माझे रिकामपणाचे उद्योग - ४. मधुबनी चित्रकला

विकीवरची माहिती खरी मानायची तर, मधुबनीची पाळंमुळं नेपाळ आणि बिहारच्या उत्तर भागातली. बिहारमध्ये मधुबनी नावाचा जिल्हा आहे , पण हिचं मूळ ते नेपाळच्या मधुबनी-जनकपुर नगरीतलं. जनक राजानं म्हणे सीतेच्या स्वयंवराच्या वेळेस नगर सुशोभित करायला सांगितलं आणि या भित्तीचित्रकलेचा उगम झाला. पूर्वी फक्त लग्नकार्याच्या वेळेस सीमीत असलेली ही कला मुख्यतः ब्राह्मण, कायस्थ व दुसाध (पास्वान) स्त्रियांकडून जोपासली गेली. नंतर मग विसाव्या शतकात भूकंपाच्या वेळेस विल्यम आर्चर नावाच्या एका ब्रिटिश अधिकार्‍याच्या नजरेस पडली. त्याने त्यावर एका भारतीय-नेपाळी मासिकामध्ये एक लेखही लिहिला. काही काळानंतर मग दुष्काळानंतर अर्थार्जनासाठी म्हणून या कलेला भिंतींवरून कागदांवर आणण्यात आलं.

मधुबनी चित्रे पाहता त्यात कृष्ण-राम-सीतेची, मासे, साप, सूर्य, पक्षी आणि झाडं-झुडूपं यांची चित्रं अधिक दिसतात. चित्रांना दिलेली बॉर्डर हेही एक गोड प्रकरणच आहे. हा एक नमुना-

तर, नवीन काहीतरी चित्रं काढण्याच्या खुमखुमीत मी पहिलंच चित्र हे निवडलं.

घरी ड्रॉईंगबुक होतं साधं. त्याच्याच एका पानावर तीन सूर्य अदमासे बसवले.

नंतर पहिल्या सूर्यावर प्रयोग करताना लक्षात आलं की एक चेहर्‍याची एक बाजू छान जमलीय पण नेमकी तशीच दुसरी बाजू काढणं अवघड आहे. थोडीशी पेन्सिल आणि बरंचसं खोडरबर वापरून एक सूर्यमुख काढलं आणि लक्षात आलं की या मापाचे तीन चेहरे या पानावर बसणार नाहीत. केलेली मेहनत फुकट न घालवता जर्राशी अ‍ॅडजस्टमेंट केली आणि कसेबसे तिन्ही सूर्य एका पानावर आले.


इंटरनेटवरची माहिती वाचून कुणीतरी पोस्टर कलर्स चांगले म्हटल्यावरून ते आणले होते. पण मला रंगकाम कितपत नीट जमेल याची खात्री नसल्याने स्केचपेन्स, मार्कर्स यांची मदत घेऊन आधी असं अर्धवट व नंतर घेतलेल्या चित्राबरहुकूम रंगकाम संपवलं.


नंतर मात्र आधीचं हिरवं चित्रच लै भारी होतं असं वाटत राहिलं.

पहिल्या चित्रानं तितका दगा न दिल्यानं आता जरा यूटयूबकडे मोहरा वळवला. तिथे भारती दयाल या मधुबनी शैलीतल्या प्रसिद्ध बाईंनी एक दहा-बारा मिनिटांच्या चित्रफितीत चित्र कसं काढायचं हे दाखवलंय.

मूळ मधुबनी चित्रं जरा ओबडधोबड असल्याने मला अगदी तशीच काढायची नव्हतीच. दयालबै हाती थेट मार्कर घेऊन सरसर चित्र काढत गेल्या आणि मी पेन्सिलीच्या मागे खोडरबर घेऊन परत एकदा चित्राक्षरं गिरवायला लागले. चित्र ९०% पूर्ण झालं आणि मास्तरीणबैंनी दगा दिला. हाती घेतलेलं चित्र सोडून त्यांनी दुसर्‍याच चित्राने शेवट केला. मग त्यांनी अर्धवट सोडलेलं चित्र आंतरजालावर खूप शोधलं पण ते नेहमीप्रमाणं मी हातातलं चित्र कसंबसं पूर्ण केल्यावरच सापडलं. या चित्रावर आपण लहानपणी चित्रात काढायचो तसे पार्श्वभूमीवर खवले होते. मी शक्य तितका कंटाळा टाळत त्यांना माझ्यापरीने नाजूक करायचा प्रयत्न केला होता. आणि मी पुढचं चित्र काढेपर्यंत मला माझ्या चित्रकारीचं लै कौतुक वाटलं होतं.

