मिपावरील लेखांत फोटोंचे सादरीकरण

या प्रतिसादात नीलकांत यांनी मिपावरील लेखांत फोटोंच्या सादरीकरणाबाबत सूचना मागवल्या होत्या.

तेव्हा उपप्रतिसादात मी खालीलप्रमाणे सुचवले होते.

मिपावर जोडल्या जाण्यांची कमाल रुंदी ६४० असावी असे सुचवतो. त्यापेक्षा अधिक असल्यास फोटोज उजवीकडच्या दुव्यांवर अतिक्रमण करतात. उपप्रतिसादात व उप-उपप्रतिसादात रुंदी ६४० पेक्षाही कमी होत जायला हवी.

परंतु ६६० रुंदीचे फोटो लेखनाच्या तुलनेत व्यवस्थित दिसतात व उजव्या बाजूला अजिबात अतिक्रमण करत नाहीत असेही दिसून आले आहे - उदाहरण.

तसेच डॉ सुहास म्हात्रे (इस्पिकचा एक्का) यांच्या नव्या प्रवासवर्णन मालिकेत फोटोंची रुंदी ६८० पाहून त्यांच्याशी या विषयावर व्य.सं. द्वारे संवाद साधला. तो संवाद आपल्या सर्वांबरोबर शेअर करावासा वाटला. त्यांना याबाबत कल्पना दिली आहे.

मी त्यांना लिहिलेला पहिला संदेश
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार,

सासंमं सदस्य म्हणून एक सुचवावेसे वाटते. तुमच्या लेखांमध्ये फोटोंची रुंदी ६८० असते असे ध्यानात आले. विशेष करून शरदातला स्वित्झर्लंड - भाग २ मधले पहिले दोन फोटोज (रेल्वे स्टेशनचे) पाहून ते अधिकच जाणवले.

मिपावर लेखनाच्या फॉरमॅटमध्ये युनिफॉर्मिटी जाणवावी म्हणून फोटोंची कमाल रुंदी ६४० असावी असे धोरण आम्ही राबवत आहोत. फोटोजची ६४० रुंदी मजकूराच्या तुलनेत संतुलित वाटते. ६६० सुद्धा ठीक वाटते जर फोटोच्या उजव्या बाजूला गडद रंग नसले तर. ६८० रुंदी उजव्या बाजुच्या दुव्यांवर अतिक्रमण करत नसली तरी मजकूराच्या तुलनेत तेवढी संतुलित वाटत नाही.

याविषयी आपले मत जाणून घेण्यास उत्सुक.

आपला नम्र,
श्रीरंग जोशी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

त्यावर त्यांचे उत्तर

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार,

माझे मत विचारल्याबद्दल धन्यवाद ! ते खालीलप्रमाणे आहे...

चित्राच्या आकारमानाबद्दलचे मुख्य मुद्दे :

अ) जास्तीत जास्त रुंदी :
१. उजव्या कॉलममधे मजकूर असेपर्यंत : मजकूराच्या रुंदीएवढी म्हणजे ६८०.
२. उजव्या कॉलममधला मजकूराच्या ("हॉटेलात आलेली माणसं" खालील सभासदांच्या नावाची यादीच्या) खाली : ८००.
३. चित्र अस्पष्ट (पिक्सलेट) होऊ नये इतपत.

आ) कमीत कमी रुंदी :
१. चित्रातल्या विषयाला अनुरुप योग्य ती. ६८०पेक्षा कमी रुंदीची चित्रे चांगला दृष्य परिणाम साधण्यासाठी सेंटर अलाइन्ड असणे जरूर आहे.
२. चित्रातील बारकावे अस्पष्ट होऊ नये याची काळजी घेऊन योग्य ती.

इ) जास्तीत जास्त उंची :
१. ३००. यापेक्षा जास्त उंचीची चित्रे स्क्रोल करायला लागून चित्रांचा योग्य तो दृष्य परिणाम साधला जात नाही.

इ) कमीत कमी उंची :
१. चित्रातल्या विषयाला अनुरुप योग्य ती.
२. चित्रातील बारकावे अस्पष्ट होऊ नये याची काळजी घेऊन योग्य ती.

