पहिल्यांदाच गद्य लिहित आहे त्यामुळे जरा सांभाळून घ्या. काही चुका झाल्या असतील तर दुरुस्ती सांगा.
शिक्षण आणि नंतर नोकरी यामुळे घरापासून लांब राहायला लागत असल्यामुळे घरी जायची ओढ कायमच असते.
पण साताऱ्यात आल्यावर पाय घरात काही रहात नाही! लहानपणापासूनच अजिंक्यतारा, यवतेश्वर, जरंडेश्वर यासारख्या डोंगरांवर फिरण्याची जी सवय (किंवा आवड म्हणा!) लागली ती अजूनही कायम आहे! त्यामुळे घरी आल्यावर या डोंगरांना भेट दिल्याशिवाय चैन पडत नाही…
यावेळी चांगला कॅमेरादेखील सोबत होता त्यामुळे आल्या आल्याच अजिंक्याताऱ्यावरून सूर्योदय पाहण्याचा बेत पक्का केला.
घरी जाहीर केल कि, मी आणि वैभव उद्या पहाटे ५ला उठून अजिंक्यताऱ्यावर सूर्योदय पाहायला जाणार आहोत! सुट्टीला घरी आल्यानंतर ज्याची १०-११ला सकाळ होते, तो पहाटे ५ला कसा उठणार आहे याची शंका आणि औस्तुक्य हे दोन्ही भाव घरच्यांच्या चेहऱ्यावर मला एकत्रच दिसले! पण मी सुद्धा चंग बांधला होता कि काहीही झालं तरी आता पहाटे उठायचं, इज्जत का सवाल है! आणि अगदीच झोप लागली तर वैभ्या फोन करून उठवेलच हि आशा होती…
पण सुदैवाने वेळेवर जाग आली आणि आम्ही दोघेही अजिंक्यताऱ्याच्या दिशेने निघालो.
किल्ल्यावर पोहोचल्यावर देवीच दर्शन घेतलं आणि फोटो काढायला बरी पडेल अशी जागा पाहू लागलो. एक जागा बरी वाटली म्हणून तिथे थांबलो. आकाशात थोडे फार ढग होते त्यामुळे सूर्योदय दिसेल कि नाही याची शंका वाटत होती. हळू हळू प्रकाशही वाढत चालला होता त्यामुळे कदाचित सूर्य उगवला आहे आणि ढगांमुळे आपल्याला दिसत नाहीये असे वाटू लागले. तेवढ्यात वैभ्या म्हणाला, "ती घार बघ किती जवळून उडत आहे, फोटो काढता येईल का?" हे वाक्य पूर्ण होतानाच घारीने त्याच्या डोक्यावर टोच मारण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला होता! तो दोन्ही हात डोक्यावर ठेऊन जोरात ओरडला. त्यावरून घार आम्हाला पोज देण्याच्या नाही तर हल्ला करण्याच्या मुड मध्ये आहे हे स्पष्ट झाले. मग आम्ही दोघपण डोक्यावर हात ठेऊन पळत सुटलो. घारीने अजून एक दोनदा हल्ल्याचा प्रयत्न केला किंवा ती फक्त आम्हाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होती. कदाचित तिचे घरटे तिथे जवळपास असणार. आम्ही काही अंतर पळाल्यावर तिने पाठलाग करणे बंद केले आणि सकाळी सकाळी आमचा पळण्याचा व्यायाम संपला.
या सगळ्या गडबडीने सुर्यादेवांची झोपमोड झाली आणि त्यांनी ढगांची चादर बाजूला सारून आम्हाला दर्शन दिले! आमची "मेहनत" सार्थकी लागली होती. आता मनासारखे फोटो मिळणार या विचाराने आम्ही दोघपण खुश झालो.
दर्शन!
हेच फळ खाण्याची छोट्या हनुमानाची इच्छा झाली असावी
कॅनवासवर काढलेल्या चित्राप्रमाणे सूर्य भासत होता, निसर्ग खरोखर फार मोठा कलावंत आहे हे जाणवत होत…
मनासारखे फोटो काढल्यानंतर मन तृप्त झाले होते पण काहीच खाल्ले नसल्याने पोटात कावळे ओरडू लागले होते. त्यामुळे लगेचच परत निघालो.
आता सूर्याचे फोटो तर मिळाले पण चंद्रावर अन्याय नको या उदात्त हेतूने मग एके रात्री चंद्रदेवांचेही फोटो काढले!

चंद्रावर असलेली विवरे त्याचे सौंदर्य कमी करतात असे काही लोकांचे म्हणणे असते पण खर तर ती त्याच्या सौंदर्यात भरच टाकतात असे माझे तरी मत आहे. नाहीतर नुसता सपाट पांढरा गोल पाहण्यात काय मजा आहे?

