व्हर्जिनिया वुल्फचे ‘अ रूम ऑफ वन्स ओन’

व्हर्जिनिया वुल्फची ओळख विसाव्या शतकातली प्रसिद्ध कादंबरीलेखक आणि समीक्षक म्हणून आहे.

स्त्रीवादी समीक्षेचा पाया रचणार्यांमधलं हे एक महत्त्वपूर्ण नाव. सर्वसाधारणतः समीक्षा म्हटलं की, किचकट विषय, बोजड भाषा असा समज असतो आणि त्यामुळे त्या वाटेला जाणं टाळलं जातं. वुल्फचं ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ हे समीक्षेच्या प्रांतातलं गाजलेलं पुस्तक. साध्या परंतु उपहासात्मक शैलीत लिहिलेलं. वुल्फने याद्वारे स्त्रियांना लेखन करण्यासाठी लागणारा वेळ, जागा आणि पैसा या तीन आवश्यक घटकांकडे लक्ष वेधलं आहे.

त्याशिवाय स्त्रियांच्या लेखनाबद्दल मूलभूत असे विचार मांडले आहेत. हे विचार 1929 मधले. सिमॉन दि बुव्हाआचं स्त्रीवादावरचं बायबल मानलं जाणारं ‘सेकंड सेक्स’ हा ग्रंथ येण्याआधीचं हे पुस्तक. ब्रिटनमध्ये स्त्रियांच्या हक्कांच्या चळवळीला नुकतीच कुठे सुरुवात होत होती, त्यावेळची ही मांडणी. त्यामुळे त्या काळातल्या परिस्थितीला धरून यातले मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. आज काळ बराच बदलला आहे, बऱ्याच देशांमधली परिस्थिती बदलली आहे, हे मान्य असलं, तरी यातले काही मुद्दे आजही समाजातल्या अनेक घटकांच्या दृष्टीने लक्षात घेण्यासारखे आहेत. प्रत्येक समाजाची जडणघडण थोड्याफार प्रमाणात वेगवेगळी असली, तरी त्यांच्यात वरिष्ठ, कनिष्ठ अशा भेदभावाचा समान धागा सापडतो. वुल्फचं हे लेखन जरी स्त्रियांसंबंधी असलं, तरी गौण मानल्या गेलेल्या प्रत्येक घटकाला ते लागू पडतं. ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ हे पुस्तक म्हणजे मुळात दोन व्याख्यांचं संकलन आहे. व्हर्जिनिया वुल्फ हिने दोन महिला महाविद्यालयांमध्ये दिलेली ही व्याख्यानं. या व्याख्यानांसाठी तिला विषय देण्यात आला होता, ‘स्त्रिया आणि कादंबऱ्या’. त्या काळात ब्रिटनमध्ये स्त्रिया कादंबऱ्याच तेवढ्या लिहू शकतात, असा कुत्सित सूर निघत असे. तिने या भाषणांमधून या विषयावर प्रथमच सखोल चर्चा केली. तिच्या मांडणीचा गाभा होता - स्त्रियांना लेखन करण्यासाठी स्वतःची जागा असणं आवश्यक आहे. त्यासाठी त्या स्वतःच्या पायावर आधी उभ्या राहिल्या हव्यात, हे तिने यात ठासून सांगितलं.