वरच्या जास्तीत जास्त आणि कमीत कमी लांबी-रुंदीच्या मोजमापामध्ये बसणारे आणि प्रत्येक चित्रासाठी चपखल असलेले आकारमान ठरवण्यासाठी खालील मुद्दे महत्वाचे ठरतील...

१. चित्राचे आकारमान त्याचा विषय उठावदार करणारे आणि त्याला साजेसे असायला हवे; हा सर्वात महत्वाचा कळीचा मुद्दा असावा. हे साधले नाही तर लिखाणात चित्र टाकण्याचा मूळ उद्द्येश पराभूत होतो.

उदाहरण अ : हिमालय-आल्प्सची चित्रे, निसर्गचित्रे, इ लँड्स्केप ओरिएंटेशन असलेली व हाय रेझॉल्युशन असलेली चित्रे त्यांच्यातील अपेक्षित भव्यता आणि बारकावे दिसण्यासाठी ८०० च्या रुंदीत जास्त खुलून दिसतात. तेव्हा ती उजव्या कॉलममधील मजकूरावर आक्रमण न करणार्‍या जागी असल्यास त्यांच्या रुंदीवर ठोकळ परिमाणाने बंधने लादणे योग्य होणार नाही. (अश्या प्रकारच्या चित्रांच्या अपेक्षित प्रभावासाठी छापील माध्यमांत ती दुमडलेल्या दोन पानांवर (सेंटर फोल्ड) अथवा सलग असलेल्या दोन पानांवर छापली जातात. अर्थात स्क्रोलिंग करून तसा प्रभाव साधता येत नसल्याने, संगणकाचा मर्यादा ध्यानात घेऊन त्यांचा आकार जास्तीत जास्त रुंदी ८०० [दृष्य परिणामाला बाधा न आणता शक्य असलेली रुंदी] व जास्तीत जास्त उंची ३०० [एक स्क्रीन हाईट], इतपतच ठेता येईल.)
उदाहरण ब : बहुतेक सर्व व्यक्तीचित्रे (पोर्ट्रेट्स) ३०० किंवा कमी रुंदीतच ठीक दिसतात.
उदाहरण क : पोर्ट्रेट ओरिएंटेशनमधील सर्व चित्रे स्क्रोल करायला लागू नयेत इतक्याच जास्तीत जास्त उंचीची असावीत.

२. चित्र इतके मोठे असू नये की अस्पष्ट (पिक्सलेट) होईल आणि इतके लहानही असू नये की त्यातले बारकावे लपून जातील. कारण या दोन्हींमुळे चित्राचा मूळ उद्द्येश पराभूत होईल.

परत एकदा :

संगणकावर चित्रे टाकताना आकारमानावर पडणारी मूळ बंधने (चित्राच्या आकारमानाबद्दलचे मुख्य मुद्दे) ध्यानात ठेवून आकारमान... उद्द्येश महत्वाचा, आकारमान हे उद्द्येशासाठीच असावे... याउलट नाही.

आणखी काही :

हे सर्व सासं मंडळ सभासदांना माहित असेलच, पण, केवळ मत पूर्ण करण्यासाठी इथे देत आहे...

१. लॅडस्केप ओरिएंटेशनमधिल चित्रे : यांचे आकारमान टाकताना फक्त रुंदी टाकावी, उंचीची जागा रिकामी ठेवावी... मिपा योग्य ती उंची निवडून चित्र प्रमाणबद्ध ठेवते.

२. पोर्ट्रेट ओरिएंटेशनमधिल चित्रे : यांचे आकारमान टाकताना फक्त उंची टाकावी, रुंदीची जागा रिकामी ठेवावी... मिपा योग्य ती रूंदी निवडून चित्र प्रमाणबद्ध ठेवते.

लेखनातील चित्रे ही बर्‍याचदा केवळ लेखनाला पूरक नसून लेखनाइतकीच महत्वाची असतात, त्यामुळे त्याबाबतीत विचापूर्वक निर्णय घेणे महत्वाचे असते, त्यामुळे हे मतप्रदर्शन जरा मोठे झाले आहे. ते उपयोगी वाटले तर आनंद वाटेल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नमस्कार,

तपशीलवार उत्तरासाठी धन्यवाद.

