माझ्या आठवणीतल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या हे मी आणि माझी छोटी भावंड यांचं मिळून एक गुळपीठ आहे. आम्ही तिघी बहिणी. मोठी बहिण माझ्या पेक्षा सहा वर्षांनी मोठी, छोटी बहिण अंकिता माझ्याहून दोन वर्षांनी लहान. दीदीच्या आणि आमच्या वयात बरंच अंतर, त्यामुळे आम्ही खेळत्या वयाचे होई पर्यंत तिचं अभ्यासाचं वय सुरु झालं होतं. तिचं विश्व आमच्या पेक्षा वेगळं होतं. ती आमच्यात खेळायला वगैरे कधी नसे. शिवाय तिला खेळण्यापेक्षा स्कॉलरशिप परिक्षेत राज्यात पहिले येणे, निबंध, भाषण स्पर्धात दणकुन यश मिळवणे, मोत्यासारखं सुंदर अक्षर काढणं अशा अघोरी गोष्टी करायला आवडे. याच्या अगदी उलट मी आणि अंकिता.!! आमच्या कंपूतले अजून दोन मेंबर म्हणजे माझी चुलत भावंडं वसुधा आणि विनेश!! वसु आणि अंकिता अगदी एका वयाच्या, विनेश घरातलं शेंडेफळ!! आम्ही एकमेकांचे चुलत + मावस भावंड असल्याने आमच्यात एक आजोळ, एक गाव, एकाच मामेमंडळी असे अनेक समान धागे होते. आमच्या दिसण्या वागण्यात ही बरंच साम्य.
उन्हाळ्याची सुट्टी ला मावशी या दोघांना घेऊन आमच्याकडे यायची. ही वसु म्हणजे अगदी एक कटकट प्रकार होता. प्रचंड म्याळ, रडूबाई !! उठल्या उठल्या कारण नसताना भोकाड पसरून बराच वेळ रडणे आणि मगच दिवसाची सुरुवात करणे हा तिने स्वत:ला लावलेला नियम ! या व अशा अनेक सदगुणांमुळे ती नेहमीच आमच्या हिटलिस्ट वर असे. तिला बोलताना आम्ही फार कमी वेळा ऐकलं होतं. म्हणजे तिला बोलता यायचं पण शब्द पुरवून पुरवून वापरायला ती तेव्हापासूनच शिकली होती. ती फक्त तिच्या आईच्या कानातच बोलायची. सतत मावशीचा पदर धरून फिरायची. पण तिचं आमच्याकडे बारीक लक्ष असायच. आम्ही कुठे बाहेर पडायला लागलो कि लगेच रडून मागे लागायची. आम्हाला तिला कधीच सोबत न्यायला आवडायचं नाही. कारणं अनेक, एक म्हणजे धावणं सोडा पण धड पटापट चालायची पण नाही, तिथे येऊन पण खेळायची तर नाहीच, वरुन तिला वाटलं कि भोकाड पसरून घरी जाण्यासाठी रडायची, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे बाहेरचे सगळेच उद्योग काही घरी सांगण्यासारखे नसत ! इतरवेळी हिच्या तोंडातून शब्द बाहेर येणार नाही पण अशावेळी आईबाबांसमोर पोपटासारखी बोलायची. आमच्यात नेहमी कोल्डवॉर चालू असायचं. ती एकटी कधी तावडीत सापडतेय याची आम्ही वाटच पाहत असायचो.
तिला एक छंद होता, अंगणातल्या जास्वंदाची फुल पडतील तशी गोळा करायची आणि आईला नेऊन द्यायची, तेवढाच वेळ ती आईपासून लांब यायची. मग आम्ही काय करायचो, मुद्दाम फुल तोडून खाली टाकायचो आणि भिंतीशी दबा धरून बसायचो,ती फुल न्यायला आली की धरून धपकावायचो ! खरतर तिला मारायची पण गरज पडायची नाही, नुसतं अंगावर धावून गेलं तरी ती अर्धा तास रडण्याची निश्चिंती असायची. :)
आई आणि मावशी आमच्या या त्रासाला वैतागलेल्या असायच्या. एकदा आम्ही उन्हाचं बाहेर खेळू नये म्हणून आम्हाला आमच्या मित्रपरिवारासह घरातच कोंडून दोघी बाहेर कुठेतरी गेल्या होत्या. वसु बाई दुपारची झोप घेत होत्या, आईने आम्हाला तिला व्यवस्थित सांभाळायची तंबी दिली होती. त्या गेल्यावर आम्ही घरातल्या घरातच पकडापकडी खेळायला लागलो. खेळता खेळता मी कपाटावर चढले, आणि दाण्णकन उडी मारली ही उडी वसु पासून चांगले दिड दोन फुट लांब पडली होती. पण त्या आवाजाने ती दचकुन उठली. तसं बघायला गेलं तर तिला रडायचं काही कारण नव्हतं पण नाही, हिने जो खच्चून भोंगा पसरला की बस्स !! आता जर आई परतली तर काही खरं नाही या विचाराने माझी बोबडी वळली. तिला हरप्रकारे समजावून झालं, सगळ्यांनी नाचून दाखवलं, गाऊन दाखवलं, पण उपयोग नाही, फ्रिजमधलं आईसक्रीम काढून दिल्यावर तिने ते मटकावले आणि परत नव्या दमाने रडायला सुरुवात केली. आई मावशी परत आल्यावर माझी चांगलीच कंबख्ती भरली.
