- 8201 views
आजचा दिवस मह्याचा होता. एका साखळीचोराला त्याने पाठलाग करून पकडले होते! कॉलनीमधले सगळेजण मह्याच्याभोवती गोळा होऊन त्या प्रसंगाचं मसालेदार वर्णन त्याच्याकडून ऐकत होते.
"मस्त काम केलस रे! पण तो बरा सापडला तुला!" गर्दीतला एक जण म्हणाला.
मह्या हसला,"अरे, घाबरून पळत सुटलं होत येड, स्वताच पडलं तोंडावर! वाटेतला दगड दिसलाच नाई आंधळ्याला!" गर्दीत हशा पिकला. मह्यानीपण खुशीत बाजुच्याला टाळी दिली!
गर्दीतला तो मात्र चपापला, गर्दीतून सावकाश थोडा बाजूला आला. त्याला कुठेतरी खोल काहीतरी बोचल्यासारखे वाटले. उगीचच त्याने डोळ्यांवरचा चष्मा जागीच असल्याची हाताने चाचपून खात्री केली आणि आपल्या काठीच्या मदतीने रस्त्याचा अंदाज घेत तो सावकाश तिथून चालू लागला. कुठेही न अडखळता…