६४० रुंदीच्या फोटोच्या अलाइनमेंटबाबत - बाय डिफॉल्ट संपूर्ण मजकूराची अलाइनमेंट लेफ्ट असल्याने फोटो सेंटर अलाइनमेंट केला नाही तरी वाचकाला फार वेगळेपणा जाणवत नाही. जर कुणी मजकूरासाठी जस्टीफाय अलाइनमेंट वापरत नाही तोवर फोटोजची लेफ्ट अलाइनमेंट बाधा आणत नाही.

तसेच चित्र मोठ्या आकारमानात दाखवायचे असल्यास त्याचा दुवा देऊन ते नव्या टॅबमध्ये ओपन होण्याचा ऐच्छिक पर्याय देणे शक्य असते. मी हा पर्याय नेहमी वापरतो.

माझ्या या लेखात हा पर्याय वापरताना मूळ लेखात प्रत्यक्ष चित्रेही कमी रिझॉल्यूशनची वापरली आहेत अन दुव्यातली चित्रे त्याच फोटोजची अधिक रिझॉल्युशनच्या प्रती वापरल्या आहेत.

असे करण्याचा फायदा हा की ज्यांच्या इंटरनेटचा वेग फारसा नाही त्यांच्याकडे धाग्यातील फोटोज लोड होण्यास फार वेळ लागत नाही. तसेच ज्यांना मोठ्या आकारमानातले फोटोज बघायचे आहेत ते दुव्याचा पर्याय वापरू शकतात.

एकाच लेखात सुरुवातीचे लॅन्डस्केप फोटोज ८०० पेक्षा कमी रुंदीचे व नंतरचे फोटोज ८०० रुंदीचे हे सादरीकरणाच्या युनिफोर्मिटीला मारक वाटते. तसेच हजर सदस्यांची यादी कधी कधी बरीच लांब होते. त्यामुळे प्रकाशित करताना नेमके कितव्या फोटोपासून ८०० रुंदी ठेवावी हे ठरवणे थोडे अवघड आहे.

मनोगत.कॉम वर सरकचित्रदर्शन ही एक उत्तम सुविधा होती. आजकाल दिसत नाही. ती मिपावर असती तर अनेक फोटोज जे पूरवणी म्हणून लेखात घातले जातात (फारसे वर्णन आवश्यक नसणारे) ते दाखवण्याचा चांगला पर्याय असता.

तुमची मते सासंमं सदस्यांबरोबर शेअर करतो.

पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.

-श्रीरंग
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार,

१. आंतरजाल हे जेवढे लिखीत माध्यम आहे तेवढेच...किंवा काकणभर जास्तच... ते दृष्य (ग्राफिक) माध्यम आहे. शिवाय, एक चित्र हजार शब्दांचे काम करते, हे सर्वमान्य सत्य आहेच. प्रतिक्रियांमध्ये, "चित्रे बघितली, आता (किंवा नंतर सोईने) वाचतो" हा युजर फिड्बॅक मधून मधून दिसत असतोच.

