लई भारी..

आम्ही कोल्हापुरी. म्हंजे जगात भारी. कमीतकमी महाराष्ट्रात तरी भारीच !
का म्हणून विचारता ?
खिक ! अहो नकाशा बघा की, आख्खा महाराष्ट्र खांद्यावर पेललाय कोल्हापुरानं !
हे कोल्लापूर इचिबन लई गुणाचं. ग्वाडबी आन तिकाटबी. हितली मान्सं अंगानं उभी-आडवी आन मनानं आश्शी ग्वाड जशी उसाची काकवी !
...कॉलेजात असताना कोल्हापूर आत्तापेक्षा खूप निराळे होते. तेव्हाच आम्ही मैत्रिणी प्रथम कोल्हापूरच्या प्रेमात पडलो. दोन वर्षात दोन पायावर आख्खे करवीर पालथे घातले ! आणि जसा परिचय होईल तसं हे इचिबन कोल्हापूर लैच आवडायला लागलं ! थेट कावळा नाक्यापासून ते कात्यायनी-पन्हाळ्यापर्यंत !
नाव कोल्हापूर का तर हितंच अंबाबाईनं कोल्हासुराला मारलं अन करवीर निवासिनी झाली. जगाची महालक्ष्मी असली तरी हितं ती अंबाबाईच. तिच्या दर्शनाची पद्धत हाय का माहिती ?
.असं महाद्वारातनं आत यायचं, येताना पायरीला हात लावायचा. मग अंबाबाईच्या समोरच्या बाळगणेशाचं दर्शन घ्यायचं. मग नीट रांग धरून गाभाऱ्यातल्या देवीची साजरी शोभा बघून तिच्यापुढं माथा टेकायचा. ते झाल्यावर कडेच्या निरुंद जिन्यानं वर जाऊन कळसाच्या मनोऱ्यात बसलेल्या महादेवांना दंडवत घालायचा. खाली येऊन साक्षी गणेशाला हात जोडायचे. अंमळ पायरीवर टेकायचं अन घाटी दरवाजातनं बाहेर पडायचं. आन मगच झालं बयाजवर दर्शन !

आता घाटी दरवाजासमोरची दत्त मिसळ खावी अन खुशाल मोकाट हिंडावे.
तशी, मिसळ खासबाग, चोरगे अन बावड्याचीपण नामांकित. पण झणझणीतपणात दत्त उजवी. खाल्ल्यावर पाणीच मागायला पाहिजे !
अंबाबाईच्या भैणी टेमलाई म्हंजे त्र्यंबोली अन कळंब्याची कात्यायनी. अंबाबाईभवताली फेर धरून बसलेल्या. भर उन्हात टेमलाईच्या बागेत बसून गच्च झाडीने डोक्यावर ढाळलेला गारवा झेलावा. कळंब्याच्या थंडगार पाण्यात सूर मारावा. कात्यायनीचा डोंगर करंजीच्या झाडांच्या सावलीच्या आडोशाने पालथा घालावा. चारी बाजूंनी घेरणाऱ्या रंकाळा, पद्माळा, राजाराम तलाव अन कळंबा यांचा गारवा पांघरून गावभर खुशाल हिंडावे. ताराराणीसरकारांना, आईमहाराजांना मुजरा करावा. बाईच्या पुतळ्याला फेरी घालावी. लैच कट्टाळा आला, तर ‘एक हौस पुरवा महाराज, मला आणा कोल्हापुरी साज..’ ही लावणी गुणगुणत गुजरीत फेरी मारावी. पारंपारिक ठुशी, जोंधळपोत, मोहनमाळ, नथ, कोल्हापुरी साज, बोरमाळ, गोठ तोडे, पाटल्या, बाजूबंद, कमरपट्टा असले घसघशीत नमुने मनसोक्त न्याहाळावेत. ‘काहीतरी करून, कोल्हापुरी जाऊन, गुजरीत बसून ..’ एकतरी सोन्याचा अस्सल कोल्हापुरी नग आपापल्या ऐपतीनुसार घडवायला आलेले हौशे गवशे नवशे ‘नग’ निरखावेत.



कधी पापाच्या तिकटीला जायचं, पण पापा परदेशीच्या दुकानाची पायरी नाय चढायची. बरोब्बर उलट वळायचं आणि कोल्हापुरी ‘आयतान-पा’ नी भरलेली दुकानं, इच्छित-पादत्राण-प्राप्ती होईपर्यंत पालथी घालावी.

