[शतशब्द्कथा स्पर्धा] क्रांती

फुटेस्तोवर सुजलेली लोकल मंदावली तसा तो हातापयाच्या जेमतेम दोनतीन बोटांची पकड घट्ट करून जिवाच्या आकांताने लोंबकळू लागला. दारादारातून शिट्ट्या वाजल्या. रुळाकडेला बसलेली ती शरमेने अर्धमेली झाली. आतला बाहेरचा प्रत्येक जण असाच आपापल्या नरकात तुंबलेला.
'अरे हे काय जिणं आहे का?' त्याला लोकल गदागदा हलवून आत चिणलेल्या प्रत्येक मुडद्याला खडसावून जागे करावेसे वाटले.
तिला संडास नसलेली ती वस्तीच शेकडो डोळ्यांनी डसणार्‍या लोकलसकट पेटवून द्यावीशी वाटली.
'वाटतं, साध्या जगण्यासाठी मरेस्तोवर् पिळणारी ही व्यवस्था उध्वस्त करावी.' तो ठामपणे म्हणाला.
'वाटतं, अब्रूने जगू न देणारा समाज फोडून सरळ करावा.' ती निर्धाराने.
'बास, ठरलं ! हे सगळच बदलावं' त्याच्या तिच्यासह अनेक आवाज निश्चयाने गर्जले,
'कोणीतरी...'