[श्रीगणेश लेखमाला] विवेक पटाईत - पंतप्रधान कार्यालयातले अनुभव

सुरेश प्रभू – संवेदनशील मनाचा देवमाणूस

जुलै महिन्यात माझी हृदयाची बायपास सर्जरी झाली होती. मी तीन महिन्यांच्या रजेवर होतो. २०-२१ सप्टेंबरचा दिवस असेल, ऑफिसमधून प्रशासकीय कार्य पाहणार्‍या एक अधिकार्‍याचा फोन आला. प्रथम शिष्टाचार म्हणून तब्येतीची विचारपूस केली, नंतर फोन करण्याचे खरे कारण - अर्थात "पटाईतजी, आप कब दफ्तर जॉईन कर रहे हो?" मी उत्तरलो, "तीन महिन्यांची रजा आहे, पूर्ण होताच जॉईन करीन." "थोडा जल्दी जॉईन कर सकते हो क्या?" मी विचारले, "का?" "सुरेश प्रभूजी की जी-२० के लिए इंडियन शेरपा के पद पर नियुक्ति हुई है. वह प्रधानमंत्री कार्यालय जॉईन कर रहें हैं. (इंडियन शेरपा या पदावर श्री सुरेश प्रभूंची नियुक्ती झाली आहे, ते शीघ्र कार्यालय जॉइन करणार आहेत)." अधिकारी पुढे म्हणाले, "ते रोज कार्यालयातही येणार नाहीत, आले तरी जास्त वेळ बसणारही नाहीत. फक्त जी-२०च्या संदर्भात काही मीटिंग्स वगैरे होतील. २-३ महिने तुमचे आरामात निघून जातील. (दिल्लीच्या सरकारी भाषेत याला 'चारा फेंकना' असेही म्हणतात.) पंतप्रधान कार्यालयात २-३ महिने आरामात निघून जातील, हे काही थोडेथोडके नव्हे. मासा गळाला लागला. दुसर्‍याच दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो. फिटनेस सर्टिफिकेट घेतले आणि कार्यालयात रुजू झालो.

पंतप्रधान कार्यालयाचे नाव कितीही मोठे असले, तरी इतर सरकारी कार्यालयांप्रमाणे इथेही जागेची मारामार. दुसर्‍या मजल्यावर कॅन्टीन आणि किचन (स्वयंपाकघर) आहे. श्री सुरेश प्रभू साहेबांना बसण्यासाठी किचनच्या उजव्या बाजूची एक खोली तयार केली. शिवाजी महाराजांचे एक मोठे तैलचित्रही त्यांच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लावण्यात आले. स्टाफमध्ये पीएस म्हणून मी आणि एक शिपाई, आम्ही दोघेच.

एके दिवशी दुपारी सव्वादोन वाजता श्री सुरेश प्रभू साहेब कार्यालयात आले. आल्यावर नेहमीप्रमाणे मी त्यांच्या खोलीमध्ये गेलो. ते म्हणाले, "मला भूक लागली आहे, जेवायला मिळेल का?" मी उत्तरलो, "साहेब, जेवणात काय मागवू? तयार करायला जास्तीत जास्त १०-१५ मिनिटे लागतील." साहेब म्हणाले, "किचनमध्ये सध्या कुक आणि वेटर जेवत आहेत, त्यांना त्रास नका देऊ. फक्त चहा आणि ब्रेड-सँडविच मागवा." दुसर्‍या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर आल्यावर समोरच किचन दिसते. रोज २ वाजता कॅन्टीन बंद होते. दोन ते अडीच या वेळात किचनमध्ये आणि कॅन्टीनमध्ये काम करणारे कुक आणि वेटर इत्यादी जेवतात. फक्त चहा आणि ब्रेड सँडविच बनविणारा काउन्टर उघडा असतो. साहेबांनी त्यांना जेवताना बघितले असेल. आपण जर जेवणाची ऑर्डर दिली, तर ती पूर्ण करण्यासाठी त्यांना जेवण अर्धवट सोडून उठावे लागेल. साहेबांच्या संवेदनशील मनाला हे पटले नसेल. साहेबांनी केवळ ब्रेड-सँडविचवर आपली भूक भागवली.

सरकारी कार्यालयात मला नाही वाटत या आधी वेटर, कुक यासारख्या लहान लोकांचा विचार कुणी केला असेल. देवमाणूस कसा असतो, हे मला त्या दिवशी उमगले.