श्रीगणेश लेखमाला फारच छान झाली. या लेखमालेचा समारोप करण्यासाठी काही ओळी खरडल्या आहेत, बघा कशा वाटतात. काही सुधारणा / बदल सुचवा, काही राहून गेलं असेल तर सांगा. आज किंवा उद्या प्रकशित करावा असं वाटतं.
श्रीगणेश लेखमाला : एक सिंहावलोकनात्मक चिंतन
सार्वजनिक श्रीगणेशोत्सव म्हणजे गेल्या शतकभरापासून चालत आलेली महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपराच. या उत्सवाच्या तीन-चार महिने आधीपासूनच सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उत्सवाच्या तयारीला सुरुवात करतात. मिपाच्या संपादक आणि साहित्य संपादक मंडळाचंही तसंच काहीसं झालं. १२ जून २०१५ ला आदूबाळनी मंडळापुढे श्रीगणेशोत्सवानिमित्त एका करियर विषयक लेखमालेचा प्रस्ताव मांडला. तिचं आयोजन, लेखक, याविषयी बरीच चर्चा झाली. सं.मं.च्या आणि सा.सं.मं.च्या सर्वच सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन आपली मतं मांडली, मोलाच्या सूचना केल्या आणि ही लेखमाला करायची असं ठरलं. शशकच्या यशस्वी आयोजनामुळे नवीन काहीतरी करायचा उत्साह वाढला होताच.
या लेखमालेच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, मिपासदस्य विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, त्यांच्या विविध करियरविषयी लेख हा एक भन्नाट विषय होता. लेखकांनी वेळ काढून खरोखर मनापासून लेख लिहिले आणि वेळेत संपादकांकडे पाठवले. संपादकांनी केलेल्या सूचना स्वीकारून वेळोवेळी सुधारणा करून दिल्या. स्वत:बद्दल लिहायचं म्हणजे कधीकधी ‘जरा जास्तच’ चांगलं, आत्मप्रौढीयुक्त किवा मग स्वत:ला फारच कमी लेखणारं, सगळ्या चुकांचं उत्तरदायित्व स्वत:कडे घेणारं लेखन व्हायची शक्यता असते. मात्र या लेखमालेतले सर्व लेख अत्यंत प्रांजळ आहेत, कोणताही अभिनिवेश न घेता, कोणत्याही अहम्- किंवा न्यूनगंडाशिवाय लिहिले आहेत, हे कुणीही मान्य करेल. सर्व लेखांचं हे पहिलं सामाईक वैशिष्ट्य, आणि सर्व लेखकांचं कौतुक याचसाठी.
मेडिकल आणि इंजीनियरिंग या नेहमीच्या शाखांमधून शिकूनही, इतरांप्रमाणे स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय करून / गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्या मिळवून भरपूर पैसा मिळवण्याच्या रुळलेल्या वाटा सोडून काहीतरी वेगळं करायची जिद्द दाखवली ती प्रास, कॅप्टन जॅक स्पॅरो आणि अन्य दातार यांनी. आपल्याला आवडेल त्या विषयाचं शिक्षण घेऊन त्यात त्यांनी वेगळी वाट धरली आहे. ‘मिपाचा बॅनरमॅन’ अभ्याचं तसंच काहीसं. त्याच्या कथनामध्ये कलावंताचा कलंदरपणा, मनस्वीपणा (आणि कदाचित यामुळेच येणारी सर्जकता) पुरेपूर दिसतो. प्रज्ञा देशपांडे यांनीही पत्रकारिता हे आपल्याला आवडणारं क्षेत्र निवडून त्यात एक वेगळीच उंची गाठली. या क्षेत्रातले अनुभव त्यांनी त्यांच्या दुसर्या लेखात मांडले आहेत.
तर, पिशी अबोली, लाल टोपी, मृत्युंजय, बोका-ए-आझम यांनी जाणीवपूर्वक अनवट वाटा निवडल्या. या वेगळ्या वाटांवरून चालताना त्यांना आलेले अनुभवही अगदी वेगळे, त्यांचं (आणि आपलंही) भावविश्व समृद्ध करणारे. आपापल्या व्यवसायानिमित्त लाल टोपींनी अर्धं जग पालथं घातलं आहे, तर पिशी अबोली महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यात फिरल्या आहेत आणि बोका देशभरात विविध ठिकाणी फिरून नवी पिढी घडवायचं काम करताहेत. मृत्युंजय यांच्या क्षेत्राबद्दल तर सुशिक्षितही अज्ञानी आहेत हे वाचून गंमत वाटते.