मुळात साहित्यिक असल्यामुळे वुल्फने या समीक्षात्मक चर्चेतही एका काल्पनिक स्त्रीपात्राची निवड केली. या पात्राद्वारे आपले विचार थेटपणे वाचकांपर्यंत पोचवण्यात ती यशस्वी झाली. यातली निवेदक ‘ऑक्सब्रिज’ विद्यापीठात गेली; शिकण्यासाठी नव्हे, तर हे विद्यापीठ बघण्यासाठी. तिला या विद्यापीठात शिक्षण घेण्यास परवानगीच नव्हती. हे ऑक्सब्रिज म्हणजे ऑक्सफर्ड आणि केंब्रिज या नावांची संधी! पायाखाली मऊ, लुसलुशीत गवताची गादी. ती विचार करत आपल्याच तंद्रीत निघाली. तेवढ्यात एक सुरक्षारक्षक धावत आला; तिला गवतावरून चालायला परवानगी नाही, याची त्याने तिला समज दिली. त्याच्यामुळे तिच्या विचारांची साखळी तुटली. सुरुवातीलाच रंगवलेल्या या प्रसंगातून वुल्फ स्त्रियांना विचार करण्यासाठी लागणाऱ्या अवकाशाचा अभाव, पुरुषसत्ताक व्यवस्थेने तिच्या विचारप्रक्रियेत आणलेले अडथळे, या बाबी अलगदपणे लक्षात आणून नंतर ही निवेदक याच विद्यापीठातल्या एका भव्य दालनाबाहेर उभी राहिली. आत विद्यापीठातल्या विद्वान विद्यार्थ्यांची मेजवानी सुरू होती. त्यांच्यातली चर्चा ती भिंतीला कान देऊन ऐकू लागली. ही विद्वान मंडळी उंची मद्य, कस्टर्ड यांचा आस्वाद घेतघेत बौद्धिक चर्चा करण्यात गुंतलेली होती. त्यांना जीवन सुंदर भासत होतं, कारण त्यांना लाभलेलं जीवन हे सुंदर अनुभवांनी समृद्ध झालेलं होतं. तृप्तीचा ढेकर देऊन त्यांनी केलेला विचार त्यांच्या साहित्यातही तश्याच रसरशीतपणे उमटणं, साहजिक होतं. वुल्फने मांडलेला मुद्दा म्हणजे, स्त्री आणि पुरुष यांना येणाऱ्या अनुभवांमधला फरक. त्यामुळे त्यांचा जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातही फरक पडतो. त्यानंतर ही निवेदक ऑक्सब्रिज विद्यापीठातून निघून तडक आपल्या मैत्रिणीच्या महाविद्यालयात गेली. इथलं जेवण म्हणजे भरपूर पाणी ओतलेलं सूप आणि कडक ब्रेड. मुळात या महिला महाविद्यालयाची स्थापनाच भरपूर वेळ दवडून, समिती नेमून, पैसे उभारण्यासाठी खटपटी करून झालेली असते. शरीर, मन आणि मेंदू यांच्या समन्वयातून उभं राहणारं मानवी अस्तित्व यांना व्यवस्थित खतपाणी मिळालं नाही, तर नवे विचार तरी कसे निर्माण होणार? असा प्रश्न ती इथे उपस्थित करते. ती आणि तिची मैत्रीण विचार करू लागल्या - राजेराण्या, सरदार, उमराव यांनी सढळ हस्ते देणग्या देऊन ते ऑक्सब्रिज विद्यापीठ उभारलं, त्यावेळी आपली आई काय बरं करत होती? तिच्या मैत्रिणीच्या आईला संसाराच्या धबडग्यातून बाहेर पडणं अशक्यच होतं. त्यामुळे एकांतात बसून ज्ञान मिळवणं तिला शक्यच नव्हतं. आज या आर्थिक स्वावलंबनाच्या मुद्यात विशेष वाटत नसलं, तरी त्या काळाचा संदर्भ लक्षात घेता संधीच्या असमानतेवरची वुल्फची टीका स्त्रियांच्या हक्कांच्या चळवळीला चालना देणारी ठरली. नंतर ही निवेदक स्त्रियांसंबंधी पुरुषांनी कायकाय लिहून ठेवलं आहे याचा शोध घेण्यासाठी निघाली. ग्रंथालयात जाऊन स्त्रियांसंबंधी लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचा विभाग धुंडाळू लागली. इथली कपाटं पुस्तकांनी खच्चून भरलेली होती. ती ढीग उपसत म्हणाली, "अरेच्च्या! या पृथ्वीतलावर बहुचर्चित प्राणी कोण असेल, तर त्या स्त्रियाच!" तिने या पुस्तकांमधून काढलेल्या नोंदी अशा ‘स्त्रियांच्या मेंदूचा आकार लहान’, ‘स्त्रियांजवळ नैतिकतेचा अभाव’, ‘स्त्रियांचे मानसिक, शारीरिक आणि नैतिक ̧दुयमत्व’, इत्यादी खूप शोधूनही या पुस्तकांमधून तिला स्त्रीचं खरं रूप गवसलं नाही. मग तिने साहित्यात रंगवलेल्या स्त्रियांचा शोध घेण्याचं ठरवलं. ग्रीक, ब्रिटिश, फ्रेंच आणि रशियन भाषेतल्या उत्तम साहित्याचा तिने आढावा घेतला. या भाषेतल्या महान लेखकांनी रंगवलेल्या स्त्री पात्रांचा विचार करताना विरोधाभास तिच्या लक्षात आला. अनेक साहित्यकृतींमध्ये स्त्रियांना मानाचं स्थान लाभलंय, पण प्रत्यक्षातलं तिचं जीवन तसं होतं का? साहित्यात तिचं उदात्तीकरण चालत होतं आणि इतिहासात तिचा साधा उल्लेखही नाही! साहित्यात विचारप्रवर्तक उद्गार तिच्या तोंडी, वास्तवात तिला बोलायला, लिहायला बंदी! वुल्फचं हे निरीक्षण सर्व देशांमधल्या साहित्याला कमीअधिक फरकाने लागू पडतं.

