जुळ्यांचं दुखणं

विषय थोडासा वेगळा आहे, खरंय, पण यच्चयावत जुळ्या भावा बहिणींच्या मनातला आहे. विशेषतः IDENTICAL TWINS! माझ्या नवऱ्याला आणि दिराला (पूर्वी रोज आणि हल्ली कधीकधी) या प्रश्नोत्तरांच्या फैरीला सामोरं जावं लागतं. तुम्ही सुद्धा आठवून बघा , जेव्हा जेव्हा जुळ्या व्यक्ती एकत्र समोर येतात तेव्हा संभाषण या रुळांवरून चालते.

"अरे वा! किंवा अरेच्च्या किंवा अय्या (हे समोरच्या व्यक्तीच्या स्त्री किवा पुरुष असण्यावर अवलंबून आहे .) तुम्ही जुळे आहात? मला माहितीच नव्हते!" या प्रश्नावर मोठ्ठे झालेले डोळे, तेव्हढाच मोठ्ठा वासलेला तोंडाचा "आ" आणि चेहर्‍यावर कोणी अजब प्राणी बघायला मिळाल्याचा कुतूहलमिश्रित भाव हेही आलेच! आता 'आम्ही जुळे आहोत' ही काय पाटीवर लिहून, गळ्यात घालून मिरवण्याची गोष्ट आहे ? की साऱ्यांना महिती असायलाच हवी अशी घटना आहे? बरं , यानंतर पुढचे वाक्य तयार असतंच की, "मग कित्ती मज्जा?" !!!!

मला सांगा ,जुळे असण्यात कसली आलीय मज्जा? लोकांची असेल पण जुळ्यांना चांगलीच सजा होते. जिथं जावं तिथं लोकांची कुजबुज, पुन्हा पुन्हा लोकांच्या वळणाऱ्या माना आणि नजरा, सूचक हास्य (?) .सेलिब्रेटीजना कशाला तोंड द्यावे लागत असेल याची थोडीफार कल्पना येते.

"तू त्याच्या कॉलेजला (आता ऑफिसला) जायचं आणि त्यानं तुझ्या !!!!?????? " कशासाठी? तुम्हाला धमाल येईल म्हणून? अशावेळी उसने हसू तोंडावर आणून "ही ही ही" करावे लागते. कधी एकदा नॉर्मल संवाद चालू होतो याची वाट पाहण्याखेरीज आपल्या हाती काही नसतं. .पण एवढे नशीबवान जुळे नसतात.
"तुमची लग्ने झालीत ? मग तुमच्या बायका कशा ओळखतात तुम्हाला? आणि लग्न झालेलं नसेल तर "आई कशी ओळखते?"

आता काय बोलणार? पण इथे लोकांची तुमच्याकडून खरोखरीच उत्तराची अपेक्षा असते.मग "मला या डाव्या कपाळावर तीळ आहे, हा बघा पण त्याला नाही " असे काहीतरे थातूर मातुर उत्तर द्यावे लागते. आता ज्यांच्या गालावर, नाकावर किंवा अशा दर्शनीय वा बोलनीय भागावर तीळ आहे ते सुटतात पण इतरांची कथा काय सांगावी? एकदा तर एका महाभागानं असाही प्रश्न विचारला की "तो तीळ वगैरे ठीक आहे हो पण समजा वीज गेली तर कसं ओळखतात?" यावर माझ्या नवर्‍याने अत्यंत गंभीरपणे उत्तर दिले की, "त्याचं काय आहे आम्ही जुळे आहोत, मुके किंवा बहिरे नाही! आम्हाला तसेच आमच्या बायकांना बोलता येते त्यामुळे आम्ही आवाजावरून ओळखतो.." पण म्हणतात ना ,"common sense is not so common" !

"तुम्ही बायका सुद्धा जुळ्या करायला हव्या होत्या. म्हणजे सोलिड गम्मत झाली असती."
खरं तर हा सारा विनोदी प्रकार इथेच थांबायला हरकत नाही, पण छे ! समोरची व्यक्ती ही 'गम्मत' शेअर करायला आपल्या मुलांना बोलावते." सोनू, गम्मत दाखवते ये तुला ! हे बघ दोन जुळे काका" आणि मग तो सोनू वा मोनू या जुळ्या काकांकडे टकमक टकमक बघू लागते. आता ते लहान मुल असेल तर ठीक आहे पण यांची श्री अथवा सौ. असेल तर मग झालेच! "अय्या तुम्ही जुळे आहात? " पासून सुरुवात !!
आणि विचारल्या जाणार्‍या प्रश्नाचा हा नमुना बघा.

