मुद्रितशोधन करताना

|| श्री गुरवे नम: ||

मुद्रितशोधन करताना उपयुक्त ठरतील अशा काही गोष्टी

मिपावर मुद्रितशोधन करताना लेखनामध्ये काही चुका नेहमी आढळतात. कदाचित संगणकावर इंग्लिश कळपाट वापरून मराठी टंकण्यामुळेही या चुका होता असाव्या. सा.सं.मं. सदस्यांना थोडी मदत व्हावी, म्हणून नेहमी आढळणार्‍या काही चुका पुढे दिल्या आहेत.

शब्द आणि विरामचिन्ह यामध्ये शब्दांतर (स्पेस) : शब्दानंतर विरामचिन्ह आल्यास दोघांमध्ये शब्दांतर नको. उलट, विरामचिन्हांनंतर शब्द आला, तर एक शब्दांतर हवंच. श्रीरंग जोशी यांनी ही चूक याआधीच दाखवून दिली आहे.
तसंच, दोन शब्दांमध्ये फक्त एकच शब्दांतर हवं.
संवाद लिहिताना दुहेरी अवतरण : “****”
वाक्यात ‘तर’ शब्द आल्यास त्याच्या आधीच्या शब्दानंतर स्वल्पविराम , येतो. उदा. “मी आलो, तर उद्याच येईन,” त्यांनी एकाच वर्षात हे साध्य केलं, तर मला मात्र तीन वर्षं लागली.

ग्रांथिक आणि बोली भाषेत लेखन : लेखनशैलीचे दोन प्रकार म्हणजे ग्रांथिक (म्हणजे थोडं औपचारिक, पुस्तकी) आणि बोलीभाषा. ग्रांथिक लेखनात ‘पिवळे’. ‘सगळे’, ‘गाणे’, ‘त्याचे’, ‘माझे’, ‘केले’, ‘सांगितले’, ‘होते’ असं लिहितात; तर, बोली भाषेत हेच शब्द 'पिवळं', 'सगळं', 'गाणं', 'त्याचं‘, 'माझं', 'केलं’, ‘सांगितलं’, होतं’ असे लिहिले जातात. (माझं हे सर्व लेखन बोली भाषेत आहे, हे तुम्ही ओळखलं असेलच, कारण मी तुमच्याशी ‘संवाद’ साधतो आहे.) ग्रांथिक भाषेतल्या लेखनातले फक्त संवाद बोली भाषेत लिहिले तर चालतं, एरवी मात्र या दोन्ही पद्धतींची सरमिसळ होऊ देऊ नये. दोन्हीपैकी एकच (लेखकाने स्वीकारलेली) पद्धत ठेवावी, यांचं स्वैर मिश्रण वर्ज्य आहे.

याचप्रमाणे ‘घडविले’, ‘घडविण्यासाठी’, ‘पुरविताना’, ‘चालवितो’ ही रूपं (या पद्धतीला ‘इडागम’ म्हणतात) आणि ‘घडले’, ‘घडण्यासाठी’, ‘पुरताना’, ‘चालतो’ ही रूपं (म्हणजे इडागम वापरणं आणि न वापरणं) असं एकाच लेखात किवा पुस्तकात स्वैर मिश्रण वर्ज्य आहे.

चुकीचं लेखन -> बरोबर लेखन यानुसार पुढे काही शब्द दिले आहेत.

‘र’ला र्‍ह्स्व आणि दीर्घ उकार :
सुरु, करु, करुन, घाबरुन, विसरुन, रुक्ष, रुप, स्वरुप -> सुरू, करू, करून, घाबरून, विसरून, रूक्ष, रूप, स्वरू

सुरूवात, रूमाल, रूपये, रूसवा, रूखवत, रूची, रूजू, रूदन, तरूण -> सुरुवात, रुमाल, रुपये, रुसवा, रुखवत, रुची, रुजू, रुदन, तरु

नालाज -> नालाज
करणार्या, जाणार्या -> करणार्‍या, जाणार्‍या

पहात/तो/ते/तात, रहात/तो/ते/तात, वहात/तो/ते/तात, नहा*, सहा* -> पाहतो/ते/तात, राहत, वाहत/तो/ते/तात, नाह*, साह*..
फक्त आज्ञार्थी वापरताना ‘पहा’, ‘रहा’, ‘वहा’ अशी रूपं चालतात. उदा. “हे पहा, हे फूल वहा आणि बाजूला उभा रहा.”

घे, हो, दे -> घे, हो, दे.. याचप्रमाणे खाऊ, येऊ, पिऊ, घेऊ, देऊ, जाऊ, गाऊ, धुऊ, भिऊ..

खावू, खावून, येवू, येवून, पिवून, घेवून, देवून, जावून, गावून, धुवून, भिवून -> खा, खान, ये, येन, पिन, घेन, देन, जान, गान, धुन, भि
टीप : खा, ये, पी, घे, दे, जा, गा, धू, भी हे सर्व एकाक्षरी धातू आहेत.

जेन, ठेन, चान, लान, खन, धान.. -> जेवून, ठेवून, चावून, लावून, धावून..

ळाले/लं, कळाले/लं, -> जले/लं, कले/लं

यावेळी, त्यावेळी, कधीकाळी .. -> या वेळी, त्या वेळी, कधी काळी,
एकजण, सर्वजण.. -> एक जण, सर्व जण
याप्रकारे, सर्वप्रकारे.. -> या प्रकारे, सर्व प्रकारे..
जाऊया करूया निघूया -> जाऊ या, करू या, निघू या..

मलापण, तेपण.. -> मलाही, तेही, मलासुद्धा, तेसुद्धा. ('पण' हे but अशा अर्थी वापरलं पाहिजे.)

*मधे -> मध्ये

तू माझी मदत कर; मी तुझी मदत करतो -> तू मला मदत कर; मी तुला मदत करतो.

संपर्क कर* -> संपर्क साध*.

‘ह्या’ आणि ‘या’ : ‘ह्या’ हा शब्द बरोबर आहे, पण ‘ह्या’ऐवजी ‘या’ हे रूप वापरायला सोपं आहे, ते चालतं. मात्र एकाच लेखनात दोघांचं स्वैर मिश्रण वर्ज्य.

दिवाळी किंवा विशेषांकाचं मुद्रितशोधन करताना मला कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी मला मदत करता यावी ही सा.सं.मं. सदस्यांची तळमळ खूप जाणवली. म्हणून सध्या इतकंच सुचलं आहे, ते लिहून काढलंय. आणखी काही आठवलं, तर इथे लिहीनच.