प्रतिक्षा
बाहेर जोरात वारा वाहू लागला तसे पूर्वाने गॅलरीतले कपडे काढून घरात आणले. उन्हाळी पाऊस आज येणार असे
चिन्ह दिसत होते. आभाळ काळेकुट्ट झाले. संध्याकाळ व्हायला आली होती. अभयला यायला अजून वेळ होता. अभयची आठवण झाली तसे तिला सकाळचे भांडण आठवले. अभयला शांत वातावरण आवडत असे, म्हणूनच त्याने मुंबईपासून जरा दूर उपनगरात हा फ्लॅट घेतला होता. त्याचे ऑफिस तिथून बरेच लांब होते. पण हि रोजची दगदग तो आनंदाने सहन करत असे. पूर्वाला मात्र त्याचे हे धकाधकीचे आयुष्य सहन होत नव्हते. तो घरी येईपर्यत काळजीने तिचा जीव अर्धा होत असे.
आज सकाळी पण त्याला जरा उशीर झाला तसे त्याने सगळे घर डोक्यावर घेतले.
“पूर्वाऽ घडयाळ कुठेय? वॉलेट? आहे, आहे. रूमाल…” एक ना दोन! पूर्वा त्याच्या मागे पळून पळून दमली.
“अभयऽ किती वेळा सांगीतले तुला! ऑफीसजवळ फ्लॅट बघ. एवढी दगदग करायची काही गरज आहे का?”
“मी पण तुला बरेच वेळा सांगीतले ना! मला इथेच आवडते.” बुटांच्या लेस बांधत तो उत्तरला.
“उशीर होतो म्हणून रोजची धावपळ!” ती वैतागाने म्हणाली.
“तुला त्रास होत असेल तर तू माझे काही करत जाऊ नकोस. माझे मी बघेन.” रागारागाने दार आपटून तो निघून गेला. दार बंद होतांना पूर्वाचा विदीर्ण चेहरा त्याला दिसला होता.
अभय निघून गेल्यावर पूर्वाला रडू आवरले नाही. लग्नाला सहाच महीने होत होते आणि त्यात हे त्यांचे दुसरे भांडण होते. इतर बाबतीत नेहमी समजून घेणारा अभय या घराबाबत इतका का हट्टी होता? तिला कळत नव्हते. बरे, त्याचा त्रास पण त्यालाच होत असे. यापुढे घराच्या बाबतीत त्याला काही बोलायचे नाही असे तिने ठरवून टाकले.
•
जोरांत वीज कडाडली आणि पूर्वा दचकली. बाहेर काळोख पडला होता. विचारांच्या नादात तिच्या ते लक्षात आले नव्हते. वारा जोरात वहात होताच त्याबरोबर आता पाण्याचे थेंब पण पडू लागले. भराभर तिने खिडक्या बंद केल्या. घरात अंधार पडला होता म्हणून लाईटचे बटन ऑन केले. किचनमधे जाऊन ती स्वयंपाकाची तयारी करू लागली. अभयला आवडणारे पालकपनीर तिने बनवायला घेतले. स्वयंपाक झाल्यावर ती हॉलमधे आली. घडयाळाकडे नजर टाकून तिने अंदाज घेतला. अभय येण्याची वेळ झाली होती. टि.व्ही. ऑन करून ती बाकीची कामे आवरू लागली. बाहेर वारा, वीज आणि पावसाने तांडव सुरू केले तसे झप्पकन लाईट गेले. अंदाजाने तिने इर्मजन्सी लाईट सुरू केला. घरात उजेड पसरल्याने तिला बरे वाटले. लहानपणापासून तिला अंधाराची भितीच वाटत असे. ‘अभय अजून कसा आला नाही’ तिने परत घडयाळ पाहीले. थोडावेळ उगीचच काहीतरी वाचायचा प्रयत्न केला. पण मन त्यात लागेना. मनात जुन्या आठवणी फेर धरू लागल्या.
सर्वात पहीले तिला आठवली, अभयची पहीली भेट!
त्या दिवशी कॉलेजमधून ती घरी आली तेव्हा दारांत कोणाची तरी बाईक उभी होती. ‘कोण आले असावे’ याचा विचार करत ती आत गेली. तिचा विसूदादा आला होता. विसूदादा तिचा मावसभाऊ. पण ती त्याची सर्वात लाडकी बहीण होती. कमरेवर दोन्ही हात ठेवून, येरझार्या घालत तो तिच्या आईला काहीतरी सांगत होता. हि त्याची नेहमीची स्टाईल! त्याला पाहून पूर्वाला अत्यानंद झाला.
