"पाश्चात्य संस्कृती" या दोनच शब्दात सर्वसाधारण पणे भारताबाहेरील, विशेषतः युरोप किंवा अमेरिकेतील देशांच्या संस्कृतीकडे बघितले जाते. जेव्हा स्त्रियांच्या बाबतीत हा विचार केला जातो तेव्हा आत्मविश्वास असणाऱ्या, हवे तसे राहण्याची, कपडे घालण्याची मुभा असणाऱ्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे उभ्या असणाऱ्या स्त्रिया असे काहीसे चित्र ढोबळमानाने समोर येते. भारतातही अगदी खेड्यापाड्यातील स्त्रियांना जसे शहरातील स्त्री जीवनाचे अप्रूप असते, तसेच साधारण मोठ्या प्रमाणात भारत आणि कुठलाही विकसित किंवा पुढारलेला देश याबाबतीतही असते. कौतुक, असूया, आधुनिकता, स्वैराचार असे काही ना काही पूर्वग्रह डोक्यात असतात. पण प्रत्यक्षात जेव्हा वेगळ्या देशातील आयुष्य आपण अनुभवतो, तेव्हा काही पूर्वग्रह गळून पडतात तर काही नवीन बाबी कळतात, काही आश्चर्यकारक तर काही विदारक. गेल्या अडीच वर्षांपासून जर्मनीतील लोकसंस्कृती अनुभवता आली. नवीन लोक, नवीन भाषा, नवीन संस्कृती आणि त्यासोबतच येथील स्त्रियांचे सामाजिक स्थान, राहणीमान, लहान मुलींपासून तर वयस्कर आज्यांपर्यंत स्त्रियांची कुटुंबातील भूमिका हे देखील दिसले. यादरम्यान आलेल्या काही अनुभवांनी माझ्याही मनातल्या काही कल्पनांना धक्के दिले आणि या विषयावर अजून शोधाधोध करण्यास उद्युक्त केले. मग ही माहिती शोधताना अजून काही नवीन बाबी पुढे आल्या. पहिले आणि विशेषतः दुसरे महायुद्ध आणि २५ वर्षांपूर्वी झालेले पूर्व पश्चिम एकत्रीकरण अशा इतिहासातील घटनांचा जसा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या आयुष्यावर, जडण घडणीवर देखील मोठा प्रभाव पडला. एकोणिसावे शतक ते आजपर्यंत घडलेले बदल, आजची स्थिती, कुटुंबातले स्थान, नोकरी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रातील स्थिती आणि सामाजिक जीवन याविषयी थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न.
इथे आल्यानंतर बाहेरील लोकांबरोबर पहिल्यांदा संवाद सुरु झाला तो जर्मन शिकताना. स्पेन, ग्वाटेमाला, टर्की, कोरिया, जपान, क्रोएशिया, व्हिएतनाम अशा अनेक देशातील लोकांसोबत जर्मन शिकताना वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायच्या. एका अशाच कुठल्याशा कुटुंब आणि नाती याविषयावर बोलताना या सगळ्याच लोकांकडून सासुरवास, आमच्या देशात सुनांना कसे छळले जाते यावर जोरात चर्चा सुरु झाली. यापैकी बहुतेकांच्या मते (ज्यात मीही आले) हे प्रकार फक्त आपल्याच देशात जास्त होतात असे गैरसमज होते, जे साफ पुसले गेले. याशिवाय इतर विषयांवर बोलताना देखील जागतिक पुरुषप्रधान संस्कृतीचा अनुभव यादरम्यान अनेकवेळा आला. "मुलींनी कशाला नोकरी करायला हवी, घरी बसून मुलांना सांभाळावे", "बायकोने मी म्हणेल ते रोज खायला करावे, माझ्या आवडीचेच कपडे घालावे" असे बोलणारे काही लोक होते. सर्रास मिनीस्कर्ट घालणाऱ्या मुली जिथे दिसतात, तिथे बऱ्याच मुलांची अपेक्षा मात्र आपल्या बायकोने कमी कपडे घालू नये आणि इतरांच्या नजरेत येऊ नये अशी होती. या अनेक चर्चांमधून एक लक्षात आले की मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन हा केवळ ती सुंदर दिसावी, तिने छान कपडे घालावे, नवऱ्याला समाधानी ठेवावे असा होता. हे केवळ पुरुषांच्या दृष्टीकोनातून नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रगत देश म्हणवून घेणाऱ्या देशातील मुलींचेही हेच मत होते. स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला नवरा किंवा मुले, किटी पार्टीज आणि शॉपिंग यापलीकडे सुद्धा एक जागा असू शकते असा विचार करणारेही होते पण प्रमाण कमी. आणि याविषयी मी काही वेगळे बोलले की मग "तू तर भारतीय आहेस, तिकडे तर असे होते, तसे होते" असे मला ऐकवले जायचे. हे एकंदरीत जर्मनी शिवाय इतर देशांच्या लोकांबाबत. एकदा करीअर आणि स्त्रिया या विषयावर बोलताना अत्यंत अभिमानाने आमच्या शिक्षकाने सांगितले, "आमच्या जर्मनीत एकाच पोस्ट साठी जर एक स्त्री आणि एक पुरुष उमेदवार असेल तर पुरुषालाच प्राधान्य दिले जाईल आणि जर दोघेही एकाच पोस्ट वर असतील तर स्त्रीचा पगार निश्चित पुरुषापेक्षा कमी असेल" हे ऐकून मी अस्वस्थ तर झालेच पण हे खरे असेल यावरही पुढे अनेक दिवस माझा विश्वास नव्हता. परंतु जेव्हा अधिक सखोल माहितीचा शोध घेतला तेव्हा त्याच्या म्हणण्यात तथ्य होते हे कळले.