पुरुषसत्ताक व्यवस्थेत सर्वसामान्य स्त्रियांना संधी नाकारल्या गेल्या, पण तीच व्यवस्था मुलामा चढवलेलं तिचं दिखाऊ रूप मात्र सतत दाखवत राहिली, हे वास्तव. शतकानुशतकं स्त्रियांना स्वतःला प्रकट करण्याची संधी मिळाली नाही, हे सर्वच समाजांमधलं वास्तव. ते दाखवण्यासाठी वुल्फने जुडीथ शेक्सपिअर या काल्पनिक पात्राची निवड केली. ही विल्यम शेक्सपिअरची बहीण. भावाप्रमाणेच उत्तुंग प्रतिभा असलेली ही मुलगी. पण तिला शिक्षण घेता आलं नाही, त्यामुळे लॅटिन भाषेतलं उत्तम साहित्य तिने वाचलं नाही. तरीही तिने संधीच्या शोधात लंडन गाठलं. पुरुषसत्ताक व्यवस्थेत धाडसी पाऊल टाकलं. पण त्यामुळे तिच्यावर संकटं कोसळली, तिच्यावर बलात्कार झाला. शेवटी स्वतःवर झालेल्या अन्यायाने व्यथित होऊन तिने अकाली आयुष्य संपवलं. हाच मुद्दा लक्षात घेऊन मराठी साहित्याच्या बाबतीत बोलायचं तर, विसाव्या शतकाच्या आधीपासून अनेक स्त्रिया स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतु ते फारसं उजेडात आलं नाही. एक उदाहरण, बहिणाबाई चौधरींच्या कविता त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी यांनी कागदावर उतरवल्या, जपून ठेवल्या. त्या प्र. के. अत्रे यांच्या हातात पडल्यामुळे हे साहित्य उजेडात आलं. पण अशा कित्येक बहिणाबाईंचं साहित्य काळाच्या ओघात लुप्त झालं. स्त्रिया लोकगीतं, ओव्या, अभंग यांच्याद्वारे स्वतःला व्यक्त करत होत्या, पण त्यांच्या साहित्याला फार महत्त्व लाभलं नाही. अलीकडे सुसी थारू आणि के. ललिता यांनी ‘विमेन राईटिंग इन इंडिया’चे दोन खंड संपादित केले. त्याद्वारे इ. स. पूर्व 600 पासूनचं विविध भारतीय भाषांमधलं थोडंफार स्त्रीसाहित्य उजेडात ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ मधला दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे स्त्रियांनी लिहिलेल्या साहित्याची समीक्षा. वुल्फचे याबाबतीतले विचार अतिशय समतोल आहेत. भविष्यात स्त्रियांच्या लेखनात एक मोठा दोष येण्याची शक्यता आहे, हे तिने जाणलं होतं. त्यासाठी तिने आधीच त्यांना सावध करण्याचं काम केलं. स्त्रियांनी लिहिलेलं ते सर्व उत्तमच, असं मानू नये , असा तिचा आग्रह आहे. स्त्रियांच्या लेखनात पुरुषद्वेष्टेपणा आणि तक्रारीचा सूर वारंवार येऊ लागला, तर ते लेखन उंची गाठू शकणार नाही, हा तिचा परखड विचार. स्त्रियांनी पुरुषांसारखीच श्रेष्ठत्व जपण्याची धडपड केली, सूडाची भावना ठेवत लेखन केलं, तर त्यातून उत्तम साहित्याची निर्मिती होणार नाही, हा तिने दिलेला इशारा. स्त्रियांनी स्त्री म्हणून लेखन न करता माणूस म्हणून लेखन करावं, हा विचार स्त्रियांच्या लेखनाला दिशा देणारा ठरला. अर्थात, विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच वुल्फने सावध करूनही हा दोष पुढे काही प्रमाणात स्त्रियांच्या लेखनात आला. अनेक भाषांमधल्या साहित्यात काही लेखिका पुरुष लेखकांनी तयार केलेल्या रॉमँटिक कल्पनांमध्ये अडकल्या, तर दुसरीकडे काहींनी टोकाची भूमिकाही गाठली. त्यांनी घेतलेल्या आक्रस्ताळ्या भूमिकेने लेखन एका चौकटीतच अडकलं. ज्या कुठल्याही चौकटीत न शिरता माणूस म्हणून लेखन करतील, त्यांचं साहित्य काळाच्या ओघात टिकून राहिलं.

