- 8829 views
'परत तेच! मुद्दाम करतेय का?'
पुढच्याच टेबलवर पाठमोरं बसलेल्या तिने तीनदा वळून त्याच्याकडे, आणि नजरभेट होताच मागे विमानतळाकडे पाहिलं होतं, मग मान वळवून घेतली होती.
तिशीच्या आसपासचा आकर्षक चेहेरा आणि बांधा. डोळ्यांत धास्ती होती का?
'विचारावं का मदत हवीय का म्हणून? नकोच, खरंच कुणाची वाट पहात असेल.’ पुन्हा लॅपटॉपकडे वळला.
तेवढ्यात पुन्हा ती वळलेली जाणवली, पुन्हा त्याला अडखळून नजर पलिकडे मागे!
आता मात्र लॅपटॉप बंद करून तो उठला.
इतक्यात तीही आनंदाने उठली आणि पुढून येणार्या अवाढव्य शरीराच्या तरूणाला "किती उशीर?" म्हणत तिने आवेगाने मिठीत घेतलं.
'आयला, काय जोडी आहे?' सुन्नपणे त्याने मान हलवली, 'बरं झालं काही बोललो नाही, थोडक्यात वाचलो!'