जेव्हा माझी नोकरी सुरु झाली आणि तीही नवरा जिथे काम करतोय त्याच कंपनीत, त्याच विभागात तेव्हा हे कळल्यानंतर बऱ्याच सहकर्मचारयानी त्याला विचारले की तू आणि तुझी बायको एकत्र एकाच ठिकाणी नोकरी करणार हे तुला कसे चालते? त्या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे बायकोसोबत नोकरी तर नकोच आणि तिचा पगार आपल्याएवढा हे तर नकोच नको. आमच्या दृष्टीने ही अगदीच सहज बाब होती पण आम्ही जणू खूप काही वेगळे करतोय असे बघितले जात होते. प्रत्येक कंपनीची संख्या, रचना वेगळी असते त्यामुळे इतकी ढोबळ तुलना होऊ शकत नाही पण तरीही ४० ते ४५ लोकांच्या विभागात अभियंता म्हणून काम करणाऱ्या आम्ही ५ मुली होतो. पाचही जणी अल्जेरिया, इराण, बल्गेरिया, मोरोक्को अशा त्यामानाने कमी विकसित आणि छोट्या देशांमधून आलेल्या. इतरत्र फक्त वित्त विभाग, प्रशासकीय कारभार, स्वागत कक्ष अशा ठराविक ठिकाणी महिला आहेत परंतु प्रमाण कमी. ज्या देशाचा कारभार गेल्या १० वर्षांपासून एका महिलेच्या हातात आहे, तिथेच इतर ठिकाणी स्त्रियांच्या बाबतीत दिसणारा काहीसा पारंपारिक दृष्टीकोन अजूनच विचारात पाडणारा होता.
याविषयी थोडे इतिहासात डोकावले असता काय दिसले? अगदी एकोणीसाव्या शतकापर्यंत जर्मनीमध्ये महिलांची स्थिती ही चूल, मुल, चर्च आणि कपडे अशी मर्यादित होती. यालाच जर्मन भाषेत "फिअर का" किंवा 'फोर के' (Vier K - Kinder, Kueche, Kirche & Kleidung) असे संबोधले जाते. १९१९ साली महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. हिटलरने जेव्हा सूत्रं हातात घेतली, तेव्हा त्याने या घडणाऱ्या बदलांना परत पूर्वपदावर आणले. पहिले आणि दुसरे महायुद्ध ही येथील स्त्रियांच्या सामाजिक स्थानात बदल होण्यात महत्वाची घटना ठरली. त्याच्या कारकिर्दीत स्त्रियांनी फक्त लग्न करावे आणि मुलांना जन्म द्यावा अशा पद्धतीचे नियम आणले. भविष्यकाळात आवश्यक असे मनुष्यबळ उभे करणे असा त्यामागचा उद्देश होता. नवीन लग्न झालेल्यांना विशेष सवलती दिल्या गेल्या. जेवढी मुले जास्त, तेवढ्या या सवलती जास्त असे असल्याने मुलांना जन्म देणे हे स्त्रियांचे एकमेव कर्तव्य समजले जाऊ लागले. शाळेपासूनच मुलींवर ही विचारसरणी बिंबवण्यात आली. परंतु काही वर्षातच याचेही अनेक तोटे लक्षात आले. मग स्त्रियांनी देशासाठी राष्ट्रसेवा म्हणून घर संसार सांभाळून शक्य ते काम करावे अशी भूमिका घेतली गेली. या कामाचा त्यांना मोबदला मिळेल याची मात्र शाश्वती नव्हती. स्त्रियांनी महायुद्धाच्या वेळी आणि नंतरही जखमी लोकांची शुश्रुषा करणे हे एक महत्वाचे काम केले. दरम्यानच्या काळात झालेल्या मनुष्यहानीमुळे काही ठिकाणी पुरुषी मक्तेदारीची कामे स्त्रिया करू लागल्या. एकूणच तोपर्यंत केवळ घरातील पारंपारिक कामातून स्त्रिया बाहेर पडू लागल्या.
महायुद्धानंतर प्रचंड मनुष्यहानी झाल्यामुळे स्त्रियांनी काम करणे ही गरज बनत गेली. परंतु तरीही पश्चिम जर्मनीत पुन्हा एकदा स्त्रियांचे जीवन हे चूल आणि मुल यातच बंद होत गेले. पुढे इतर देशातून बरेच जण पश्चिम जर्मनीत कामासाठी आले आणि अधिकाधिक बायका बाहेरच्या कामांपासून परावृत्त होत गेल्या. पश्चिम जर्मनी मध्ये १९४९ मध्ये कायद्याने स्त्री पुरुष समानता जाहीररीत्या मान्य झाली तरीही प्रत्यक्षात कायद्याचा स्वरुपात येण्यास १९५७ साल उजाडले. १९५० सालापर्यंत देखील लग्न झाले की स्त्रीला नोकरी वरून काढणे हे सर्वमान्य होते. तुलनेने पूर्व जर्मनीतील स्थिती अधिक बिकट असल्याने (जी आजही थोड्या प्रमाणात आहे) तिथे स्त्रियांनी घराबाहेर पडणे हे क्रमप्राप्त झाले. पूर्वेतून पश्चिमेकडे पळून येणार्यांमध्ये बहुतांशी पुरूषाच होते. त्यामुळे ही परिस्थिती अजूनच बिकट झाली. पुरुषांची संख्या महायुद्धामुळे इतकी कमी होती की बऱ्याच बायकांचे लग्न होणे कठीण झाले होते. एकूणच सामाजिक आणि आर्थिक स्थिती तेवढी चांगली नसल्या कारणाने तिथे बरेचसे कायदे महिलांसाठी बदलण्यात आले. कारण कामासाठी महिलांची गरज होती. राजकारणात अनेक स्त्रिया सक्रिय होत्या. या सगळ्यातून पुढील काही काही वर्षात पूर्व जर्मनी मधील महिलांचे सामाजिक स्थान पश्चिम जर्मनीच्या तुलनेत बरेच वरचढ होते.
