[शतशब्दकथा स्पर्धा] विश्वासघात !

फोनच्या आवाजाने त्याने डोळे उघडले. केस विंचरणार्‍या रीमाची पाठमोरी सुडौल आकृती दिसली. हेरखात्यात आणि खाजगी आयुष्यात जोडीदार असण्याचे भाग्य फार कमी जणांना मिळते.

फोनवरचा संदेश डीक्रिप्ट केला आणि त्याचा चेहरा ताठरला. उठून त्याने तिच्या खांद्यावर हात टेकले. लटक्या रागाने त्याला दूर ढकलत ती म्हणाली, "आटप लवकर. मोहिमेच्या शेवटच्या सभेसाठी जायचंय. सर्वतोपरी कर्तव्य !"

"एक महत्त्वाचे काम बाकी आहे." तिला कवेत उचलून त्याने गिरकी घेतली, भिंतीला टेकून उभे करून तिचा चेहरा ओंजळीत घेतला. एक सुखद शिरशिरी तिच्या अंगभर लहरली... डोळे अर्धोन्मीलित... ओठांचा चंबू. दुसर्‍याच क्षणी त्याच्या हातांनी खाली सरकून तिच्या गळ्याभोवती पोलादी विळखा आवळला. शुद्ध हरपताना तिने ऐकले, "बाय बाय, डबल एजंट !"