भेंडी पुराण

आपल्याला नेहमी सांगितले जाते की भाज्या खाणे आरोग्याला गरजेचे असते. भेंडी ही भाजी अशी आहे कि ज्याला आवडते त्यांना खूपच नाहीतर मग नो नो नो. कोणीही करु दे चेष्टा भेंडीची पण भाजीत भाजी भेंडीची आणि भेंडी माझ्या प्रितीची!

.

* छायाचित्र आंतरजालावरुन साभार

मग चला तर आज भेंडी पुराण मध्ये काही नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळे प्रकार बघुयात.

१. भेंडीची भाजी :

भेंडी धुवून, स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी. बारीक चिरून घ्यावी. तेल गरम करून त्यात आले लसुण ठेचून घालावा आणि परतून घ्यावे. मग त्यात चिरलेली भेंडी आणि कोकम घालून परतून घ्यावे. भेंडी शिजताना त्यावर झाकण ठेवू नये. कोकम घातल्याने भेंडीचा चिकटपणा कमी होतो. चिकटपणा कमी झाल्यावर त्यात तिखट, मीठ घालून नीट एकत्र करून घेणे. मग भाजी नीट शिजली की शेंगदाण्याचा कुट घालून परत एकदा परतून घेणे. मस्त गरम थोडीशी कुरकुरीत भेंडी भाजी तयार.

२. भरली भेंडी : (प्रकार १)

भेंडीला मधोमध एक चीर देणे. जर खुप लांब असेल तर दोन तुकडे करून मग चीर देणे. सारण करण्यासाठी बेसन, कोरडे किसलेले खोबरे भाजून घेणे. त्यात दाणे कुट, मीठ, साखर, तिखट, कोथिंबीर, लिंबाचा रस किंवा आमचुर पावडर, धणे जीरे पुड, थोडासा गरम मसाला हे नीट एकत्र करून घ्यावे. किंचित ओले करून करून घ्यावे. आता हे सारण भेंडीमध्ये भरावे. तेल गरम करून भेंडी शॅलो फ्राय करून घ्यावी. अगदीच सारण भरायचा कंटाळा आला तर आधी गरम तेलात भेंडी फ्राय करून मग हे सारण त्यात एकत्र करावे. चुरचुरीत चमचमीत भेंडी फ्राय तयार आहे.

३. भरली भेंडी : (प्रकार २)

भेंडीला मधोमध एक चीर देणे. जर खुप लांब असेल तर दोन तुकडे करून मग चीर देणे. सारण करण्यासाठी शेंगदाण्याचा कुट, आले लसुण पेस्ट, तिखट, मीठ, धणा जीरा पावडर, गरम मसाला, कोथिंबीर, लिंबाचा रस किंवा आमचुर पावडर एकत्र करून भेंड्यांमध्ये भरून घ्यावे आणि तेल गरम करुन शॅलो फ्राय करून घ्यावे. चुरचुरीत चमचमीत भेंडी फ्राय तयार आहे.

४. भेंडी बटाटा फ्राय :

बटाटा आणि भेंडी बारीक चिरुन घेणे. तेल गरम करून आधी बटाटा कुरकुरीत परतून घ्याव्या. नंतर त्यात भेंडीचे तुकडे परतून घ्यावेत. भेंडी सोबत कोकम सुद्धा घालावे. भेंडी बटाटा मस्त कुरकुरीत झाला की मीठ, तिखट, साखर घालुन नीट एकत्र करून घ्यावे. गरमागरम भेंडी बटाटा फ्राय तयार आहे.

५. भेंडी दो प्याझा :

भेंडीचे मोठे तुकडे करवेत. तेल गरम करून त्यात भेंडी परतून घ्यावी. आता परतलेली भेंडी बाजूला काढून ठेवावी. त्यातच थोडे तेल गरम करून जीरे, हिंग, आले लसुण पेस्ट परतून घ्यावी. त्यात उभा चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यात टोमाटो परतून घ्यावा. तिखट, गरम मसाला घालून सगळे एकत्र करावे. आता त्यात थोडेसे दही घालून परतुन घ्यावे. परतलेली भेंडी, कसुरी मेथी, मीठ घालून नीट एकत्र करून मस्त एकत्र करावे. कोथिंबीर घालून गरमागरम भेंडी दो प्याझा खायला तयार.

६. भेंडीचा रायता :

भेंडी बारीक चिरून तेलात कुरकुरीत तळुन घ्यावी. दह्यामध्ये मीठ, साखर, तिखट घालून एकत्र फ़ेटून घ्यावे. तेल गरम करून मोहरी, जीरे, हिंगाची फोडणी करावी आणि दह्यामध्ये एकत्र करावी. खायला घेताना दह्यामध्ये तळलेली भेंडी, चाट मसाला, कोथिंबीर घालून एकत्र करावे. ज्यांना मऊ मऊ भेंडी आवडते त्यांनी आधी रायता तयार करून ठेवावा. मला कुरकुरीत आवडते म्हणुन मी आयत्या वेळी दही आणि भेंडी एकत्र करते.

७. भेंडीचे कालवण :

हा प्रकार मला माझ्या वडीलांनी शिकवला. श्रावणात नामसप्ताह चालू असला की घरी मासे चिकन अजिबात बनत नाही अशा वेळी हे कालवण तारणहार असते. ओले खोबरे, थोडासा कांदा, लसुण, तिखट, थोडीशी कोथिंबीर ह्याचे वाटण करून घ्यावे. आता तेल गरम करून त्यात थोडासा कांदा परतून घ्यावा. जास्त कांदा वापरू नये त्याने कालवण बुळबुळीत होते. आता त्यात वाटण घालून परतून घ्यावे. त्यात भेंडी घालून एकत्र करावे. भातासोबत खाता येईल इतके पाणी घालून पातळसर करून घ्यावे. कोकम घालून उकळी आणावी. भेंडी शिजली की मीठ घालुन नीट एकत्र करून घ्यावे. ह्यात आधी परतून घेवून सगळ्या वाटपाला उकळी आली की शेवटी भेंडी घातली तरी चालेल. कोथिंबीर घालून गरमागरम भातासोबत कालवण म्हणजे स्वर्गसुख.

८. भेंडी फ्राय :

भेंडी उभी चिरून घ्यावी. तेल गरम करून त्यात भेंडी कुरकुरीत परतून घ्यावी. कोकम वापरले तर ते भेंडी परतत असताना घालवे. ह्यात तिखट, मीठ, गरम मसाला, धणे जीरे पुड, कोकम वापरले नसेल तर आमचूर घालून नीट परतून घ्यावे. भेंडी फ्राय तयार आहे.

अशाप्रकारे भेंडीचे वेगवेगळे प्रकार करत राहावेत आणि भेंडीवर अपार प्रेम आणि निष्ठा कायम ठेवावी.
इति श्री भेंडी पुराण समाप्ती.