इतकं सगळं असूनही सुट्टी संपवून ते सगळे परत जाताना आम्हाला रडू यायचं, जाताना वसू सुद्धा जवळ येऊन आमची पापी घेत असे. ते गेल्यावर करमायचं नाही, वाटायचं उगीच भांडलो. पुढे जरा मोठी झाल्यावर वसु पण बरीच माणसात आली. ती साधारण दुसरी तिसरीत असताना तिची परिक्षा संपल्या संपल्या एकटीच आमच्या कडे हजर व्हायची, मावशी विनेश बरोबर मागाहून येत असे. तोपर्यंत वसु, महिनाभर निवांत आमच्या सोबत रहायची, आमच्यातलं वैर एव्हाना संपलं होतं. आणि झकास मैत्रीही जमली होती. ती आई-वडिलां शिवाय कशी छान राहते याचं बरंच कोडकौतुक व्हायचं. त्याबाबतीत मात्र आम्ही याबाबतीत फार मागे. तिच्यासारखं आपलंही कौतुक व्हावं आणि दूर गेल्यावर आपली किंमत कळून आई-बाबांना त्यांच्या चुका समजाव्यात, :) म्हणून आम्ही पण एकदोनदा मोठ्या मावशीकडे ,आत्याकडे एकटे रहायला गेलो, आणि दुसर्याच दिवशी घरची आठवण काढून भोकाड पसरल्यामुळे लगोलग घरी आणून सोडण्यात आले.
उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर उंच उंच झुलणारा झोपाळा दिसतो. सुट्टीचं आणि झोपाळ्याचं नातंच तितकं घट्ट आहे. परिक्षा संपताच माळ्यावरून ज्या काही वस्तू खाली येत त्यात एक मजबूत दोरखंड पण असायचा. शेवटचा पेपर कसाबसा लिहून आम्ही जवळपास धापा टाकतच घरी पोहचायचो. आमची लगबग पाहून आई हसायची.बाबा आमचं 'सुट्टीचं खोकं ' खाली काढत, आणि आमच्या आनंदाला उधाण यायचं. त्यात असायचं कॅरम बोर्ड, त्याच्या सुंदर सुंदर सोंगट्या, बुद्धिबळाचा पट, त्याची चतुरंगी सेना,पत्त्याचे सेट्स, सापशिडी, गोष्टींची पुस्तकं, चित्रकलेची पुस्तकं, रंग, आणि सर्वात महत्वाचा म्हणजे झोपाळ्याचा दोर!!! आमच्या घराला खूप मोठा सोपा होता, त्याच्या तुळईला झोपाळा बांधला जायचा. त्यावर उशी टाकुन झोक्याचा खेळ सुरु व्हायचा. एकानं बसायचं, दुसर्याने झोका द्यायचा आणि तिसरीने मोजायचे. झोके घेऊन घेऊन गरगरायला लागे पर्यंत हे असं चालणार.शेवटी आई दामटवून झोपाळा बंद करायला लावायची.
दिवसभर अख्ख्या गावभर उंडारत फिरायचो, आमच्यात राहून राहून वसू पण आमच्या सारखीच झाली होती, आता ती चुगल्या पण करत नसे. गावाभरातल्या सर्व आंब्यांचे पाड ढापणे, आंब्याचे मालक आले की धूम पळणे, मिळालेल्या पाडांच्या अढी घालणे, बाकीच्या दोस्तांच्या अढी त्यांच्या नकळत हडप करणे, आणि आपल्या अढ्या प्राणापलीकडे जपणे हे आमचं आवडतं काम. तसं बघायला गेलं आमचं घर हे गावातलं एक पांढरपेशी आणि आदरणीय घर, त्यामुळे आंबे ढापताना जरी मालकांना सापडलो तरी ते बिचारे बाबांना सांगायला येत नसत. तरी एकदा बाबांना हे सगळं कळालच. भरपूर मार मिळाला. नंतर बाबा खास कोकणात जाऊन आमच्या साठी आंबे आणत. पण "स्वकष्टाच्या" आंब्यांइतकी चव त्याला यायची नाही. आम्ही एकदा बाबांना हे ही समजवायचा पण प्रयत्न केला की, तशा अढ्या घालून आम्ही त्यांचे आंब्यासाठीचे पैसेच वाचवत होतो. नंतर काय झाले ते आता सांगत बसत नाही.
