कोशिंबिरी

.

* छायाचित्र कोलाज आंतरजालावरुन साभार

आपल्या मराठी जेवणात ताटाच्या डाव्या बाजूच्या पदार्थांचंही एक वेगळंच महत्त्व आहे. नुसतं बोट लावून चाखलं की जेवणाचा स्वाद आणि चव वाढवणारे हे पदार्थ. आजकालच्या डायेटवर लक्ष देऊन खाण्याच्या जमान्यात सॅलड्चं महत्व फारच वाढलंय. आपल्या कोशिंबिरीही हेच काम करतात आणि जेवणातली मजा वाढवतात. अशा या कोशिंबिरीचे काही प्रकार पाहूया.

रंगीत कोशिंबीर

साहित्य: एक वाटी प्रत्येकी मक्याचे वाफवलेले दाणे, मटार, डाळिंब, ओले खोबरे, कोथिंबीर, मीठ, चाट मसाला, हिरवी मिरची घालून फोडणी.

कृती: सर्व जिन्नस एकत्र करून त्यात लिंबू पिळावे. मीठ, चाट मसाला घालून कालवून वरून फोडणी घालावी.

पंचामृत

साहित्यः पाव वाटी प्रत्येकी भाजलेले दाणे, खोबर्‍याचे तुकडे, मिरचीचे तुकडे, तीळ कूट, बेदाणे, चिंचेचा कोळ, गूळ, चवीपुरते मीठ, फोडणी.

कृती: कढईत हिंग, मोहोरी, हळदीची फोडणी करून त्यात मिरच्या घाला. त्यातच दाणे, खोबरे काप, बेदाणे घालून हलवा. थोडे पाणी घालून त्यात चिंचेचा कोळ, मीठ, गूळ आणि तीळकूट घाला. सरसरीत झाले की आच बंद करा.

लाल माठाच्या देठाची कोशिंबीर

श्रावणात आमच्या भागात प्रत्येक घरात लाल माठाच्या देठाचे प्रकार होतातच. त्याची ही कोशिंबीर.

साहित्यः माठाचे कोवळे देठ, ओलं खोबरं, मीठ, साखर, लिंबू.

कृती: सर्व एकत्र करून लिंबू पिळून घालावं. लगेच खायला घ्यावी.

मुळ्याचा चटका

साहित्यः एक वाटी मुळ्याचा कीस, पाव वाटी भिजवलेली हरभरा डाळ, एक हिरवी मिरची, मीठ, जिरे, कोथिंबीर, दही, साखर, फोडणी.

कृती: हरभरा डाळ वाटून घ्या. त्यात मुळ्याचा कीस, मीठ, मिरची, जिरे, साखर, कोथिंबीर घाला. दही घालून कालवा. त्यात फोडणी टाकून घ्या.

लाल भोपळ्याची कोशिंबीर

साहित्यः लाल भोपळ्याच्या शिजवलेल्या फोडी एक वाटी, दोन चमचे दाण्याचा कूट, मीठ, दही, साखर, तूप, जिरे, मिरची घालून फोडणी.

कृती: सर्व साहित्य एकत्र करून कालवा. त्यावर तूप, जिरे, मिरचीची फोडणी घाला. अशीच दुधी भोपळ्याचीही कोशिंबीर छान होते.