नमस्कार,
मिसळपाव आणि मनोगत वगळता जवळपास सर्वच मराठी आंतरजालावर मराठी लिहीण्याची पध्दत ही गमभनची फोनोटिक आहे. २००६ - २००७ च्या दरम्यान ओंकार जोशींनी हे गमभन बनवले होते. त्याकाळी मराठी लिहीण्याची उत्तम सुविधा गमभन ने दिली होती. कारण ज्या लोकांना मराठी लिहीता येत नाही त्यांना केवळ दहा मिनीटाच्या सरावाने मराठी लिहीता येऊ लागत होते. मराठी आंतरजालाच्या आतापर्यंतच्या वाटचालीत गमभनचा मोठा वाटा आहे हे सर्वमान्य आहे.
पुढील काळात गमभनचा विकास थांबला होता. तो आता परत सुरू झालेला दिसुन येतो. मात्र यावेळी गमभनची जोडणीपध्दत बदलली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास सध्या आपण जे गमभन वापरतो त्याच्या सोर्सफाईल्स व जावास्क्रिप्ट मिपाच्या सर्व्हरवर ठेवलेले आहेत. नवीन पध्दतीत ते तसे ठेवता येत नाहीत तर गमभनच्या सर्व्हरवरून दर वेळी मागवून घ्यावे लागतील. त्यामुळे ह्या नवीन व्हर्जनला अपडेट व्हायला आपण तयार नाही. मात्र अश्या वेळी काही नवीन प्रश्न समोर आले आहेत. ते तुम्हा सर्वांसमोर मांडावेत आणि तुमचे विचार घ्यावेत यासाठी येथे लिहीतोय.
१) गमभन ही फोनोटीक पध्दतीने लिहील्याजाते. - फोनोटिक शिकायला सोपी आहे मात्र कमी लिहीण्यासाठी खुप किस्ट्रोक्स द्यावे लागतात. गमभन ही आता पर्यंत मराठी लिहीण्यासाठी सर्वात निर्दोष पध्दती मानल्या जाते.
२) मराठी किंवा देवनागरी लिपी लिहीण्यासाठी इन्स्क्रिप्ट किबोर्ड हा शासनमान्य आणि वैज्ञानिक पध्दतीने उत्तम मानल्या जातो.
३) आताच्या काळात गुगल आयएमई ने मराठी लिहीण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यात गुगलच्या सर्व्हरवरून फाईल्स घेतल्या जातात आणि यात मराठी शुध्दलेखन आपोआप सुधारले जाते.
सध्या २०१५ मध्ये आपल्या जवळ हे तीन पर्याय समर्थपणे उभे आहेत. यात सध्या सर्वात जास्त गमभन वापरल्या जाते. ते आपल्या क्षमतेवर अद्यावत करता येईल. सोबतच मिपावर मराठीचा प्रमाण किबोर्ड म्हणून इस्न्क्रिप्ट किबोर्ड उपलब्ध करून द्यावा का?
नुकतेच जे फिडबॅ़क घेतले आहेत त्यात दोन गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या त्यातील एक म्हणजे
१)गुगल क्रोम ब्राऊजरवर गमभन नीट चालत नाही. खुप त्रासाचे होते. गुगल क्रोम वापरणार्यांची संख्या खुप जास्त आहे.
२) नवीन लोक गुगल मराठी ने अन्यत्र लिहायला सवयीचे आहे. नवीन लोक गुगल मराठीने मिपावर मराठी लिहिण्याची सुविधा उपलब्ध करून द्या असे म्हणताहेत.
सध्या आहे त्या गमभन मध्ये असे बदल करावेत का? नेमके विचारायचे झाल्यास गमभन कायम ठेवून अन्य दोन पध्दती जोडाव्यात का? किंवा गमभन व गुगल मराठी यापैकी एकच वापरावे का? इन्स्क्रिप्ट द्यावे की नाही? तुम्हा सर्वांचे काय मत आहे?