आमचं गाव सातारा तालुक्यातलं . दर वर्षी उन्हाळी सुट्टीत गावाकडे जायचा नेम . हा किस्सा साधारण मी दुसरीत असताना घडलेला . दुसरीची परीक्षा संपल्यावर आम्ही (म्हणजे आमचं कुटुंब , चुलत भावाचं कुटुंब ) गावाकडे गेलो . गावाकडे मोठ्या काकाचं कुटुंब , आजी आजोबा असतात . आम्हा लहान मुलांना म्हशींना रानात चरायला घेवून जायची फार हौस . पण मोठी माणसं असलं काही करू द्यायची नाहीत . पण १ दिवस मला आणि माझ्या चुलत भावाला मोठ्या (गावाकडच्या ) भावाबरोबर रानात पाठवलं .मोठा भाऊ म्हशींना चरायला सोडून कैतरी गोष्टीचं पुस्तक वाचत बसला . तो त्यावेळी यत्ता चौथीत होता. इकडे मी आणि माझा शहरी चुलत भाऊ म्हशींच्या मागे गेलो . आम्हाला काय माहित त्यांना शांतपणे चरून द्यावं . आम्ही आपलं हाईक हाईक करत त्यांच्या मागे चालू लागलो . हातातल्या काठीने त्यांना पुढे जाण्यासाठी ढकलू लागलो .कदाचित त्याच वैतागानं एक म्हैस उधळली आणि पळू लागली . आम्ही दोघं तिच्या मागे .तिच्या मागे पळता पळता कुठे गेलो काही कळलंच नाही . आम्हाला काही गावातले रस्ते माहित नवते . मग खूप घाबरलो . त्यात ती म्हैस काही ऐकत नव्हती . मधेच शिंगं उगारून अंगावर यायची . मग दोघांनी भोकाड पसरलं . तिथून जाणार्या एका भल्या माणसाने ते बघितलं . २ च पोरं ह्या रानात कशापायी रडत बसलीत म्हणून चौकशी केली . मग त्याने आम्हाला घरी आणून सोडलं (अर्थातच म्हशीसकट). इकडं काका काकू आम्हाला शोधत बसले होते . इतका वेळ झाला पोरं आली नाहीत म्हणून . बिचार्या मोठ्या भावाला पण बोलणी खावी लागली . मग आल्यावर आम्हा दोघांना आजीचे फटके पडले .
मित्रांनो / मैत्रिणींनो तुमच्या पण लहानपणी तुम्ही असे उद्योग केले असतीलच . (ज्याने नसतील केले तो / ती कधी लहानच नव्हते). मग येवू द्या कि
तुमचे पण किस्से .