बाबांचे पैसे वाचावे हे आमच्या नेहमी डोक्यात असे. त्यासाठी एकदा आम्ही तिघींनी एकमेकींचे केस घरच्या घरी कापले होते. पण आई तिथे आली आणि का माहिती का आम्हाला पाहून जोरात किंचाळली. आणि एवढं करून ही त्यांनी न्हाव्याला बोलावून आमचे केस परत कापले, अन यावेळी जरा जास्तच बारीक!!
आम्ही एक चिठ्ठ्यांचा एक खेळ पण खेळत असु. त्याचे नियम आता निटसे आठवत नाहीत पण त्यात राजा, राणी, गुलाम, चोर असं लिहिलेल्या चिठ्ठ्या असत. घड्या घालून त्या चिठ्ठ्या टाकल्या की प्रत्येकाने पटकन एकेक चिठ्ठी उचलायची. राजाला १०० गुण, राणीला ७०, गुलामाला ५० आणि चोराला शुन्य असे गुण मिळत. कोणीतरी एकजण त्या मिळालेल्या गुणांचा तक्ता मांडे, खेळाच्या शेवटी प्रत्येकाला मिळालेल्या गुणांची बेरीज होऊन ज्याला सर्वात जास्त गुण तो राजा ते सगळ्यात कमी गुण वाला चोर व्हायचा. पुढे-पुढे आम्ही या खेळाचं मराठी चित्रपट सृष्टी वर्जन तयार केलं, म्हणजे त्या ट्रेडिशनल राजा राणी आणि कंपनी ला डच्चू देवून त्याऐवजी तात्याविंचु, रेडेआण्णा, अंबु, आवडा, कवट्या महाकाळ, इन्स्पेक्टर महेश जाधव वगैरे मंडळींना पाचारण केलं होतं, त्यामुळे व्हायचं असं की हव्या तितक्या लोकांना खेळता यायचं, आणि प्रत्येक वेळेला चिठ्ठया पडल्यावर गडबडा लोळेपर्यंत हसता यायचं. ज्याला जी चिठठी सर्वात जास्त वेळा आली त्याला तो किताब मिळायचा. मात्र जो कोणी रेडेआण्णा किंवा 'अंबू' व्हायचा त्याची भयंकर चेष्टा व्हायची. एकदा याच खेळात माझ्या छोटया भावाला इतक्यांदा 'अंबू' ची चिठठी आली की त्याने शेवटी चिडून भोंगाच पसरला. आणि आमची मात्र हसून हसून मुरकुंडी वळली. आता तो एअरफोर्स मध्ये आहे पण अजूनही 'अंबू' चा पिक्चर लागला कि आम्ही हळूच त्याच्याकडे बघून फिदीफिदी हसतो.
संध्याकाळची जेवणं झाली रे झाली की आम्ही चटया घेऊन अंगणात धावायचो. उकाड्याची काहिली घरात खूप जाणवायची, अंगणात त्यामानाने खूप बरं वाटायचं. आमचं ते गाव म्हणजे दोन मंदिरांना सरळ रेषेत जोडणारा एक रुंद रस्ता व त्याच्या दोन्ही बाजूला घरांच्या रांगा… कुठही गल्ली नाही कि बोळ नाही, तिथल्या माणसासारखंच ' साधं आणि सरळ ' !!! तो रस्ताच हेच प्रत्येक घराचं अंगणसुद्धा, त्यामुळे हा रस्ता अतिशय स्वच्छ आणि फुलाझाडांनी सजलेला होता.
आमच्या अंगणात मोगऱ्याचा एक अगदी फोफावलेला वेल होता. त्याला व्यवस्थित बांधुन माडीच्या सज्जावर चढवण्यात आलं होतं, उन्हाळ्यात तो मोगरा शेकडो फुलांनी लगडून जायचा. आम्ही चटया टाकून चांदण्यांकडे बघत बसायचो. कधी गाण्यांच्या भेंड्या, खेळल्या जायच्या,पत्त्यांचा डाव पडायचा. बर्याचदा मोठी माणसंसुद्धा बाबांशी गप्पा मारायला जमायची. मग धम्माल गप्पांचा फड रंगायचा, कॉंग्रेस विरुद्ध भाजपा अशा तुंबळ चर्चा झडायच्या, त्यातलं आम्हाला काही म्हणता काही कळायचं नाही पण ऐकायला फार भारी वाटायचं. अशी हालचाल जवळजवळ प्रत्येक अंगणात असे. कामंधामं आवरून घरातल्या बायका सुद्धा आपल्या अंगणात वाऱ्याला बसायच्या, त्यांच्या गप्पा पण ऐकण्यासारख्या असायच्या. आम्ही अगदी कान टवकारून त्यांचं हळू आवाजातलं बोलणं ऐकायचो. त्यामुळे गावातल्या ज्या गोष्टी आईलाही माहित नाहीत त्या माहितीचा साठा आमच्याकडे असायचा.नको ती माहिती नको तिथे आणि नको त्या माणसांसमोर दिल्यामुळे आम्ही बऱ्याचदा धम्मकलाडू सुद्धा पचवलेत ही गोष्ट वेगळी!!
