TIFRAC भारताचा पहिला संगणक

TIFRAC च्या विकासाच्या टीममधे, फिजीक्समधे पोस्टग्रॅज्यूट झालेले, आणि ज्यांचं इलेक्ट्रोनीक्समधे स्पेशलायझेशन झालेले असे काही लोक, तसेच रेडीयो इन्जीनियरींग मधले डिप्लोमा घेतलेले असे लोक होते. शिवाय त्यांना अमेरिकन युनिव्हर्सीटीमधे संगणाच्या दृष्टीने झालेल्या विकासाची पुरी माहिती घ्यायला मुभा होती. TIFR च्या लायब्ररीमधे वाचण्यासाठी त्या विषयावर भरपूर ग्रंथ होते. ह्या प्रोजेक्टसाठी त्यवेळचे १६ लाख रुपये बजेटमधे मंजूर झाले होते. हजारो वॉल्व्हस, डायोड्स आणि रेझीस्टर्स वापरून बनविला गेलेला हा संगणक १९६० मधे वापरात आणला होता. मद्रास युनिव्हर्सीटीचे आणि TIFRचे कॉस्मिक रे रिसर्च करणारे शास्रज्ञ हा संगणक वापरायला लागले होते. शिवाय सेंट्रल वॉटर आणि पॉवर रिसर्चचे शास्त्रज्ञसुद्धा तत्परतेने हा संगणक वापरायला पुढे आले होते.

आमच्या ह्या टीमने स्वतःची मेमरी सिस्टीम तयार केली होती. त्यासाठी लागणारी मॅग्नेटिक कोअर्स परदेशातून आणली गेली होती. शिवाय फास्ट ऍडर बनविण्यात ती कोअर्स उपयोगात आणली होती. ग्राफिकल डिसप्ले विकसीत करून एकंदर संगणाच्या विकासासाठी एक पाऊल पुढे टाकलं होतं. इतकं करूनही संगणाच्या शाखेत पश्चिमी देशात एवढा जोराने विकास होत होता की, १९६२ पर्यंत ही टेक्नॉलॉजी मागे पडायला लागली होती. ह्या संगणाचा वापर कमी कमी होत गेला. कारण ट्रान्झीसटर्स वापरून जास्त भरवशाचे संगणक प्रचलित होत होते.

के एस काणे उर्फ कमलाकर काणे ह्यांना आम्ही बापुसाहेब काणे असंही म्हणायचो. ते ह्या संगणकावर मुख्य प्रोग्रामर होते. फोर्ट्रान लॅन्ग्वेजमधे ते पारंगत होते. युरोपमधे निरनीराळ्या संगणकाच्या सॉफ्टवेअरवर त्यांचं शिक्षण झालं होतं. दिवसभर TIFR मधे संगणकाच्या सॉफ्टवेअरवर ते डेव्हलपमेंट करायचे. दादर पश्चिम रेल्वेच्या समोर "मामा काणे यांचं स्वच्छ उपहारगृह" आहे त्याचे ते मालक होते.

संध्याकाळी TIFR मधून निघाल्यावर घरी न जाता ते आपल्या उपहारगृहात देखरेख करायला जायचे. बापुसाहेबांची ह्या उपहारगृहात काम करणारी तिसरी पिढी. गल्ल्यावर बसण्यापासून ते भटारखान्यात जाऊन देखरेख करण्यापर्यंत स्वतः कामं करायचे. वेळ पडल्यास स्वयंपाक्याना मदत करायचे. मोठ्या टोपातल्या डाळीच्या आमटीत झारा टाकून ती ढवळण्यापर्यंत काम करत असताना त्याना कुणी पाहिल्यास हेच ते TIFRAC वर काम करणारे प्रोग्रामर का असा संभ्रम होणं कठीण नव्हतं. नंतर ते रात्री १० वाजता उपहारगृह बंद करून घरी जायचे.पुन्हा सकाळी सर्वांच्या अगोदर TIFR मधे येऊन आपल्या कामात मग्न असायचे. सांगण्य़ाचा मतितार्थ एव्हडाच की, पडलेल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन अतिशय तत्परतेने काम करण्याच्या सवयीमुळे इकडे संगण्काची डेव्हलपमेंट आणि तिकडे उपाहारगृहाची मॅनेजमेंट ह्या दोन टोकाच्या व्यवसायात बापुसाहेब तितकेच व्यस्त असायचे. तसेच इतरही टीम मधले लोक असायचे. TIFR मधून निवृत्त झाल्यावर आता ते उपहारगृहाच्या व्यवसायात व्यस्त असतात.माझा त्यांच्याशी अजूनही संपर्क आहे.