याशिवाय स्त्रियांचं लेखन समजून घेताना वुल्फचा एक मुद्दा आवर्जून लक्षात घेण्यासारखा आहे. शतकानुशतकं स्त्रियांना संधी न मिळाल्यामुळे स्त्री आणि पुरुषांच्या लेखनात काही फरक दिसतील याची जाणीव ठेवायला हवी, असंही ती सांगते. दोघांच्या लेखनात काही प्रमाणात फरक दिसणं साहजिक आहे आणि त्या तफावतीला नाकारलं जाऊ नये, असं सांगून ती वाचकांना सजग करते. स्त्रियांच्या साहित्यातून त्यांचे म्हणून असणारे काही खास अनुभव उमटतील, त्यांचं जीवन, त्यांचे विचार प्रतिबिंबित होतील. परंतु त्यांकडे तुच्छतेने न बघता, ते व्यक्ती म्हणून समजून घ्यायला हवेत, हा स्त्रियांच्या मूल्यांवर पुरुषप्रधान मूल्यांचा प्रभाव असतो आणि त्याच चश्म्यातून त्या स्वतःकडे बघतात, हे तिचं परखड असं निरीक्षण आहे. दुर्दैवाने आठ दशकांनंतरही हा दुर्लक्षित राहिलेला मुद्दा. पुरुषांच्या दृष्टीने जे विषय महत्त्वाचे आहेत, तेच बहुतेकवेळा मान्य केले जातात. उदाहरणार्थ, क्रिकेट, फुटबॉल यांची चर्चा श्रेष्ठ ठरते, पण विणकाम, कपडे, स्वयंपाक यांची चर्चा क्षुल्लक मानलं जातं. हीच मूल्ये साहित्यात उमटतात. मग युद्धावरचे पुस्तक श्रेष्ठ आणि स्त्रियांच्या भावनांवरचे क्षुल्लक, असं मानलं जातं. स्त्रियांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांना दुय्यम समजणं, हे घडतं. स्त्री जीवनाशी निगडित वेगवेगळ्या पातळ्यांवरचे अनुभव, स्त्रियांचे वेगवेगळ्या क्षेत्रातले बरेवाईट अनुभव हे फक्त स्त्रियांचे राहत नाहीत, तर ते संपूर्ण समाजाचे असतात, हा अलीकडे रुजू लागलेला विचार. त्या विचाराची मुळं वुल्फच्या या समतोल विचारांमध्ये दडलेली आहेत. वुल्फच्या या निबंधाने लेखन करण्यासाठी स्त्रीकडे स्वतःची जागा, वेळ आणि पैसा असणं आवश्यक आहे, याकडे लक्ष वेधलं. त्या काळी नुकत्याच रुजू लागलेल्या स्त्रीवादी चळवळीलाही त्यामुळे योगदान मिळालं. स्त्रियांचं लेखन कसं असावं आणि त्याकडे कसं बघितलं जावं, यासंदर्भातही तिने मार्गदर्शन केलं. त्यातूनच पुढे स्त्रीवादी समीक्षेचा पाया रचला गेला. व्हर्जिनिया वुल्फची ही कामगिरी बघून जेन माकूस ही समीक्षक उद्गारली, ‘ही तर व्हिक्टोरिअन स्कर्टमधली गनिमी योद्धाच आहे!