गप्पा आणि माणसांचा पूर ओसरल्यावर आम्ही त्या चटयांवरच कलंडायचो. शेजारचा मोगरा सुगंधाची बरसात करतअसायचा. आकाशातले अगणित तारे आणि वेला वरची असंख्य पांढरीशुभ्र फुलं यात खूप खूप साम्य वाटायचं.या चांदण्या रात्रींनी आमचं आयुष्य किती समृद्ध केलंय हे आता समजतंय. बाबांनी आमच्या केसांत हात फिरवत चांदण्यांच्या किती तरी गोष्टी सांगितल्या असतील. हा ध्रुवतारा, हे सप्तर्षी, हे मृग नक्षत्र, आकाशगंगा !!. त्या गोष्टी ऐकत ऐकतच डोळे मिटले जायचे, पण मग स्वप्नं सुद्धा चांदण्यांचीच पडत. कधी त्या माझ्या भोवती फेर धरत, कधी आम्ही ढगांसोबत लपाछपी खेळत असु. कधी त्या चांदण्या तळहातावरसुद्धा विसावत. आई बाबा शिवचरित्र, रामायण, महाभारताची पुस्तकं तिथेच वाचुन दाखवत, मग चांदण्यांच्या खेळात कर्ण, अर्जुन, भीम सुद्धा !
रोजच्या रोज त्या ताऱ्यांकडे बघतच आमचा दिवस संपायचा. आम्ही तर आकाशातल्या चांदण्या ही आपआपसात वाटून घेतल्या होत्या. ही माझी ही तुझी म्हणून. !!!
शेजारी सुगंधाचा वर्षाव करणारा मोगरा, आणि सौंदर्याचं, अथांगाचं प्रतिक असणारी ती लखलखती दुनिया…. असे श्रीमंत क्षण आम्ही कितीतरी वेळा अनुभवलेत. चांदण्या रोज वेगवेगळ्या दिसतात यावर आमचा आजही ठाम विश्वास आहे. त्यांनी बदलेल्या जागा, चंद्राच्या कला, त्याच्यावरचे ससुले, त्यांच्या सावल्या, असंख्य उल्कापात.. काय काय पाहिलंय आम्ही. 'चांदोबा गुरुजींची शाळा' खरच आकाशात कुठेतरी भरत असणार याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे चांदोबा ला 'मामा' पेक्षा आमच्या गुरुजींच्या सारखी ,पांढरी शुभ्र गांधी टोपी घातलेलंच डोळ्यापुढं यायचं. दिवसभर कानात वारं भरल्यासारखे हुंदडून दमलेली आम्ही भावंडं एकमेकांच्या अंगावर मायेचे हात टाकून झोपी जायचो, अंगावर चमचमत्या चांदण्याचं पांघरूण घेऊन!!! आई-बाबा उशिरा कधीतरी उचलुन घरात नेत असतील ते समजायचं ही नाही.
आता मुद्दाम वेळ काढून चांदण्याकडे पहिल्याला कित्तेक वर्षे झालीत. आजकाल त्या चांदण्याही तेव्हा सारख्या आकाशात सुस्पष्ट, ठसठशीत दिसतही नाहीत. पण त्यांच्याशी जडलेलं नातं मात्र तस्सच आहे. त्यांच्याकडे पाहताना तेव्हा श्वासात मुरलेला मोगऱ्याचा वास आजही आजूबाजूला पसरल्या सारखा भास होतो. इतक्या गर्दीतूनही मला प्रत्येकाच्या चांदण्या आजही ओळखू येतात.त्या होत्या तशाच आहेत अजून !! प्रत्यक्षात चंद्रताऱ्यांवर हक्क सांगण्याची तेव्हाची जिद्द आठवून हळुच हसू येत. आजही बालपण म्हटलं की मला चमचम करणारी देखणी ताऱ्यांची दुनियाच दिसते. जोपर्यंत ते तारे त्या आकाशात आहेत तोवर आपल्या बालपणाची सय कोणीही हिरावू शकणार नाही ही भावना खूप सुखद आहे.

(चित्र आंतरजालावरून साभार)