पापाच्या तिकटीपासनं ते थेट बिनखांबी गणपतीपत्तोर महाद्वार पायी चाळून काढावा. कपिलतीर्थात चक्कर मारावी अन कुठे मोडाचे वरणे, कुठे कोकमाची फळे, लोणच्यासाठी माईनमुळे, ताजी ईडलिंबे, भोकरे, मुळ्याच्या शेंगा असले आप्रूबाईचे जिन्नस गोळा करावे.
कधी बेजान भुका लागल्यावर ‘गोकुळ’ मध्ये जाऊन मस्तपैकी झुणका, भाकरी, वांगं, खर्डा अन दही चापावं अन द्याची ताणून !
अश्शी ताणून दिली की संध्याकाळी सा लाच जाग यायला पायजे !
कधी सकाळी सकाळी उठून च्याची चूळ न भरता तसंच जायचं मिरजकर तिकटीला, म्हस पिळून दिलेलं दूध प्यायला. गरमागरम निरशा दुधाचा पेला रिचवून गरगरीत ढेकर द्यावी.
कधी एखाद्या धुंद संध्याकाळी थेट रंकाळ्यावर मोर्चा न्यायचा.
शालिनी पॅलेसच्या हिरवळीवर आडवं व्हावं अन रंकाळ्याची साजरी शोभा बघावी. बघता बघता रंकाळ्याच्या झुलत्या लाटांवर जीव अलगद सोडून द्यावा !
..आता तो रंकाळ्यातल्या केंदाळात जाऊन अडकत नाही ना हे मात्तर बघायचं हां !

कधी रंकाळा बघून जीव भरला, तर पंचगंगेच्या घाटावर जाऊन निवांत बसून डोहाच्या स्तब्ध पाण्यावर दगडांनी भाकऱ्या काढाव्यात.
कधी ताराबाई पार्कातल्या गच्च झाडीने झाकलेल्या रस्त्यावरून रपेट मारावी . किरण बंगल्याचे पोर्च आणि दार, दाटलेल्या झाडीतून दिसते का ते डोळे ताणून ताणून बघावे.
संध्याकाळी भुका जबर लागल्यावर थेट अस्सल कोल्हापुरी जेवणाच्या हाटेलात मोर्चा.
तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, खेकडा रस्सा, मुंडी रस्सा, कोंबडीचा रस्सा, सुक्कं, चुलीवरची भाकरी नायतर चपाती पापलेटाची भजी, दहीकांदा आन कोळंबीभात ! असला अस्सल गावरान चमचमीत बेत आधी डोळ्यांनी आन मग तोंडानं खाऊन टाकाळ्यापासनं पन्हाळ्यापत्तूर लांबलचक ढेकर द्यावी .

दोन दिवस सुट्टी मिळाली की कधी पन्हाळा, कधी विशालगड, कधी जोतीबा तर कधी कणेरीमठ गाठावा. दिवसभर हिंडून पायाचे तुकडे पडायला आले, की गुमान होस्टेलवर जाऊन गपगार निजावं.
ताराबाई पार्कात फिरायला गेलं तर संध्याकाळी सहालाच तिथून निघावं लागे. कारण गच्च झाडी नि रस्ते सामसूम ! रिक्षापण मिळायची नाही.
नोकरीला लागले तेव्हा मेरा हॉटेलमध्ये कसलासा सेमिनार होता. कंपनीवाल्यानं एकाला विचारलं, काय अँबिशन आहे बाबा तुझी ?’
तर म्हणाला, ‘ताराबाई पार्कात ऐसपैस फ्लॅट आणि होंडा सिटी !’
...पण आताशा हे लाडकं कोल्हापूर खरंच कुठंतरी हरवलंय. हल्ली कोल्हापूरला खूपदा जाते, पण कोल्हापूर ‘भेटत’ नाही कधी मला !
परवा ताराबाई पार्कात गेले होते. गच्च झाडीझुडुपे गायब होऊन सगळीकडे कॉन्क्रीटचे साम्राज्य पसरलेलं !
....बघितलं आणि , काही वर्षापूर्वी, ताराबाई पार्कातला फ्लॅट विकला याची रुखरुख विरून गेली !!

(( चित्रे आंजावरून साभार )