यानंतर दशकभरानंतर म्हणजेच १९६० नंतर एकीकडे पश्चिम जर्मनीतील महिला या त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक होत गेल्या. लग्नातील समान अधिकार, नोकरी करण्याची परवानगी आणि इतरही समान हक्कांसाठी मागण्या आणि आंदोलने सुरु झाली. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर १९७७ मध्ये त्यांना स्वतंत्रपणे नवऱ्याच्या परवानगी शिवाय घटस्फोटाची मागणी करण्याचा अधिकार आणि लग्नानंतर नोकरी करण्याचा अधिकार मिळाला. सुरुवातील शालेय शिक्षण पूर्ण होणे इतपतच स्त्रियांच्या समान अधिकारात गणले गेले होते. १९८० नंतर विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ होऊ लागली. असे असूनही पारंपारिकतेचा प्रभाव असणाऱ्या अनेक जणींनी उच्च शिक्षण घेण्यात पुढाकार घेतला नाही. म्हणजेच ही स्थिती अगदी आता आता पर्यंत होती. पुढे १९९० मध्ये पूर्व पश्चिम एकत्रीकरण झाले. इतिहासातील अजून एक महत्वाची घटना घडली. पण पुर्व जर्मनीतील महिलांवर या एकत्रीकरणाचा अजून एक परिणाम झाला तो म्हणजे तेथील अनेक उद्योग बंद पडल्याने अनेकींचे रोजगाराचे साधन गेले. आर्थिक स्थिती पश्चिमेच्या तुलनेत तेवढीशी चांगली नव्हती. आणि त्यात पुन्हा नवीन संकटे समोर आली. पूर्वेकडील महिलांचे असे प्रश्न तर पश्चिमेकडील महिलांवर असलेला परंपरागत विचारसरणीचा प्रभाव अशा बाबतीत दिसणारा हा असमतोल कमी करण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. आज युरोपातील सर्वात सामर्थ्यवान असणाऱ्या देशात ही परिस्थिती बऱ्याच अंशी बदलली असली तरीही अजूनही स्त्रियांची स्थिती पुरुषांच्या बरोबरीत आलेली नाही. आजही सरकार अनेक प्रकारे हा बदल घडवण्यासाठी कार्यरत आहे. आज २०१२ ते २०१४ दरम्यान मला माझ्या वर कथन केलेल्या अनुभवा व्यतिरीक्त काय दिसले?
आजूबाजूला बघताना सर्वसाधारणपणे असे आढळले की बेकरी, दुकाने, शाळेतील शिक्षिका, बँका, ऑफिसेसमध्ये फायनान्स, किंडर-गार्टन, पाळणाघरे, हेअर ड्रेसर, काही सामाजिक सेवा जसे की वयस्कर लोकांच्या घरी जाउन तिथे शुश्रुषा करणे, मतीमंद मुलांसाठी काम करणे, फार्मसी अशा ठिकाणी महिलांची मक्तेदारी किंवा संख्या जास्त आहे असे म्हणायला हरकत नाही. पाळणाघरे म्हणजे भारतात बरेचदा मध्यम वयीन बायकांसाठी उत्पन्नाचे साधन समजले जाते, पण इथे त्यासाठी सुद्धा विशेष शिक्षणाची आवश्यकता आहे. ते झाले की बऱ्याच तरुण मुली या व्यवसायात दिसतात. बेकरी किंवा दुकानांमध्ये काम करणार्यांमध्ये कॉलेज वयीन किंवा मग वयस्कर स्त्रियांचे प्रमाण जास्त दिसते. अभियांत्रिकी, वैद्यकीय, संशोधन, विद्यापीठातील प्रोफेसर, भाषाशास्त्र किंवा कुठल्याही क्षेत्रातील उच्च शिक्षण या क्षेत्रात स्त्रिया आहेत परंतु प्रमाण कमी. म्हणजेच अजूनही स्त्रियांचे आणि पुरुषांचे व्यवसायाचे स्वरूप भिन्न आहे. दोघांची क्षेत्रे वेगळी आहेत. कायद्याने अनेक समान अधिकार दिलेले असूनही, पारंपारिक स्त्रियांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायातच शिक्षण घेणाऱ्या मुली जास्त आहेत. त्यातही लग्नानंतर किंवा मुले झाल्यानंतर नोकरी करायची इच्छा बरीच कमी दिसते आहे. किंवा पार्ट टाईम नोकरीला प्राधान्य दिले जाते. यासंबधी माहिती शोधताना असे दिसले की उच्च पदांवरील जागा किंवा प्रमुख व्यक्ती म्हणून एखादे पद भूषविणाऱ्या महिला, विशेषतः प्रोफेसर्स, खाजगी कंपन्यातील कार्यकारी मंडळ अशा उच्च पदस्थ ठिकाणी महिलांचे प्रमाण नगण्य आहे. काही ठिकाणी महिला असल्या तरी त्यातील बऱ्याच इतर देशातील स्थलांतरीत आहेत. विद्यापीठात शिक्षणघेणाऱ्या देखील स्त्रियांमध्ये परदेशी स्त्रियांचे प्रमाण जर्मन स्त्रीयांपेक्षा जास्त आहे. विद्यापीठात पदवी शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण आणि त्यानंतर नोकरी किंवा पुढील शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण यांच्यात प्रचंड तफावत आहे. यासाठी सध्या शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु असले तरी प्रत्यक्षात बायकांना पुढे जाण्यात बरेच अडथळे येतात.