प्रो.नरसिंव्ह हे आमचे बॉस होते.ते भारतातल्या संगणक शास्त्रात विकास करणारे भिष्म म्हणून ओळेखले जायचे. मद्रास युनीव्हरसीटीमधून कम्युनिकेशन इंजीनियरींगची डिग्री घेऊन, युएसमधे कॅलिफोरनीया इंन्स्टीट्युट ऑफ टेकनॉलॉजीमधून इलेक्ट्रीकल इनंजिनीयरींगची डिग्री घेऊन एम.एस झाले. नंतर इंडीयाना युनिव्हरसीटीमधून त्यांनी गणितात पिएचडी केलं होतं.

Fortran (FORmula TRANslation) ही लॅन्गवेज IBM ने डेव्हलप केली होती. गणितातल्या फॉर्म्युल्याचं कोडमधे रुपांतर करण्यात ही लॅन्गवेज फार उपयोगी पडायची. तिला सायंटीफीक लॅन्गवेज म्हणूनही ओळखलं जायचं. प्रोग्रामर्सना कोडमधे लिहून हिचा वापर करायला फारच सोपं जायचं. ह्या लॅन्गवेजबद्दल खूप काही लिहिता येईल. पण तूर्तास एवढं ठिक आहे.

त्यावेळी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ह्या निरनीराळ्या शाखा म्हणून समजल्या जायच्या. एकाला दुसर्‍या शाखेबद्दल माहिती नसायची आणि त्याची आवशक्यताही नसायची. परंतु संगणाचा हळुहळू विकास होत गेला तसं हार्डवेअरच्या लोकांना सॉफ्टवेअरची माहिती करून घेण्याची आवशक्यता वाटायला लागली.

व्हॅक्युम ट्युब वापरून TIFRAC संगणक चालत असल्याने तपमानाचा मोठा प्रश्न उभा ठाकायचा. त्यासाठी थंडगार हवेचा प्रचंड वारा आणून त्याची झोत सर्व सर्कीटसवर टाकण्याची जरूरी असायची. हे काम मोठ्या ब्लोअर मधून व्हायचं. तरीसुद्धा दिवसातून दोन पाच ट्युब्स, पाच पंचवीस रेझीस्टर्स निकामी व्हायचे. रोज तास दोन तास मशिन देखभालीसाठी घेऊन पुढे होणारा फॉल्ट चुकवण्यासाठी धडपड करावी लागायची. प्लगइन टाईप युनिट्स असल्याने हे काम सोपं जायचं.

हळुहळू पश्चिमी देशात ट्रान्झीस्टर वापरून संगणक प्रचलित व्हायला लागले होते. CDC, IBM, DEC संगणकाच्या कंपन्यानी मेनफ्रेम सुपर संगणक वापरात आणले होते. १९६१, ६२, ६३चा हा काळ होता.

ह्याबद्दल आणि पुढील संगणाकाच्या विकासाबद्दल पुढे पाहूया. एवढंच म्हणता येईल की TIFRAC चा वापर कमी कमी होत गेला आणि TIFRने CDC 3600 हा संपूर्ण ट्रान्झीस्टरचा सुपर संगणक वापरात आणला आणि त्यानंतर DEC 20 आणि त्यानंतर CYBER 175 सुपर संगणक आणला. ह्या तिन्ही संगणकात माझा सहभाग होता एवढंच तूर्तास सांगतो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

TIFRACचं उद्गघाटन १९६०साली पं.जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते झालं.

.