पीएमएस बद्दल प्रथमच कळलं होतं ते अनिल अवचटांचं कोणतंतरी पुस्तक वाचताना. त्यांनी लिहिलं होतं की महिन्यातल्या काही काळात त्यांची पत्नीशी भांडणं व्हायची. ती विचित्र वागायची, नंतर मात्र नॉर्मलला येऊन माफी मागायची, लाड करायची. त्यानंतर सर्वच स्त्रियांना पिरियड्स आधीच्या दिवसांत असा त्रास होतो का, हे शोधून काढायचं माझं कुतूहल वाढलं. कारण हा नुसता स्त्रीपुरता मर्यादित त्रास नसून याचे अनेक सामाजिक, कौटुंबिक असे बरे वाईट परिणाम होत असणार, असं लक्षात आलं. मग ते का, कसे, काय होतात याचा अभ्यास करण्यासाठी रीतसर एक प्रश्नावली तयार केली. १८ ते ५२ वयोगटातल्या निरनिराळे उद्योग करणाऱ्या उदा. गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्टर्स, आय टी इंजिनिअर, गायिका, अतिशय उच्चपदावर कार्य करणाऱ्या काही अशा जवळपास पन्नास स्त्रियांना, तसंच काहींच्या जोडीदारांना याबद्दल बोलतं केलं. काही स्त्रीरोगतज्ज्ञ तसंच मानसोपचार तज्ज्ञांशी चर्चा करून यावर लिहायला घेतलं.
पीएमएस म्हणजे प्रिमेंस्ट्रुअल सिंड्रोम. पिरियड्स येण्याआधीच्या काळात स्त्रीला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक मानसिक त्रासांना सामोरं जावं लागतं. या सर्व लक्षणांना एकत्रितपणे पीएमएस म्हणता येईल. साधारणपणे पिरियड्सच्या दोन आठवडे आधी यातली लक्षणं दिसायला सुरुवात होते. आणि येण्याच्या दोन तीन दिवस आधी ही लक्षणं तीव्रपणे जाणवतात. का होतात हे त्रास, काय असतात लक्षणं हे आता जाणून घेऊया.
स्त्रीच्या बीजाशयामध्ये तयार होणारे बीज जर फळले तर त्याला गर्भाशयात रुजता यावे, यासाठी स्त्रीचं शरीर दर महिन्याला (होय.. दर महिन्याला!) विशिष्ट बदल घडवतं. या काळात प्रोजेस्टेरॉन या हार्मोनचे प्रमाण वाढलेले तर इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी असते. बीज फळण्याची शक्यता नाहीशी झाल्यावर पुन्हा शरीर ते बदल नाहीसे करून पूर्वस्थितीला यायला लागतं आणि पीरियडसची पूर्वतयारी सुरू होते. या साऱ्या बदलांमुळे तसेच यापायी मेंदूतील सेरिटोनीन या रसायनाच्या बदलत्या पातळीमुळे काही स्त्रियांना हे त्रास उद्भवू लागतात. म्हणूनच स्त्रीच्या शरीर मनावर संप्रेरकांचे (हार्मोन्स) अधिराज्य असते म्हणायला हरकत नाही.
साधारण तिशीनंतर, एखादे मूल झाल्यावर, अतिशय तणावपूर्ण जीवन असणाऱ्या, कौटुंबिक कलहाने त्रासलेल्या स्त्रियांना हे त्रास अधिक जाणवतात असेही एक निरीक्षण आहे.