२. लेखात कमी प्रतीचे चित्र देऊन, त्याची उत्तम प्रत पहायला लावण्याचे श्रम करायला लावणे हे तांत्रिकदृष्ट्या (मिपाच्या बाजूने साठवण क्षमता, वाचकाच्या बाजूने बँड्विड्थ, इ च्या बचतीच्या दृष्टीने) कमी खर्चाचे असले तरी तसे करण्याने...
(अ) वाचकांच्या अनुभवात (एकदोन क्लिक्सच्या का होईना पण) पायर्‍या वाढतात,
(आ) वाचनात खंड पडतो आणि विचारशृंखला भंग होते,
शिवाय...
(इ) अननुभवी (नॉन-सॅव्वी) वाचकांना (आंतरलावर नेहमी वावरणार्‍या वाचकांत यांचे किती प्रमाण आहे हे पाहणे नेहमीच चकित करणारे ठरले आहे !) तर अशी काही सोय आहे हे पण लक्षात येत नाही अथवा ते ती सोय वापरण्याचे कष्ट घेत नाहीत. एकंदरीत लेखकाने उत्तम चित्र टाकण्यासाठी घेतलेल्या श्रमांचा योग्य परिणाम साधला जात नाही.
(ई) मिपाच्या बाजूने... साठवण क्षमता ही समस्या नसल्याचे अगोदरच जाहीर झाले आहे. शिवाय मिपावर चित्रे साठविली जात नसल्याने तो प्रश्नच मुळातच नाहीय. वाचकाच्या बाजूने... हा मुद्दा माझ्याच लेखांतील चित्रांबाबत दोन एक वर्षांपूर्वी चर्चेत आला होता आणि वाचकांनी मोठ्या व हाय रिझॉल्युश्न चित्रांच्या बाजून निर्णय दिला होता. मी स्वतः २G कनेक्शन वापरत असूनही मला काही समस्या येत नाही.

...हे सर्व पाहता चित्रांच्या बाबतीत काटकसर करण्याने "युजर एक्स्पिरियन्स"चे व्यय-परिणाम गुणोत्तर (कॉस्ट-इफेक्टिविटी) फार चुकीचे होते असा माझा व्यक्तीगत व व्यावसायीक अनुभव आहे.

३. जी चित्रे लेखनाशी फारशी संबंधीत नाहीत आणि केवळ पुरवणी आहेत अशी चित्रे कलाविभागात प्रसिद्ध करणे जास्त योग्य होईल असे वाटते. किंवा त्यांचा दुवा देवून ती मूळ स्त्रोतातून बघावित असेही सांगता येईल. अशी चित्रे आणि लेखनाचा अविभाज्य भाग असलेली चित्रे यांची तुलना होऊ शकत नाही... त्यांना वेगवेगळे दंडक लावणेच योग्य होईल.

४.
एकाच लेखात सुरुवातीचे लॅन्डस्केप फोटोज ८०० पेक्षा कमी रुंदीचे व नंतरचे फोटोज ८०० रुंदीचे हे सादरीकरणाच्या युनिफोर्मिटीला मारक वाटते.

(अ) जेव्हा एकापेक्षा जास्त तौलनीक दृष्ट्या समगुणी वस्तू मानवी डोळ्यासमोर असतात तेव्हा त्यांची कळत-नकळत तुलना करणे व त्यांच्यातील अगदी सूक्ष्म बारकावे ओळखणे ही मानवी डोळ्यांची खासियत आहे. मात्र, एकाच वेळी बाजूबाजूला दिसू न शकणार्‍या गोष्टीची तुलना करण्यात मानवी डोळे त्यामानाने खूप कमजोर असतात. हे शरीरशास्त्रीय सत्य आहे.

(आ) त्यामुळे, तुमचा मुद्दा अन्यत्र बरोबर असू शकला तरी, स्क्रोल करून प्रत्येक चित्र वेगवेगळे पाहण्याची गरज असलेल्या सर्वसामान्य संगणकीय उपयोगात तो कामी येत नाही.

(इ) याच कारणासाठी, जर चित्रांचे आकारमान इतके कमी केले की त्यामुळे एकापेक्षा जास्त चित्रे एकाच स्क्रीनवर येतील, तर ती एकाच आकारमानाची असणे जरूर आहे. मात्र असे करताना जर ती चित्रे एकमेकांशी ताडून पहाण्यासाठी नसली तर त्यांचे आकारमान केवळ नियम म्हणून कमी करणे हे त्या चित्रांच्या वाचकांवरील प्रभावाला मारक असेल, व ती वेगवेगळ्या योग्य आकारमानांत एकमेकापासून योग्य तितकी दूर ठेवणेच योग्य होईल.