मग घर आणि पूर्णवेळ नोकरी हे दोन्ही सांभाळण्यासाठी इतके कष्टमय आयुष्य आहे का किंवा सवलती मिळत नाहीत का? यातील काही जणींना कदाचित आवड नसेल, काहीना आर्थिक गरज नसेल, तर काहींना मुले सांभाळणे हे जास्त महत्वाचे वाटते. पण बहुसंख्य महिलांना वर्किंग वुमन किंवा विशेषतः वर्किंग मदर नको आहे, केवळ नको आहे म्हणण्यापेक्षा बरेचदा त्यात अपराधीपणाची भावना आहे. पारंपारिक काळापासून जे चालू आहे तेच आताही चालू आहे. प्रत्यक्षात नोकरीच्या क्षेत्रात इथे महिलांना कायद्याने बऱ्याच सवलती आहेत. उदा. बाळंतपणाची रजा किंमान काही आठवडे असतेच, यात साधारण तीन महिने संपूर्ण पगार आणि नंतर वर्षभरा पर्यंत तुम्ही नोकरी सुरक्षित ठेवू शकता. शिवाय मुलांसाठी सरकार वेगळे पैसे देतेच. मुलांच्या आजारपणासाठी आई आणि वडील प्रत्येकी दहा दिवस सुट्ट्या वर्षाला आणि याशिवाय स्वतःच्या ३० सुट्ट्या. (शनि रवि सोडून) त्यातही मुलांच्या कारणासाठी सुट्टी पाहिजे म्हटले की विना कटकट मंजूर केली जाते. "कशाला हवी आहे सुट्टी", मागच्या आठवड्यात पण आजारी होता तुमचा मुलगा, तेव्हाच घेतली की, अजून कुणी नाहीये का त्याला सांभाळायला, माझ्या मुलाला माझी आईच नेते इ. इ. प्रतिप्रश्न विचारणे बॉसला गोत्यात आणू शकते. शिवाय बऱ्याच ठिकाणी कामाच्या फ्लेक्सीबल वेळा. कामाच्या वेळा नंतर ऑफिस मध्ये फार थांबावे लागत नाही. घरून काम करण्यासाठी बरेचदा परवानगी मिळू शकते. अशा अनेक सोयी असूनही एकंदरीत चाकोरीबाहेरचे काम किंवा तत्सम नोकरी करणाऱ्या बायकांचे प्रमाण इतके कमी का?
यामागची काही कारणे पहिली तर ढोबळमानाने खालील काही मुद्दे आढळले. (हीच आणि एवढीच करणे असतील असे नाही)
१. सारख्याच कामासाठी पुरुषांच्या तुलनेत मिळणारा कमी मोबदला. अजूनही महिलांना मिळणाऱ्या पगारात आणि पुरुषांना मिळणाऱ्या पगारात बरीच तफावत आढळते. ही तफावत बरेचदा ३५-४० टक्के कमी पगार इतकी असू शकते. मग कशाला हवीये नोकरी ही मानसिकता तयार होणे स्वाभाविक असू शकते.
२. पारंपारिक विचारसरणीने अजूनही मुले सांभाळणे हेच बायकांचे कर्तव्य मानले जाते. लहान मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरी करणारी आई ही अजूनही सकारात्मक दृष्टीकोनातून पहिली जात नाही. एका वर्तमानपत्रात याविषयी काही उदाहरणे दिली होती. त्यात अशाच एका वर्किंग मदर ला प्रश्न विचारण्यात आला की नोकरीच करायची आहे तर मग मुलांना जन्म का दिला?
३. इथे असलेली किंडर गार्टनची वेळ बरेचदा अगदी २-४ तास एवढीच असते. त्यामुळे मग मुलांना उरलेल्या वेळात मुलांना कुठे ठेवायचे हा प्रश्न उद्भवतो आणि त्यातून पार्ट टाईम नोकरी किंवा मग नोकरी नकोच असे पर्याय निवडले जातात. शिवाय पाळणाघरांची संख्या कमी आहे. त्यामुळे तिथे नाव नोंदणीपासून प्रश्न निर्माण होतात. त्यांच्या वयाच्या मर्यादा, इतर अटी हे सगळे काहींना त्रासदायक वाटते.
४. अजूनही बऱ्याच पुरुषांना कमावती बायको नको आहे. विशेषतः मुले असतील तर नाहीच. आणि सोबत काम करतानाही सहकर्मचारी म्हणून सुद्धा पुरुषांना स्त्रिया नको आहेत. वरिष्ठ म्हणून तर नाहीच नाही.
५. येथील प्राप्तीकर नियमानुसार नवरा बायको किंवा पार्टनर हे दोघे जर कमावते असतील आणि दोघांच्या पगारात फार मोठी तफावत असेल तर कर आकारणी, आयुर्विमा आणि भविष्य निर्वाह निधी हे सगळे पैसे वजा होऊन हातात मिळणारा पगार खूप कमी होतो. अशा वेळी जर बायको नोकरी करत नसेल तर पुन्हा वेगळे नियम लागू होतात आणि नवऱ्याच्या कर आकारणीत सवलतही मिळू शकते. अशांसाठी मग त्यापेक्षा नोकरी नको हा विचार प्रबळ ठरतो.
६. बऱ्याच मुली या अगदी लहान वयात आई होतात. मग व्यवस्थित असे शिक्षण होत नाही आणि पर्यायाने याचा परिणाम नोकरी शोधण्यापासून तर बढतीपर्यंत सगळ्यावर होतो.
७. इतर अनेक देशांप्रमाणेच घरकाम करण्यासाठी नोकर चाकर नसल्यामुळे घरकामासाठी बराच वेळ द्यावा लागतो. पारंपारिक मानसिकतेतून स्वयंपाक, कपडे धुणे, स्वच्छता अशा कामांसाठी हातभार लावणारे पुरुष फार कमी आहेत. म्हणजे नोकरी आणि घर या दोन्हींचा समतोल सांभाळणे स्त्रियांसाठी अवघड आहे.
