[शतशब्दकथा स्पर्धा] कबुली

शिकविताना सरांनी डोळ्याच्या कोपर्‍यातून पाहिलं तेव्हा पुन्हा एकदा नितीन शेजारी बसलेल्या विजयच्या कानात कुजबुजताना दिसला. दोघेही हसत होते.

सर भडकले. शिकवणं थांबवून ते संतापून दोघांच्या बाकाजवळ गेले.

"विजय, हसायला काय झालं?"

"मी हसत नव्हतो सर. मी वहीत लिहित होतो."

"नाही म्हणतोस, खोटं बोलतोस, चुका नाकबूल करतोस. अरे, आम्ही शाळेत असताना आमची चूक नसताना सुद्धा सर रागावले तरी आम्ही सॉरी म्हणायचो, चुकलं म्हणायचो, परत करणार नाही असं म्हणायचो. सांग का हसलास?"

"सर, नितीन हसत होता, म्हणून मी हसलो."

"का हसत होतास नितीन?" सर गरजले.

"सॉरी सर" झटकन नितीन बोलला आणि पुढच्याच क्षणी सगळ्या वर्गात हास्यकल्लोळ झाला. सर संतापून पाहतच राहिले.