प्रकार १
साहित्य - दीडशे ग्रॅम सुवासिक तांदूळ, तांदळाच्या पाऊणपट गूळ, एक चमचा तूप, पाच ते सहा वेलदोडे, एक टेबलस्पून तीळ, एक टेस्पू सुक्या खोबर्याचा कीस, अर्धा टेबलस्पून खसखस.
कृती - या लाडूसाठी तांदूळपिठी तयार करून घ्यावी लागते. सुवासिक तांदूळ कढईत गुलाबी रंगावर भाजून घ्यावेत. मग ते गरम असतानाच बुडतील एवढ्या गार पाण्यात भिजवून ठेवावेत. दहा मिनिटांनी चमच्याने हलवून पाणी ओतून द्यावे व तांदूळ सावलीत एका स्वच्छ कापडावर पसरून ठेवावेत. तीन ते चार तासात ते साधारण सुकतील. अगदी किंचित दमट असायला हवेत. आता त्याची मिक्सरमध्ये वस्त्रगाळ पूड करून घ्यावी. कण्या राहता कामा नयेत. कढईत तीळ, किसलेले सुके खोबरे, खसखस गुलाबी रंगावर भाजून घेऊन वेगळे काढून ठेवावेत. वेलदोडे कुटून घ्यावेत. आता कढई पुन्हा मध्यम आचेवर ठेवून त्यात बारीक चिरलेला गूळ, तूप, घालून हलवत रहा. गूळ विरघळून पाकातून बुडबुडे येऊ लागतील. त्यात भाजून ठेवलेले खोबरे, तीळ, खसखस व वेलदोडा पूड घालावी. तांदुळाची पिठी घालावी. एकजीव करावे. आता आच बंद करून मिश्रण कोमट होऊ द्यावे. मग त्याचे चित्रात मध्यभागी दाखवलेल्या आकाराचे लाडू बांधावेत. वरील साहित्यात मध्यम आकाराचे १० लाडू होतील. हे लाडू विशेषत: शाकंभरीच्या नवरात्रात प्रसादाला केले जातात.
प्रकार २
साहित्य - भाजके डाळे १०० ग्रॅम, तेवढाच गूळ बारीक चिरून, ७० ग्रॅम तूप, वेलदोडापूड, सुके खोबरे २ टेस्पू, तीळ २ टेस्पू, खसखस १ टेस्पू.
कृती- प्रथम कढईत भाजके डाळे जरा गरम होईपर्यंत परतावे व गार होण्यास काढून ठेवावे. गार झाल्यावर त्याची बारीक पूड करावी. कढईत तीळ, खसखस व खोबरे गुलाबी रंगावर भाजावे व काढून ठेवावे. आता त्याच काढईत भरपूर तूप, गूळ असे पाक होण्यास घालावे. बुडबुडे येऊ लागताच सर्व जिन्नस घालून नीट एकत्र करावे. हाताला सोसवेल असे झाले की लाडू वळावेत. चित्रातील गोल वळलेले लाडू डाळ्याचे आहेत.