वरील कारणांचा परत मागोवा घेतला तर यातील बरीच ही बायकांनी घरापुरते मर्यादित राहावे या मानसिकतेतून येत आहेत. यात स्त्री-पुरुष सगळेच आले. ही एक बाजू झाली. दुसरी एक बाजू अशी सुद्धा आहे की अभियांत्रिकी किंवा संशोधन, वैद्यकशास्त्र किंवा पोलीस, सरकारी कार्यालये इथे काम करणाऱ्या महिला बर्याच आहेत. हळूहळू यात वाढ होताना दिसते आहे. क्रीडा क्षेत्रात यशस्वी झालेल्या अनेक बायका आहेत. पण त्याचबरोबर यांच्यापैकी अनेकींना वेळ काळाचे बंधन व्यवसायात पाळता येत नाही. मग अशांसाठी लग्न हा अजूनही अडथळा समजला जातो. म्हणजेच लग्नाच्या आधी काय करायचे ते करा, एकदा लग्न झाले की मग घर सांभाळणे ही जबाबदारी वरचढ ठरते. पण यातून ज्यांना बाहेर पडायचे आहे त्यांच्यासाठी मग दुसरी टोकाची भूमिका तयार होते ती म्हणजे लग्न न करणे, केले तरी मुलांना जन्म न देणे अशी. या सगळ्यातून जन्मदर अत्यंत कमी झाला आहे आणि पर्यायाने मनुष्यबळ कमी झाले आहे, इतर काही समस्या उद्भवत आहेत. बऱ्याच सिंगल मदर्स साठी नोकरी ही आर्थिक दृष्ट्या आवश्यक आहे पण या अशा अडचणींचा सामना करताना त्यांना इतरांपेक्षाही जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. अधिकाधिक दरवाजे कागदोपत्री स्त्रियांसाठी खुले केलेले असले तरीही प्रत्यक्षात हे तेवढे साधे सरळ नाही. या सगळ्यात नोकरी करावी किंवा करू नये हा मुद्दा नाही. फक्त केवळ भारतातच असे नाही, तर जगात बऱ्याच ठिकाणी स्त्रीयांना स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी कमी अधिक प्रमाणात संघर्ष करावाच लागतो हे या सगळ्यातून दिसते.
नोकरी व्यतिरीक्त इतरत्र स्त्रियांची स्थिती काय? किंवा त्यांचे राहणीमान कसे आहे, रोजची कामे काय असतात, मुलगी, बायको, आई अशा नात्यातील स्त्री कशी आहे? यातील काही निरीक्षणे ही इतरत्रही अशीच असू शकतील.
जसा स्त्रियांची नोकरी किंवा कमावती असणे या बाबतीत जर्मनी हा इतर युरोपीय देशांमध्ये जरा कर्मठ प्रकारात मोडतो, तसा इतर बाबतीत दिसला नाही. अगदी जन्मापासून बघितले तर मुलगी जन्माला येणे हा आनंदाचा क्षण आहे. मुलगा मुलगी असा फरक, वंशाचा दिवा असे काही प्रकार नाहीयेत. मुलींना वाढवताना सतत तू मुलगी आहेस हे असे करू नये, तसे करू नये अशा काही मर्यादा घातल्या जात नाहीत. अर्थात यासाठी आजूबाजूचे वातावरण देखील त्यादृष्टीने योग्य आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. शिक्षणा इतकाच खेळ हा देखील इतर मुलांप्रमाणेच मुलींच्या शालेय जीवनापासूनच महत्वाचा भाग आहे. लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत मोकळेपणाचे वातावरण असल्याने, मुलींचे वयात येतानाचे प्रश्न, हार्मोनल बदल याविषयी मुले आणि मुली यांच्यातील जागरुकता शिकण्यासारखी आहे.
शरीरयष्टीच्या दृष्टीने जर्मन बायका म्हटले की सर्वसाधारण धिप्पाड, उंचपुऱ्या बायका डोळ्यांसमोर येतात. आणि बऱ्याचशा असतातही तशा. अगदी ६ फुट उंच वगैरे. स्टेफी ग्राफ हे अगदी योग्य उदाहरण. (कोण कोण उसासे टाकतंय) अति लठ्ठपणाच्या बळी सुद्धा अनेक आहेत. याउलट काही इतक्या बारीक की या काही खातात की नाही असा प्रश्न पडावा अशा. स्वतःच्या तब्येतीच्या बाबतीत जागरूक आहेत हे एक कारण आहे परंतु त्याचबरोबर धुम्रपान हे एक महत्वाचे कारण आहे. दिवसभर फक्त कॉफी आणि सिगारेट यावर जगणारे जसे पुरुष आहेत तशाच स्त्रिया देखील. याबाबतीत समानता आहे अगदी. कदाचित महिला आघाडीवर आहेत असेही म्हणणे पूर्ण गैर ठरणार नाही.
अगदी लहान वयात लग्न करणाऱ्या, मुलांना जन्म देणाऱ्या देखील बऱ्याच मुली आहेत. म्हणजे २०-२१ व्या वर्षी सुद्धा बऱ्याच मुलींची लग्नं झालेली असू शकतात. यात काही वेळा अजून शिक्षण देखील पूर्ण झालेले नाही, आणि चुकून नवऱ्याने धोका दिला, तो सोडून गेला तर अशा वेळी एकटीने सगळी जबाबदारी घेणाऱ्या देखील अनेक दिसतात. तरुण मुलींना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणाऱ्या देखील अनेक जणी आहेत. या स्वैराचाराच्या बळी देखील आहेत. छोट्या छोट्या कारणांमुळे होणारे ब्रेक-अप्स किंवा कुठल्याही लहान सहान अडचणीतून येणारे औदासिन्य, त्यातून होणारा औषधांचा मारा, हरवलेला आत्मविश्वास अशी कारणेदेखील तरुण पिढीला शिक्षण पूर्ण करण्यापासून कधीकधी वंचित करताहेत.
