[शतशब्दकथा स्पर्धा] मोलाची माया

“अग आटोप!”

“झालंच! दीपच्या आवडीचा शिरा भाजतेय.”

दीप यायच्या आधीच उरकले पाहिजे. तान्हा असतांना मुलाच्या विनंतीमुळे सपोर्टसाठी त्यांच्या घरीच रहायचो. सासूसासऱ्यांचे रहाणे आवडत नसल्याचे सुनेने आडवळणांने सुचविले. आधी- “तुम्हाला त्रास होतो, सगळ्यांचे करावे लागते”, मग- “आजकाल प्रत्येकाला स्पेस पाहिजे असते!”

स्वत:च्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. कामावर जाण्याआधी मुलगा दीपला पोहचवतो, संध्याकाळी घेवून जातो! बरेच आहे! आपण स्वतंत्र, नातवाचा सहवास देखील! दिप तर आपल्या लोभासाठी आसुसलेला असतो!. येणाऱ्या चैतन्याच्या झुळुकीने ती मोहरली.

एवढ्यात फोन.... “मित्र त्याच्या मोलकरणीला आमच्याकडे ठेवून भारतात गेलाय, त्यामुळे तीन आठवडे तुझ्याकडे दीपला पाठवावे लागणार नाही.”

चैतन्याची झुळूक शेगडीच्या उष्णतेत होरपळली. करपलेला शिरा ती विमनस्कपणे ढवळीतच राहिली.