"तुमची मुले सुद्धा जुळीच आहेत का? नाही? अरेरे!"
"तुम्ही सेम सेम कपडे का नाही घालत?"
"एकाला ताप आला कि दुसरयाला पण येतो ?"
"एकाला लागले कि दुसरयाला दुखते?"
"आणि एकाने औषध घेतले की दुसऱ्याला बरे वाटते?"
"तुम्हाला दोघांना एकदमच भूक लागते का हो?"

आता बोला! अशा वेळी हसावे कि रडावे कळत नाही. मनातले सर्व हिंस्त्र विचार मनातच ठेऊन सुहास्यवदन ठेवायला बालपणापासूनची सवयच लागते.

जुळे असण्याने होणारे गैरसमज तर वेगळेच. पासपोर्ट किंवा तत्सम सरकारी खात्यात घोळ होतोच होतो .माझ्या दिराचा पासपोर्ट आधी बनवला आणि काही वर्षांनंतर माझ्या नवर्‍याचा. त्यावेळी संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरून सुद्धा पासपोर्ट मिळाला नाही आणि कार्यालयातून पत्र आले कि त्या जन्मतारखेच्या दिवशी, त्याच जन्म ठिकाणी आणि त्याच आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तीचा पासपोर्ट आधीच दिलेला आहे त्यामुळे पुन्हा दुसरा पासपोर्ट मिळणार नाही. मग पुन्हा सर्व स्पष्टीकरण दिले.शेवटी "आम्ही दोघे एकाच नाही तर दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहोत" असे एक affidavit दिल्यानंतर एकदाचा पासपोर्ट मिळाला.

आमच्या एका शेजाऱ्यांनी अगदी अचानक आमच्याशी बोलणे बंद केले.आम्हाला कारण काही समजेना . मागाहून कळले की, इंद्रायणीत त्यांच्या समोरच माझा नवरा बसलेला पण ओळख सुद्धा दाखवली नाही म्हणे ! मग आमच्या डोक्यात प्रकाश पडला की तो नक्कीच दुसरा भाऊ असणार. शेवटी "तो मी नव्हेच" असे सांगून रुसवा दूर केला. पण प्रश्न आलाच " अहो आधी का नाही सांगितलेत की तुम्हाला जुळा भाऊ आहे म्हणून?" या प्रसंगानंतर रस्त्यावरील कुणीही अनोळखी किंवा ओळखीचे माणूस किंचितसे देखील हसताना दिसले तर हे दोघे अगदी तोंड पसरून हसून देतात. उगाच कुणाचे मन दुखायला नको. त्याशिवाय आता असे होणारे गैरसमज टाळण्यासाठी आम्ही एक स्पेशल पुणेरी पाटी करायला दिली आहे " इथे जुळ्यापैकी एक भाऊ राहतो. आमच्या जुळे असण्यामुळे जर तुमचा काही गैरसमज झाला असेल तर माफी असावी. पण यात आमची काहीही चूक नाही हेही ध्यानी ठेवावे. "

दोन जुळ्या बहिणी माझ्या पेशंट आहेत. त्या तर या प्रकाराने इतक्या वैतागल्या आहेत की त्या कधीही एकत्र घराबाहेर पडत नाहीत. इतकेच नाही तर त्यांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश घेतला होता ! आता लग्नाचे वय आलेय, त्यामुळे होऊ घातलेले बघण्याचे समारंभ हे त्यांना आलेले मोठ्ठे टेन्शन आहे.

बिच्चारे जुळे ! जुळ्यापैकी एक म्हणून जन्माला येणे काही कुणाच्या हातात असते का?. नशीब बिचाऱ्यांचे" असे म्हणू आपण ! पण असे संवाद टाळणे तर आपल्या हातात आहे. सर्व जुळ्यांच्या (आणि त्यांच्या नवरे / बायकांच्या)वतीने माझी तुम्हाला ही हात जुळवून विनंती !