[शतशब्दकथा स्पर्धा] मन्या

१०-११ वर्षं अंगाखांद्यावर नाचून, बापाची गादी असल्यासारखं झोपलेलो असताना पोटावर बसून. गुदगुल्या करून , थंडीच्या दिवसात नको असतानाही कुशीत शिरून. सवय लावली हरामखोराने.

गविंनी खरं म्हणलं होतं . मांजर जात असतेच नालायक, थंडी वाजते म्हणून पांघरुणात शिरलं,झोपेत मी खाली ढकललं म्हणून चुलीत जाऊन झोपायची गरज होती का , पावसाच्या दिवसात राखेखाली निखारे असतात . इतकी वर्ष घरात असून एवढं कळत नाही का. एका बाजूच्या मिश्या जळाल्या. मिशी गेली कि अंदाज चुकतो यांचा . तरी मस्ती गेली नाही. उंदराच्या मागे गेला पळत पळत.

शेवटी मांजरंच ते. . पण आता मला खड्डा खणायला लागतोय त्यासाठी. च्यायला एक तर डोळ्यातून पाणी येतंय सारखं. कुदळ कुठे मारतोय ते हि दिसत नाहीये.