[शतशब्दकथा स्पर्धा] प्रतारणा

गेले कित्येक महिने नीट झोप लागली नव्हती, विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. शेवटी आज रात्रीच काम तमाम करण्याचा निश्चय केला तेव्हा जरा बरं वाटलं.

हिच्या एकूण वागणुकीवरून तिचे बाहेर काहीतरी लफडं चालू असल्याची दाट शक्यता होती. फोनवर हळू आवाजात बोलणं, मी दिसल्याबरोबर बोलणं थांबवणं, फोन पासवर्ड घालून लॉक ठेवणं. ‘त्याच्याशी’ सतत हसत बोलणं आणि माझ्याशी बोलताना कपाळाला आठ्या……!

रात्री ती झोपायला गेली त्यावेळी हॉलमध्ये सर्व तयारीनिशी टीव्ही बघत बसून होतो, लक्ष मात्र बेडरूमकडेच होतं. मध्यरात्री धीर करून बेडरूममध्ये जाऊन काम फत्ते करूनच बाहेर पडलो.

सकाळी, मी रात्री ठेवलेले घटस्फोटाचे कागद, सही करून तिने टेबलावर ठेवले होते.