कॉलेज वयीन मुली काय किंवा इतर बायका काय, यांचा मेकअप मात्र अचंबित करतो. सकाळी कुत्र्याला फिरायला नेताना किंवा ऑफिसला जाताना, अगदी घराशेजारच्या बेकरीत ब्रेड आणायला, प्रचंड रंगरंगोटी करून तरुण मुली, काकू, आज्या कुणीही दिसल्या की काय बोलावे कळतच नाही. आणि थोडा थोडका नव्हे, तर एकूण एक रंगसंगती कपड्यांशी जुळवणारा. नवऱ्याचा एका प्रवासात ट्रेनचा अपघात झाला आणि रात्री ८ ते पार २:३० पर्यंत सगळे जण ट्रेन मध्ये अडकले होते. तेव्हा रात्रीच्या एक वाजतासुद्धा बायका मेकअप करत होत्या. कपडे किंवा बाकी फॅशन याबाबतीत मात्र बऱ्याच गबाळ्या वाटल्या. कुठल्याही रंगाचा शर्ट, त्यावर भलत्याच रंगाची विजार, आणि अजून कुठल्यातरी वेगळ्याच रंगाचे केस. कुठेही दुकानात गेलो तर काळा, गडद निळा, करडा, पांढरा असे काही ठराविक रंग सोडून इतर रंगच दिसत नाहीत. आणि सगळ्या दुकानांमध्ये तेच तेच प्रकार. स्कार्फ किंवा स्टोल्स मध्ये जर विविधता दिसली पण इतर बाबतीत यथातथाच. हा फरक पॅरिस किंवा अशाच जवळच्या काही इतर देशातील शहरामध्ये फिरताना जास्त तीव्रतेने जाणवतो. आणि भारताशी तर तुलना होऊच शकत नाही. माझ्या भारतातून आणलेल्या कुठल्याही कपड्यांच्या बाबतीत 'रंग आणि डिझाईन मस्त आहे' असे काही जण आवर्जून सांगतातच. "आमच्या भारतात आहेच तेवढे वैविध्य, इकडे काय फक्त काळे, निळे कपडे" असं ऐकवताना मजा येते मग. भारताबाबत असे काही असले की लागली चान्स पे डान्स. :)
एक गृहिणी किंवा स्वतंत्र मुलगी म्हणून वावरताना प्रचंड आत्मविश्वास वाटतो या बायकांमध्ये. साफसफाई हे एक अत्यंत आवडते काम. अगदी वेड्या आहेत सगळ्या या बाबतीत. आणि ती कामे ठरल्या वेळी करणारच. लहानपणापसून तसेच शिकवले गेले आहे. शनि-रवि जेव्हा माझी सगळी कामं थंडावलेली असतात, विशेषतः हिवाळ्यात, अशा वेळी जेव्हा मी स्वयंपाक घरात असते, तेव्हा खिडकीतून दिसणारी समोरच्या इमारतीत राहणारी बाई हमखास सगळी साफसफाई करत असते. त्यातही ठरलेली कामे, बहुतांशी त्याच क्रमाने, सोफ्याचे कव्हर झटकणे, मग सगळे फर्निचर पुसणे, आणि मग सगळ्यात महत्वाचे, खिडक्या. आता या खिडक्या ती ज्या पद्धतीने स्वच्छ करते त्याप्रमाणे जर ही बाई भारतात राहिली तर किती वेळ घेईल याचा अंदाज घेणे कठीण आहे. चार वेगवेगळी फडकी वापरून, पार त्या खिडकीत बसून बाहेरून भिंती सुद्धा पुसते. मग लागली इस्त्री सुरु. स्वच्छतेच्या बाबतीत मी स्वतः प्रचंड आग्रही असले तरीही दिवसभर फक्त तेच करत बसणे हे अति वाटते. आजूबाजूच्या बऱ्याच घरांमध्ये हेच दृश्य दिसते. एका कार्यक्रमात तीन मिनिटात दहा वेळा एका बाईने 'खिडक्या पुसणे' चे पालुपद लावले तेव्हा मी हतबुद्ध झाले होते. विशेष म्हणजे बहुतांशी बायकाच दिसतात ही कामे करताना. गाडी साफ करण्यात मात्र पुरुष आघाडीवर. 'असे का' हे वेगळे सांगणे न लागे. ;)
आता अजून एक मुद्दा म्हणजे स्वयंपाक. काही अपवाद वगळता जर्मन खाद्यपदार्थ हे काही अगदी जगप्रसिद्ध वगैरे नाहीये. प्रसिद्ध आहे ते बेकिंग. ब्रेड, केक्सचे नानाविध प्रकार. आणि आपण जसे आजीच्या हातचे बेसनाचे लाडू, पुरणपोळ्या वगैरे अगदी खास आवडीने खातो, तसेच इकडे ओमा म्हणजेच आजीच्या हातचा केक खातात. अजूनही बऱ्याच प्रमाणात कुटुंब संस्था टिकून असल्याने, मुले सांभाळायला आजी आजोबांनी मदत करणे हे देखील सहज घडताना दिसते. या घरातल्या कामांव्यतिरीक्त मुलांना शाळेत सोडायला जाणे, घरी घेऊन येणे, त्यांचा अभ्यास घेणे ही सगळी कामे आईचीच समजली जातात. बाहेरून सामान आणणे हेही बरेचदा गृहिणींचे काम. गाडी असेल तर गाडीने अथवा सार्वजनिक वाहतूक सोयीची आहे त्यामुळे त्याने सुद्धा. मुले थोडी मोठी झाली की त्यांच्या शाळांच्या वेळात किंवा जमेल तसे स्वतःचा व्यायाम आणि काळजी, मैत्रिणींसोबत बाहेर जाणे अशा प्रकारे स्वतःसाठी वेगळा वेळ मात्र आवर्जून काढतात. पण २ वर्षांच्या आतल्या मुलांना डे केअर मध्ये ठेवायचे असेल तर बरीच बंधने आहेत. म्हणजे नोकरी करत असाल तर किंवा अगदी काही अडचण असेल तरच. घराशिवाय बाहेरचीही कामे मुली सहजतेने करतात. घर बांधणे, गाड्या दुरुस्ती, जड जड वस्तू उचलणे, बांधकामात मदत करणे वगैरे अनेक कामे करताना बऱ्याच बायका दिसतात. याबाबतीत फार कौतुक वाटते त्यांचे.
