[शतशब्दकथा स्पर्धा] शीर्षकविहीन

आज त्याला प्रोजेक्टवर निघायचं होतं. ती त्याचं सामान आवरत होती. कधी चिवचिवत तर कधी अगदीच उदासपणे.. तो कौतुकानं तिची सगळी लगबग बघत होता.

तिचंही मन थार्‍यावर नव्हतंच. कल्पना होतीच तशी, मात्र जरा तातडीनंच ठरलं होतं सगळं..

तिच्याकडे बघतांना त्याच्या डोळ्यांसमोरून आख्खा भूतकाळ तरळून गेला. ती पहिली नजरभेट, ती चोरट्या प्रेमाची वाढती खुमारी.. सगळे विरोध पत्करून घडलेलं मिलन. तिच्या मखमली, उबदार मिठीत निवलेल्या रात्री.. अन् वाफाळत्या कॉफीच्या साक्षीनं रंगवलेली स्वप्नं !

तिच्या स्वतःपासून दूर होण्याच्या विचारानेच त्याचा श्वास कोंडला. गदगदून तिला पाठमोरं मिठीत घेत तो हळुवारपणे तिच्या कानात कुजबुजला, "आय लव्ह यू.... अ लॉट, डार्लिंग !"
.
.
.
.
.
.
.
पुढच्याच क्षणी तिच्या मानेवरून सर्र्कन् सुरी फिरवण्याआधी !!