर्ण!
( या लेखातील सर्व प्रचि आंतरजालावरून साभार )