पीएमएसची निरनिराळी शारीरिक, मानसिक लक्षणं असू शकतात. त्यातली बऱ्याचशा स्त्रियांना जाणवणारी लक्षणं म्हणजे उगाच छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन वाटू लागणे, निराश वाटणे, रडू येणे, झपाट्याने बदलणारे मूड्स्, झोप न येणे, कुठेही जाऊ नये, सर्वांपासून लांब एकटेच राहावेसे वाटणे अशा प्रकारची मानसिक तर डोकेदुखी, अशक्तपणा वाटणे, शरीरात पाणी साठल्याने जड जड वाटणे, छातीत जड वाटून दुखणे अशी काही शारीरिक लक्षणं सर्वसामान्यपणे दिसून येतात. काही जणींसाठी हा त्रास त्यांच्या सामाजिक, व्यावसायिक, वैवाहिक आयुष्यावर पण सावट आणायला लागतो. याची काही उदाहरणं काही जणींनी, त्यांच्या नवऱ्यांनी, मित्रांनी सांगितली आहेत.
- त्याच्या घरच्या लोकांनी फार पूर्वी कधी काही बोललेले तिला या दिवसात नेमके आठवते आणि संताप येतो, तो ती (अर्थातच!) त्याच्यावर काढते.
- तो एरवी कुठे नेत नाही बाहेर म्हणून ही हिणवत असते. आज तो उत्साहाने आला तर ही क्षुल्लक गोष्टीवरून डोक्यात राख घालून घेऊन रडत बसली!
- त्यांना पार्टीला जायचं आहे. पण हिला मी खूप जाड दिसतेय, सुजकट वाटतेय असं वाटत राहून ती खिन्न होते. मग बाहेर जायचंच टाळते.
- तिच्या एकत्रित कुटुंबात तिचं पटत नाही. एकत्र राहण्याशिवाय गत्यंतर नाही अशा कुचंबणेत ती आहे. तिला अशा दिवसात एखाद्या तणावपूर्ण प्रसंगानंतर आत्महत्या करावीशी वाटते.
- ती एका मोट्ठ्या कंपनीत उच्चपदस्थ बॉस आहे. पण एरवी सगळ्यांशी खेळीमेळीने वागणारी ती या काळात तिच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना चिडचिड करून, आरडाओरडा करून वैताग आणायची. तिच्याच हे कधीतरी लक्षात आलं. मग तिने यावर माहिती मिळवून मातही केली.
ही काही प्रातिनिधिक उदाहरणं दिली आहेत. ती इथे लिहायचा उद्देश हा की अशा प्रसंगात बायकांना “या मुडीच असतात, यांचे नखरेच फार.” असं सर्रास म्हटलं जातं. पण दर वेळी ती हे मुद्दाम करत नाहीये, तिच्या मानसिक स्थितीला हाताशी धरून तिचे हार्मोन्स हा खेळ करतात म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. तिला असे लेबल लावून आपण तिच्यावर अन्याय तर करत नाही ना, हा जरूर विचार व्हावा. याने टोकाला जाणारे कौटुंबिक तणावाचे प्रसंग कदाचित टाळता येऊ शकतील.
मग तिला या काळात समजून घेण्यासाठी काय करता येईल?
यासाठी त्याला आणि तिला दोघांनाही काही गोष्टी समजून उमजून वागावे लागेल.
ती काय करू शकते ते आधी पाहू.
- सर्वप्रथम हा एक तात्पुरता शारीरिक मानसिक त्रास आहे, रोग नाही हे लक्षात ठेवायचं आहे.
- तेलकट, अती मीठ घातलेले पदार्थ, वेफर्स, पेस्ट्रीज असं कम्फर्ट फूड खाणे कटाक्षाने टाळावे. जास्त त्रास वाटत असल्यास डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
- अती चहा, कॉफी पिणेही टाळावे.
- रोजचा व्यायाम करणे, वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. व्यायामामुळे फार फरक पडू शकतो. व्यायामामुळे तयार होणाऱ्या एंडॉर्फिन्स या संप्रेरकामुळे आनंदी, उत्साही वाटू लागते, शरीरातले साचलेले पाणी कमी होऊन जडत्वही कमी होते.