आई म्हणून दोन्ही टोके दिसली. काही वेळा वाटते की आईचा बाळाशी काही संवादच होत नाहीये. बरेचदा बाळे झोपलेली, जरी जागी असतील तरी आईचं काहीतरी वेगळंच चाललंय. मोबाइलशी खेळ, नवऱ्याशी चाळे किंवा केसांशी खेळ किंवा अजून काही. अजून एक म्हणजे लहान बाळांसमोर बिनधास्त जेव्हा सिगारेटी फुंकतात तेव्हा त्रासदायक वाटतं अगदी. अगदी प्रेमाने करणाऱ्या सुद्धा दिसतातच. आवडीने मुलांसाठी कपडे खरेदी, त्यांचे संगोपन हे सगळे करताना पण दिसतात.
आता आज्या किंवा वयस्कर बायका. कुठेही हॉटेल मध्ये जा, एक तरी अशा आज्यांचा ग्रुप असलाच पाहिजे. सगळ्या मिळून नुसती थट्टा मस्करी आणि गप्पा. यातही नवीन पिढी हा एक मुद्दा असतोच. सासू सुना हा सुद्धा आवडता टॉपिक. रस्त्यात सुद्धा अशा आज्या भेटल्या की काय खुसुरफ़ुसुर चालू असते माहीत नाही. असेच उन्हाळ्याच्या दिवसात एकदा आम्ही घराजवळच असलेल्या एका आइसक्रीमच्या दुकानात बसलो होतो. तिथली मालकीण आजी आणि एक ग्राहक आजी यांच्यातल्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. बराच वेळ झाला, आइसक्रीम संपले, आजोबा कंटाळले, चला चला असे दोन तीनदा म्हणाले, दोन्ही आज्या आपल्याच धुंदीत गप्पा मारत होत्या. आजोबांनी पैसे दिले, अजूनही काही थांबेना. शेवटी आजोबांनी उठून गाडी काढली तेव्हा मालकीण आजी आता आपल्या मैत्रिणीला ठीक आहे आपण बोलू नंतर, तो थांबलाय असे म्हणाली. यावर आजी अजून पुढे जाउन, जाऊ दे गं, थांबेल तो जरा वेळ असे म्हणाल्या. आता आजोबांनी हॉर्न दिला आणि मग 'चल येते गं' करत आजी गाडीत स्थानापन्न झाल्या. आजोबांच्या चेहऱ्यावरचे भाव नवऱ्याने अगदी आपुलकीने टिपले होते. आता पुढे त्याने काही बोलायच्या आतच, 'बायका सर्व जगात कुठेही गेल्या तरी सारख्याच' असे मीच आधी म्हणाले म्हणजे पुढचे काही (वि)संवाद मला टाळता आले. पण बायकांचे काही स्वभावधर्म हे युनिव्हर्सल आहेत हे मला कळून चुकले. :D
मध्यंतरी टीव्ही वर "बी लाइक अ जर्मन" असा कार्यक्रम होता. त्यात एक ब्रिटीश कुटुंब इकडे काही दिवस सांस्कृतिक देवाणघेवाण म्हणून राहणार होते. यात इंग्लंड मध्ये ही स्त्री नोकरी करत होती आणि इकडे तिला गृहिणी म्हणून राहायचे होते. तर तिला घरातली कामे शिकवायला गृहिणींच्या एका संस्थेमार्फत एका बाईची नेमणूक केली होती. जर्मन बायका घरी नेमके काय आणि कसे काम करतात, ते कमीत कमी वेळात, कार्यक्षमता वाढवून कसे करावे हे शिकविण्यात आले. (ही संस्था खास करून महिलांसाठी कार्यक्रम राबवते. यात मग पैशांची बचत, नेटका संसार, मुलांची काळजी इत्यादी शिकवले जाते.) थोडी अतिशयोक्ती होतीच कारण टीव्ही वरचा कार्यक्रम होता. पण ब्रिटीश बाई शेवटी कंटाळली होती. एखादी स्त्री नोकरी करते म्हणजे ती आई म्हणून वाईट ठरते हा इथल्या लोकांचा दृष्टीकोन मला वेगळा आणि आश्चर्यकारक वाटला असे ती म्हणाली. बरेच काही शिकायला मिळाले पण ही स्वच्छता आणि ही कामे जरा अति आहे असे तिचे मत होते.