(उ) "युनिफॉर्मिटी" हा गुण; "युजर लर्निंग कर्व ऑबचुज करून इंटरफेस युजरफ्रेंडली बनविण्यासाठीच्या" आणि "एकाच स्क्रीनवर दिसणार्‍या डिस्प्लेच्या" संदर्भात अत्यंत महत्वाचा असतो यात शंका नाही; पण लेखनाचा भाग असलेल्या आणि एकाच वेळी एकाच स्क्रीनवर न दिसणार्‍या चित्रांच्या बाबतीत तो कडकपणे वापरणे योग्य परिणाम देत नाही. Unifirmity is a vitue of a user interface; but may not be so for the content.

५. वाढणार्‍या-कमी होणार्‍या हजर सभासदांच्या यादीने एखादे चित्र त्या यादीवर आक्रमण करू लागले तर त्या एका चित्राचे (असे चित्र बहुदा एकपेक्षा जास्त असण्याची शक्यता वाटत नाही) आकारमान सासंमंडळ बदलू शकेल. पण अश्या विरळ घटनेसाठी बाकीच्या सर्व चित्रांवरच्या सरसकट कारवाईचा नियम नसावा असे वाटते.

व्दिरुक्तीचा दोष स्विकारून परत एकदा...

लेखात चित्रे टाकताना त्यांचा मूळ उद्द्येश प्रभावी करणे हे सर्वात जास्त महत्वाचे असते... चित्रांचे आकारमान हे उद्द्येशासाठीच असावे... याउलट नाही. (Display forms and formats should be functions (or even, slaves) of the expected impact of the contents, and not the reverse.)

असो, तुमच्या विचारणेवरून, माझ्या (मिपावरील व व्यावसायीक) कमी-जास्त अनुभवाप्रमाणे मी माझी मते दिली आहेत. सासंमंडळ, तांत्रिक विभाग आणि प्रशासन हे सर्व मिळून योग्य तो निर्णय घेतील अशी खात्री आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार,

विस्तारपूर्वक उत्तरासाठी धन्यवाद.
८०० रुंदीच्या ऐवजी ६४० किंवा ६६० रुंदीचे चित्र दाखवल्याने चित्रातले तपशील लपले जातील असे मला वाटत नाही.

मी जे फोटोवर दुवा देण्याचा पर्याय देत असतो ती सुविधा वापरणे वाचकांसाठी पूर्णपणे ऐच्छिक आहे.

पुन्हा एकदा धन्यवाद.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सर्वसाधारणपणे मी ६८० पेक्षा जास्त रूंदी वापरत नाही. ८०० ही रुंदी "जास्तीत जास्त" म्हणून दिलेली होती, सरसकट वापरासाठी नाही.

८०० आणि ६६० रुंदीतील फरक इथली काही हिमालयाची चित्रे वापरून प्रयोग करून योग्य तो निर्णय घेता येईल.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तर मंडळी आपले काय मत आहे. मला मिपावर युनिफॉर्मिटी महत्वाची वाटते. एक्कासाहेबांनी मांडलेला ८०० रुंदीच्या फोटोच्या दृश्यमानतेचा मुद्दाही वाजवी वाटतो. परंतु मिपाच्या टेम्प्लेटमध्ये लेखनासाठी जेवढी जागा आहे तिचे उल्लंघन करणे योग्य वाटत नाही. तसेच प्रसिद्ध वर्तमानपत्रे व मासिकांच्या वेबसाइट्समध्येही फोटोज खूप रुंद नसतात.

ज्यांना स्पेशलाइज्ड फोटोग्राफीचे प्रदर्शन करायचे आहे ती मंडळी फ्लिकर वा 550px सारख्या ठिकाणी फोटोज प्रकाशित करून मिपावर दुवे देऊ शकतातच.

आपणा सर्वांची मते जाणून घेण्याची उत्सुकता आहे तसेच यावर होणार्‍या चर्चेतून मिपावर फोटोंच्या प्रकाशनासाठी संमर्पक मार्गदर्शक तत्वे बनवता येतील असा विश्वास वाटतो.

उदाहरण म्हणून एक फोटो प्रकाशित करतो

६४० रुंदी
640

६६० रुंदी
660

६८० रुंदी

680

८०० रुंदी (इथे चित्रावर दुवा पण आहे).
800