
*छायाचित्र आंजावरून साभार
बेथनी हॅम्लिटन हिचा जन्म हवाईमध्ये एका सर्फर कुटुंबात झाला. अगदी लहानपणापासून तिला सर्फबोर्डिंगची आवड होती त्यामुळे वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीच ती सफाईनं सर्फींग करू लागली. तिचे सर्फर व्ह्यायचे स्वप्न होते. तिचे हे स्वप्न पूर्णत्वाला नेण्यासाठी तिच्या घरच्यांचा, स्पॉन्सर्सचा, मित्र-परिवाराचा पूर्ण पाठिंबा होता , त्यामुळे तिला अवघ्या आठव्या वर्षी सर्फ बोर्डिंगच्या स्पर्धेत सहभागी होता आले.
२००३ च्या हॅलोविनच्या सकाळी १३ वर्षीय बेथनी आपली मैत्रीण अॅलेना सोबत सर्फिंगला गेली होती. त्यांच्यासोबत अॅलेनाचे वडीलही होते. सूर्य ही डोक्यावर आला होता, लाटा ही खूप मोठ्या नव्हत्या , बेथनी तिच्या सर्फ बोर्डवर संथपणे ऊन घेत पडली होती. तिचा डावा हात तिने पाण्यात सोडला होता, इतक्यात १४ फूट उंच टायगर शार्कने तिच्यावर हल्ला केला. तिला काही समजण्याआधीच तिचा डावा हात खांद्याच्या जरा खालून त्या शार्कने सर्फ बोर्डसकट चावला होता. पाण्यात रक्ताची लाली पसरली. अॅलेनाच्या वडिलांनी तातडीने tourniquet तिच्या डाव्या हाताला करकचून बांधलं व तिला हॉस्पिटलला घेऊन गेले. बेथनीला त्यावेळी फारश्या वेदना जाणवल्या नाहीत पण हॉस्पिटलला जाताना भरपूर रक्तस्त्राव झाल्यामुळे मात्र तिला बधिरपणा जाणवू लागला व ती थंड पडू लागली. तिच्यावर तातडीने सर्जरी करावी लागली. पुस्तकात तिच्यावर दोन सर्जरी केल्याचे म्हटले आहे एका सर्जरीत तिच्या दंडाचे जे काही मांस, हाडाचे तुकडे उरले ते काढावे लागले. दुसर्या सर्जरी मध्ये तिची जखम बंद करण्यासाठी कातडीचे आवरण लावून टाके घालायचे होते. तिला पूर्ण बरे व्ह्यायला काही दिवस लागले. इथे तिच्या कुटुंबासमवेत इतरांना वाटले की बेथनीचे सर्फिंग करियर आता संपुष्टात आले, तर बेथनीने स्वतःला कमकुवत न समजता पुढे ही आपण सर्फिंग सुरु ठेवणार असे ठरवले होते.
हॉस्पिटलमध्ये असतानाची बेथनी.

*छायाचित्र आंजावरून साभार
तिच्या हट्टामुळेच एक महिन्याच्या आतच ती पुन्हा सर्फिंगसाठी सज्ज झाली. तिने स्वतःवर खूप मेहनत घेतली, एका हाताने सर्फ करणं कठिण जात असतानाही तिने मेहनत करणं सोडले नाही. त्याच पाण्यात सराव करताना बिथरली नाही. २००४ साली तिने एका हाताने सर्फिंग करून Open Women’s division स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले , ती तिथेच थांबली नाही अथक परिश्रम करून तिने २००५ च्या NSSA National Championships मध्ये पहिले स्थान मिळवले. आज बेथनी जगातील एक ख्यातनाम व यशस्वी सर्फर आहे ते तिचा स्वतःवर असलेल्या विश्वासामुळे, मेहनतीमुळे.

*छायाचित्र आंजावरून साभार
ज्या शार्कने बेथनीवर हल्ला केला होता त्या शार्कला घटना स्थळापासून काही अंतरावर एका कोळ्याने पकडून मारले होते. पोलिस तपासणीत समजले की शार्कच्या तोंडात बेथनीच्या सर्फ बोर्डचे अवशेष होते.
टायगर शार्क व बेथनीचा सर्फिंग बोर्ड.

*छायाचित्र आंजावरून साभार
सोल सर्फर ही बेथनी हॅम्लिटनची आत्मकथा आहे ज्यात तिचे पूर्वीचे आयुष्य, शार्क हल्ला व रिकव्हरी, हल्ल्यानंतरचे आयुष्याबद्दल वाचायला मिळते. ह्याच पुस्तकावर आधारीत सोल सर्फर नावाचा सिनेमा २०११ साली प्रदर्शित झाला होता ज्यात बेथनी हॅम्लिटनची भूमिका अॅनासोफिया रॉबने केली होती, चित्रपट पण छान जमला आहे.
अगदी सुरुवातीपासून खिळवून ठेवणारे पुस्तक आहे हे. बेथनीच्या शार्क-हल्ल्यापासूनच्या प्रवासात आपण ही नकळत कधी सामील होतो लक्षात ही येत नाही. तिच्या साहसाबद्दल कौतुक आहेच पण ह्या शार्क-बिटन सर्व्हायवरला, तिच्या कमालीच्या जिद्दीला मानाचा सलाम करावासा वाटतो.
सोल सर्फर बेथनी हॅम्लिटन

*छायाचित्र आंजावरून साभार