हा सगळा प्रकार साधारण फेब्रुवारीच्या आसपास चालू होता आणि मार्चमध्ये आजपर्यंत कधीही न पाहिलेल्या आणि प्रचंड हुषार अशी ख्याती असलेल्या एका आंतरजालीय मैत्रिणीला भेटायचा योग आला. साधारण वावरावरून तिला कला प्रकारात रस असेल असं वाटत होतं. त्यामुळं तिच्यासाठी एक मधुबनी फ्रेम बनवून न्यावी असं ठरवलं. या वेळेस पुन्हा एकदा भारती दयाल बाईंचंच चित्र घेतलं. ते आधीच्या चित्रासारखंच , फक्त थोडासा फरक असलेलं असं होतं. एका चित्रावरून काय चुका करायच्या नाहीत हे कळालं होतं. मध्येच कधीतरी केतकीनं पोस्टर कलर्सऐवजी अक्रिलिक कलर्स वापरायला सुचवलं होतं त्यामुळं रंगही बदलले होते. हे चित्र खूप मनापासून,अगदी नाजूकपणे कोरून काढलं आणि आता भेट म्हणून बाजारातून दुसरं काहीतरी आणून द्यावं की काय असं वाटेपर्यंत खूपच आवडलं. पण इतकाही हलकटपणा बरा नव्हे म्हणत काचेची ती फ्रेम मुंबई ते खडगपूर आणि खड्गपूर ते कोलकाता जीवापाड जपून नेल्याचं चीज झालं. :-)

घरी काचेच्या टेबलावर वस्तूंचे डाग पडतात म्हणून मोठ्या आकाराचे कोस्टर्स आणले होते. ते इकडेतिकडे पडलेले पाहावले नाहीत. म्हणून मग एका चॉकलेटबॉक्सचा बळी दिला. परंतु त्याचं झाकण मोठं तर डबा आकाराने थोडा लहान होता. मग त्याला सगळीकडून पांढरा कागद चिकटवून दोन्ही बॉक्सेसना एकत्र आणलं. आणि बाल वॉशिंग्टनच्या जोशात त्या बॉक्सलाही रंगवून टाकलं. जशी मानवी चेहरे आणि मागे खवले ही भारती दयालांची स्टाईल, तशीच असे पक्षी आणि झाडांची चित्रे ही विदुषिनी प्रसाद यांची खासियत.

ही अशा प्रकारची चित्रेही त्या काढतात. यांना पारंपारिक मधुबनी म्हणता यायचं नाही, पण अशा छापाची गणपती इत्यादींची चित्रे त्यांनी पुष्कळ काढली आहेत.

(हे मूळ चित्र खूप नाजूक आणि सुंदर आहे, मी त्याला ओबडधोबडपणाचं कोंदण दिलंय)

जाता जाता तोडलेले अकलेचे तारे:-
१. थोडा हलका हात सोडून मुक्तपणे आकार येऊ द्यावेत. मधुबनी ही लोककला असल्याने आणि त्यातही ही चित्रे थेट भिंतीवर काढली जात असल्याने तिथे खाडाखोड होत नसावी. सहज आलेले आकार थोडे अनियमित असले तरीही सुंदर दिसतात.
२. मु़ळात फक्त पारंपारिक रंग वापरले जातात. पण उपलब्धतेनुसार आणि प्रयोग अधिक काळ टिकावेत असं वाटत असेल तर अक्रिलिक रंग अधिक उत्तम.
३. चित्राच्या आरेखनास उठाव देण्यासाठी मार्कर किंवा पायलटचा काळा पॉईंट पेन वापरता येईल पण मोठे चित्र काढायचे असल्यास काळा रंगच वापरावा. मोठ्या चित्रात मार्करच्या काळेपणात कुळकुळीतपणा न दिसता ब्राऊन शेड दिसते.
४. नको तिथे शहाणपणा करून जिथे दोन्ही बाजूला समतोल साधायचा आहे असं चित्र नमनालाच न घेता इतर चित्रांपासून सुरूवात करावी.

यापूर्वीचे रिकामपणाचे उद्योग--
ग्लास पेंटिंग- http://www.misalpav.com/node/8020
बुकमार्क्स- http://www.misalpav.com/node/9487
पेपर क्विलींग- http://www.misalpav.com/node/14230