[शतशब्दकथा स्पर्धा] ईवाईन

तसंतर विमान म्हणजे फक्त एक वाहतुकीचा प्रकार. पण खेड्यातल्या "त्या"च्या सारख्यांसाठी विमान म्हणजे एक मोठं आकर्षण. विमानाचा आवाज ऐकून एकदा तो त्याच्या आई-वडिलांना म्हणाला "मी मोठा व्हवून ईंजिनीअर झालो त आपन ईवाईनातून फिराया जावू".

त्याने अभ्यास केला, ईंजिनीअरींगचं पहिलं वर्ष बरेच लोक फेल होत असतांना त्याने फर्स्ट क्लास मिळवला. एज्युकेशनल ट्रिप साठी हैद्राबादला गेला. परत येतांना सगळ्यांसोबत लुंबिनी पार्कात गेला.

............ अचानक मोठा आवाज झाला. त्याला अजूबाजूला सगळं लाल दिसायला लागलं. छातीत काहितरी घुसलं होतं. श्वास हळूहळू थांबत होता. त्याने सरांना सांगितलं पण आता उशीर झाला होता. दुसर्‍या दिवशी सरकारने ठरवल्याप्रमाणे सगळ्या डेडबॉडीज विमानाने पाठवल्या. त्याचे वडील बाजूला बसून ईवाईनातून आले.