“विसूदादाऽ” ती चित्कारली. धावत जाऊन तिने त्याचे हात धरून त्याला गोल गोल फिरवले.
“कधी आलास?”
“मघाशीच. तुझीच वाट पहात होतो, चिमणे!” तो हसत उत्तरला.
“हे काय रे! मी काही चिमणी नाही.”
“अरे हो! विसरलोच होतो मी. आता तू मोठी झालीस नाही का? बरं, तुझी ओळख करून देतो. हा अभय. माझा मित्र!” आत्ता कुठे पूर्वाचे लक्ष हॉलमधे बसलेल्या अभयकडे गेले. तो मिश्किलपणे तिच्याकडे पहात होता. तिला विलक्षण लाजल्यासारखे झाले. त्याला ‘हॅलो’ करून ती भुर्रकन आत पळून गेली. मागून विसूदादाच्या खोऽ खोऽ हसण्याचा आवाज येत होता. त्या पहील्या नजरेतच अभयने तिला जिंकले होते. तो कशासाठी आलाय? ते तिला माहीत नव्हते. पण त्याची आठवण आली की एक अनामिक हूरहूर तिच्या मनांत दाटून येत असे. सर्वामधे असून पण ती हरवल्यासारखी झाली होती.
एक दिवस आईने तिला अभयबद्दल विचारले. विसूदादाने त्याचे स्थळ पूर्वासाठी सुचवले होते. आपले स्वप्न इतक्या लवकर सत्यात उतरेल याची तिला कल्पना नव्हती. तिने होकार दिल्यावर पुढची बोलणी भराभर पार पडली. साखरपुडा झाल्यावर तो तिला भेटायला आला. पण लाजेमुळे पूर्वा काही बोलूच शकली नव्हती. नंतरच्या भेटीत अभयनेच तिला बोलते केले. आत्ता ही पूर्वाला ते आठवून हसू आले. तिच्याकडून ‘आय लव्ह यू’ वदवून घ्यायला त्याने किती आटापिटा केला होता. पण पूर्वा ते तीन शब्द एका ओळीत काही म्हणू शकली नव्हती. प्रेम न बोलता व्यक्त करावे हेच ती शिकली होती. त्यामुळे मनात असून ही ते बोलणे तिला अवघड जात होते.
•
कंटाळून तिने पुस्तक बाजूला ठेवले. उठून ती परत घडयाळाजवळ गेली. अभयला यायला बराच उशीर झाला होता. पावसांत तो कुठे अडकला की काय? अशी भिती तिला वाटली. तिने त्याचा मोबाईल नंबर डायल केला. पण तो स्वीच ऑफ होता. चार्जींग संपल्याने इमर्जन्सी लाईट पण बंद झाला. गुडूप काळोखात ती कशीबशी किचनमधे गेली. काडेपेटी सापडली पण मेणबत्ती काही सापडेना. चाचपडत ती शोधू लागली. नेहमीच्या वस्तू हाताला काही वेगळयाच भासत होत्या. अखेर एकदाची मेणबत्ती सापडली तेव्हा तिला हायसे वाटले. हॉल आणि बेडरूममधे एक एक मेणबत्ती लावून ती खिडकीजवळ गेली. बाहेर पहाण्याचा तिने प्रयत्न केला पण बाहेर पावसांच्या धारांशिवाय काहीच दिसत नव्हते. हॉलमधल्या सर्व वस्तूच्या मोठमोठया सावल्या भिंतीवर नाचत होत्या. पूर्वाला आता भिती वाटू लागली. शेजारच्या काकूंकडे जावे असा विचार करून ती उठली. इतक्या रात्री त्यांच्याकडे जाणे बरे दिसेल का? असा विचार तिच्या मनात आला. पण भितीने त्यावर मात केली. दार उघडून तिने शेजारच्या फ्लॅटकडे नजर टाकली. दाराला लॉक होते. ‘काकू कुठे गेल्या?’ मग तिला आठवले. सकाळीच त्या मुंबईत राहणार्या त्यांच्या मुलीकडे गेल्या होत्या. हताशपणे ती घरात परत आली. ‘अभय कुठे राहीला?’ नकळत तिला चीड आली. तिने परत त्याचा नंबर डायल केला. तो बंदच होता.