इथेही राज्यांप्रमाणे सुद्धा बायकांची काही वैशिष्ट्ये आहेत. दक्षिणेकडे असणाऱ्या स्टूटगार्ट (Stuttgart) या शहराजवळचा जो भाग आहे तेथील बायका म्हणजे श्वाबियन बायका. या अत्यंत काटकसरी आणि निगुतीने संसार करणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. बायकांनी असा संसार करायला हवा म्हणून यांची उदाहरणे दिली जातात. इतर काही राज्यांमधील लोकांच्या मते याला कंजुषी पण म्हटले जाते. चालायचेच. महाराष्ट्रातही आहेत अशी काही शहरे. :P आता ही कंजुषी की काटकसर यावर काथ्याकुट नको. ;) वयस्कर बायकांमध्ये पाहिले तर महायुद्ध आणि त्यानंतरची परिस्थिती अनुभवल्याने ही परिस्थिती जर्मनीत इतरत्र देखील दिसते. हा राज्या राज्यातील बदल सगळ्याच बाबतीत आहे. काही राज्यांमध्ये आजही बहुतांशी लोक पारंपारिक विचारधारेचे आहेत तर काही ठिकाणी झपाट्याने बदल होत आहेत.
एकूण पूर्वीच्या काळापासून तर आजपर्यंत अनेक बदल होत आहेत. महायुद्धाच्या काळात जिथे संपूर्ण देशानेच बिकट परिस्थितीत दिवस काढले, तिथे अशा घटनांचे परिणाम स्त्रियांच्या जडण घडणीवर, विचारसरणीवर होणे हे स्वाभाविक होते. अगदी अलीकडच्या काळात पाहिले तर २००७-०८ दरम्यान आलेली जागतिक मंदी, त्यानंतर युरो कोसळणे या बाबींचाही येथील तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला दिसतो. तरीही इतर युरोपीय देशांच्या तुलनेत जर्मनीला कमी फटका बसल्याने थोडे स्थैर्य होते. मात्र काहीही अडचण आली तर उत्पन्नाचे दुसरे साधन देखील असावे अशा कदाचित आर्थिक सुरक्षिततेच्या कारणासाठी म्हणून असेल, पण बदल हवेत हे स्वीकारणे हीदेखील चांगली बाब आहे. राजकारणात अनेक महिला कार्यरत आहेत आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे ही एक अत्यंत सकारात्मक बाब आहे. चाकोरीबाहेरचे शिक्षण घेण्याची, नवीन काहीतरी शिकण्याची महत्वाकांक्षा अधिकाधिक मुलींमध्ये दिसते आहे. केवळ सौंदर्य, संसार, शॉपिंग, पार्टीज आणि स्वयंपाक यापलीकडे देखील स्त्रियांची ओळख आहे हे दाखवून देणारी उदाहरणे दिसू लागली आहेत. परंतु शिक्षण, नोकरी, एक व्यक्ती म्हणून मिळणारा आदर, स्वतंत्र विचारसरणी, विकसित देशात मिळणाऱ्या इतर सोयी सुविधा अशा अनेक बाबी असूनही पारंपारिक कामांच्या बाबतीत स्त्रीने बाहेर पडण्यासाठी अगदी तरुण पिढीही पूर्णपणे तयार झालेली नाही. एकूण समाजाचा कल हा स्त्रिया आणि पुरुष यांच्या कामाच्या वेगवेगळ्या विभागण्या असाव्यात असा आहे. अर्थात त्यांचे मत याच्या विरुद्ध म्हणजेच स्त्रियांनी कमवावे आणि पुरुषांनी घर सांभाळावे असा नसून दोघांनीही कामाच्या समान जबाबदार्या घ्याव्यात असा आहे. परंतु ही मानसिकता बदलण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हळूहळू अधिकधिक स्त्री पुरुषांना हे वाटत असले तरीही अनेक स्त्री-पुरुष हे पारंपारिक विचारसरणीचा पुरस्कार करणारे आहेत. एका सर्वेक्षणानुसार 'जेव्हा मुले लहान असतात तेव्हा बऱ्याच स्त्रिया हे आनंदाने स्वीकारतात परंतु जसजशी मुले मोठी होत जातात आणि आपल्या जगात रुळू लागतात, त्यावेळी काहींना आपण इतर पुरुष आणि मुले नसलेल्या स्त्रिया यांच्यापेक्षा कमी पडत आहोत ही भावना डोके वर काढू लागते. अशा स्त्रियांकडून मग पुढील पिढीत बदल व्हावेत म्हणून अधिक प्रयत्न केले जातात. समान शिक्षण असूनही स्त्रीयांना मिळणारे कमी वेतन, बढतीसाठी दिले जाणारे प्राधान्य, पारंपारिक विचारसरणी, अधिकधिक पाळणाघरांची सोय, या आणि अशा काही बाबतीत बदल व्हावेत म्हणून सध्याच्या सरकारतर्फे अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. गरोदर बायका, प्रसूती नंतर मिळणारी रजा, करातील सवलती, सिंगल मदर्स साठी विशेष सवलती यासाठी अधिकाधिक मदत व्हावी म्हणून काही संस्था कार्यरत आहेत. जर्मनीतील काही महत्वाच्या खाजगी कंपनीत कार्यकारी मंडळात ३० टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव असाव्यात या सरकारच्या निर्णयाला २०१४ च्या शेवटी हिरवा झेंडा मिळाला आहे. २०१६ पासून याची अंमलबजावणी सुरु होईल अशी चर्चा आहे.
तर अशा या जर्मन बायका आणि त्यांचे समाजजीवन. युरोपियन आर्थिक अक्षाचा प्रमुख स्तंभ असलेला हा देश अँजेला मेर्केल सारख्या कर्तुत्ववान स्त्रीच्या नेतृत्वाखाली प्रगती करत आहे आणि अशाच अनेक स्त्रिया या देशाचे भविष्य घडवण्यात पुरुषांच्या बरोबरीने पुढे येतील अशी आशा आहे.
तळटीप - हा लेख लिहिताना माझे येथील वास्तव्यातील अनुभव, आंतरजालावरील माहिती, टीव्हीवर दाखवले जाणारे काही कार्यक्रम याद्वारे मिळालेली माहिती संकलित केली आहे.