- आपण याच काळात असे हायपर वागतो का हे सहज कळू शकते. त्यानुसार मनावर ताबा ठेवायचा. आपण अतीच करतोय असे वाटायला लागलं की मनाचा लगाम खेचायचा! आपण या काळात असे अस्वस्थ होतो याविषयी जोडीदाराशी जरूर बोलावं. या काळात माझी जास्त चिडचिड होते, मला जरा माझ्यात राहू दे, मी आपोआप सामान्य स्थितीला येईन, हे त्याला समजावून द्यावे. या काळात उगाच अती भावनिक होऊन टोकाचे निर्णय घेऊ नये, मागाहून पश्चात्ताप वाटू शकतो! काही दिवसापूर्वी आपली अशी प्रतिक्रिया होती याचेच नवल वाटू लागते!
- स्मार्ट फोन ऍप्स - हल्ली पीएमएसच्या काळातले शारीरिक, मानसिक बदल नोंदवून त्याच्या सूचना देणारी अनेक अॅन्ड्राॅइड अॅप्स उपलब्ध आहेत. माय कॅलेंडर, क्ल्यू, विमेन डायरी, ट्वेन्टी एट डेज लॅटर काही प्रातिनिधिक नावं. ही अॅप्स पीएमएस कधी येईल, त्या काळातले बदलते मूड्स, सोप्या टिप्स, ऒव्युलेशन सायकलची माहिती अशा अनेक प्रकाराने उपयोगी पडतात. सुरुवातीचे काही महिने या नोंदी केल्या की ऍप स्वतःच तुम्हाला रिमाईंडर देऊ लागतं. याचा उपयोग करून 'सहज बोलण्याचा वाद झाला आणि बघता बघता स्फोट झाला...' ही परिस्थिती नक्कीच टाळता येईल.
आता तिच्या या काळात तो काय करू शकतो हे पण पाहू.
- ती कितीही चिडचिड रडारड करत असली तरी तो शांत नक्कीच राहू शकतो. तुम्ही या काळात एक बोललात की अर्थाचा अनर्थ होऊन भांडण वाढू शकते, म्हणून जरा धीराने घ्या. स्वतःवर ओढवूनही घेऊ नका. तिला तिच्या हार्मोन्सनी घेरलंय समजा हवं तर. तिची तीच काही दिवसात नेहमीसारखी वागायला लागेल. आणि हो, हा तिच्यातला दोष समजू नका किंवा तिला नौटंकी समजू नका लगेच! ती मुद्दाम तसे वागत नसून तिच्या हार्मोन्स पुढे हतबल आहे, मुख्य म्हणजे ती स्वत:ही त्रास सहन करतेय हे लक्षात घ्या.
- तिची या काळातली शारीरिक स्थिती समजून घेऊन तिच्याशी वागा. तिला घरच्या कामात मदत नक्की करा.
- तिला एकटं राहावंसं वाटत असेल तर राहू द्या.
- ती अस्वस्थ होऊन भांडणाच्या बेतात आहे असे वाटलं तर उगाच शब्दाला शब्द वाढवण्यापेक्षा बाहेर फिरून या! तुम्ही येईपर्यंत ती शांत झालेली असेल!
- तिला मनस्ताप देणाऱ्या गोष्टी तिच्यापासून तेवढे दिवस दूर ठेवा.
- आणि हो… एरवी कधी भांडलात तर ‘पीएमएस का…’ असलं काही खोचक बोलून तिच्या स्त्रीत्वाचा अपमान तर करूच नका.
काही काळापुरतं झाकोळून जाणारं तिच्या मनाचं आभाळ आहे हे. दर महिन्याला अनेक वर्ष हा त्रास काढतेय ती. जरा समजून घ्या तिला. एकमेकांशी खुलं बोलून एक समृद्ध समजदार नातं आपण या काळात सामंजस्याने वागून तयार करू शकतो. मग का नाही तिच्या मनाचे आकाश मोकळे होणार!

चित्रः सानिका