आपण एका क्षेत्रांसंबंधी शिक्षण घेतो आणि शेवटी वेगळ्याच क्षेत्रात आपला झेंडा (तोही दूरदेशात!) उंच फडकतो, याचं उदाहरण म्हणजे पेठकरकाका. आपल्या ‘ताटात’ काय वाढून ठेवलं आहे ते आपल्याला माहीत नसतं, आणि ते एकदा समजलं की ‘भरल्या ताटाने’ आपण दुसर्यांना तृप्त करतो, असे त्यांचे अनुभव खरोखर ‘रुचकर’ आहेत.
आपल्या आवडीचं क्षेत्र जाणीवपूर्वक निवडून त्यात करियर करा हे ‘थ्री इडियट्स’मधलं रँछो सूत्र सर्वांनाच पटतं-जमतं असं नाही. या सर्वांनी ते केलंच; त्याचबरोबर आपल्या कारकिर्दीच्या वाटचालीमध्ये अनेक टक्केटोणपे खावे लागतात, कडू प्रसंग अनुभवावे लागतात, त्यांनी खचून न जाता त्यातून मार्ग काढायची जिद्द या सर्वांच्या कथनातून जाणवते. सर्व लेखांचं आणि लेखकांचं हे दुसरं सामाईक वैशिष्ट्य.
मिपासारखं संस्थळ म्हणजे अनेकांना व्यक्त होण्याची संधीच. व्यक्त होणं इथे महत्त्वाचं, शुद्धलेखनाचा आग्रह धरणं फार आवश्यक नाही. मात्र, जेव्हा अशा लेखमाला, दिवाळी अंकासारखे विशेष अंक प्रकाशित करायचे असतात, तेव्हा संपादकीय दृष्टीकोनातून शुद्धलेखनाकडे लक्ष देणं आवश्यक ठरतं. या लेखमालेतल्या लेखांचं मुद्रितशोधन करताना विशेष अनुभव आला. एक तर, सगळेच चांगले अनुभवी लेखक असल्यामुळे त्यांच्या लेखनात शुद्धलेखनाच्या फारशा दुरुस्त्या कराव्या लागल्या नाहीत. ज्या काही थोड्या दुरुस्त्या कराव्या लागल्या, त्यांचं लेखकांनी स्वागत केलंच, शिवाय व्यनिद्वारे त्यांचं स्पष्टीकरणही जाणून घेतलं आणि यापुढे योग्य शुद्धलेखन करायचं ठरवलं. आपलं काम जास्तीत जास्त चांगलं करण्याचा ध्यास आणि त्यासाठी नवीन काहीतरी शिकायची तयारी त्यांच्या व्यवसायक्षेत्रातही दिसते, हे सर्वांचं तिसरं वैशिष्ट्य.
सर्वच लेखांना मिपाकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कुणी या लेखांना मोदकाचं रूपक दिलं, आणि सर्वांनी रोज नव्या मोदकाची वाट पाहिली. प्रत्येक लेखकानेही इतर लेखांचं कौतुक करणारे प्रतिसाद दिले. असे प्रतिसाद मिळणार असतील, तर लेखकालाही लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. या लेखमालेने काही लेखकांना आणि प्रतिसादकांनाही पुन्हा लिहितं केलं, हाही एक फायदाच झाला. भरघोस प्रतिसादांसाठी वाचकांचंही कौतुक करायलाच हवं.
लेखांवर संपादकीय संस्कार झाल्यावर, भारतीय प्रमाणवेळेनुसार रोज रात्री बारा वाजता एक असे दहा लेख प्रकाशित करायचे होते. सं.मं.ने (पैसाताईंनी) ही जबाबदारी पार पाडली आहे. आपापले व्यवसाय-नोकर्या सांभाळून संपादक मंडळी मिपासाठी एकूणच खूप काम करतात. संपादक मंडळ म्हणजे या लेखमालेचा (आणि एकूणच मिपाचा) ‘पाठीचा कणा’ आहे.
या लेखमालेमुळे आपल्यातल्याच काही जणांचे वेगळे विचार, अनुभव, त्यांची कार्यक्षेत्रं, त्यांची जिद्द आपल्याला जाणून घेता आली. इतरांनीही अशीच जिद्द दाखवली असेल, त्यांना या लेखमालेतून पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला असेल. तर, एखाद्या नव्या अनवट क्षेत्रात धाडसाने पाऊल टाकणार्याला या लेखांतून नक्कीच प्रेरणा मिळेल, हे या लेखमालेचं यश आणि फलित आहे.
अनंत चतुर्दशीला श्रींचं विसर्जन झालं. विसर्जनाच्या वेळी आपण बाप्पांना म्हणतो – पुढच्या वर्षी लवकर या! या लेखमालेचा समारोप करताना आपण असंच म्हणू या – मिपावर अशाच समयोचित लेखमाला प्रसिद्ध व्हाव्या आणि अशीच वाचन मेजवानी मिळावी.