जोरांत वीज कडाडली तशी पूर्वा थरथरली. बेडरूममधे जाऊन ती बेडवर पाय पोटाशी घेवून बसली. मनांत नको नको ते भितीदायक विचार येत होते. मेणबत्तीची ज्योत फरफरत होती. पूर्वा तिच्याकडे पहात बसली. भिंतीवर एक सावली हालली तसे पूर्वाने वर पाहीले. भितीने तिचे तळहात घामेजले. तेथे एक पाल होती. तिला पालीची अतिशय भिती वाटत असे. कालपर्यत घरांत पाल नव्हती. मग ही कुठून आली? कदाचित पावसांमुळे एखादया खिडकीतून आत शिरली असावी. पण हा विचार करण्याची ही वेळ नव्हती. पूर्वा हळूहळू बेडच्या दुसर्या कोपर्यात सरकली. साईड टेबलवर अभयचा फोटो ठेवलेला होता. सोबतीसाठी तिने तो छातीशी घट्ट धरून ठेवला. ती पाल पण पुतळयासारखी एका जागी मुरून बसली होती. पूर्वा डोळे ताणून तिच्याकडे पहात राहीली. थोडया वेळाने तिचे डोळे दुखू लागले. माहेरी असतांना घरात बरीच माणसे होती. त्यामुळे अशा अंधार्या रात्री पण तिला कधी एकटेपणा जाणवला नव्हता. ‘हा अभय पण …!’ आता तिला रडू येवू लागले. फोटो टेबलवर ठेवून ती गुढघ्यात मान खुपसून बसली.
•
अभयने लॅच-कीने दार उघडले. हॉलमधे जळत असलेली मेणबत्ती अर्धी उरली होती. किचनमधे अंधारच होता. बेडरूमच्या अर्धवट उघडया दारांतून उजेड बाहेर येत होता. पण घरांत शांतता पसरली होती. पूर्वाला अंधाराची भिती वाटते हे त्याला माहीत होते म्हणून तर मित्र थांबवत असून ही तो भर पावसांत भिजत आला होता. पुढे होउन त्याने बेडरूमचे दार थोडे ढकलले.
“पूर्वाऽ”
त्याचा आवाज ऐकून बेडवर अंग चोरून बसलेली पूर्वा धडपडून उठली. अभय बेडरूमच्या दारांत उभा होता. तो नखशिखान्त भिजला होता. त्याच्या कपडयांतून पाणी ठिबकत होते. पूर्वा धावत जाऊन त्याला बिलगली. तिचे सर्वाग थरथरत होते. ती खूप घाबरली आहे हे त्याला जाणवले.
“घाबरलीस का गं! सॉरी, पावसामुळे मला उशीर झाला. मोबाईल पण बंद पडला त्यामुळे तुला फोन पण करता आला नाही.” तो तिला थोपटत म्हणाला.
“अभय…” पूर्वा भिंतीकडे हात करत पुटपुटली. अभयने तिच्या हाताच्या दिशेने पाहीले. भिंतीवरची पाल त्याला लगेच दिसली.
“थांब! काढून टाकतो.” तो तिला बाजूला करत म्हणाला.
“नको, नको. ” तिने त्याला अजूनच घट्ट पकडले.
“मी खूप भिजलोय, पूर्वा. तू पण ओली होशील.”
“असू दे.” पूर्वा त्याचा चेहरा कुरवाळत उत्तरली.
“मी ऑफीसजवळ फ्लॅट बघतो. परत तुला माझी वाट पाहावी लागणार नाही.”
“तुला इथे आवडते ना! मी परत नाही घाबरणार. अभय, आय लव्ह यू!”
“आय लव्ह यू, टू! पूर्वा ” अभयने तिच्या गालावर ओठ टेकले. त्याच्या केसांतले पाणी तिच्या चेहर्यावर ठिबकले तशी तिला वस्तुस्थितीची जाणीव झाली.
“तू कपडे बदल. मी चहा करते.”
त्याला टॉवेल आणि कोरडे कपडे देवून ती दाराकडे वळली. अभयने तिच्या दंडाला धरून तिला जवळ ओढले.
“थॅक्स!” तो म्हणाला.
“कशासाठी?”
“तुझ्या ‘आय लव्ह यू’ साठी!”
“चल्!” ती लाजून किचनकडे पळाली.
अभय कपडे बदलून फ्रेश झाला. किचनमधून आल्याच्या चहाचा सुगंध दरवळत होता. शीळ घालत तो किचनकडे गेला.
(समाप्त)