डिस्क्लेमर १ - खालील कैच्याकै क्यालिग्राफी उर्फ सुलेखन पाहून कोणाला आम्हांस शिव्या द्यायची इच्छा झाल्यास अवश्य द्या. ;-) आमच्याकडून हे पातक करवून घ्यायची कल्पनेची आयडिया ही मिपाचे माननीय सुपरशेफ गणपाशेट यांची आहे. तेव्हा खालील कित्त्यांकडे पाहून कोणाला जे काही वाटेल ते सर्व मिररवरून परावर्तित होऊन त्यांच्याकडे जाणार आहे. यात त्यांना आमचा पत्ता देणार्या माननीय पैसाताईंचापण वाटा आहे.
डिस्क्लेमर २ - आपल्याला द्येव्वनाग्री क्यालिग्राफी काही येत नाही. तेव्हा चुकल्यामाकल्या वळणांकडे दुर्लक्ष केले जावे. खाली दिलेली उदाहरणे ही इंडिकेटिव्ह आहेत. फॉन्ट-फॉन्टमध्ये फरक असू शकतो. माझ्याकडे देवनागरीसाठी वापरला जाणारा बोरू वगैरे नव्हते. नेहमीचा जो डावीकडे कातरलेला बोरू बाजारात मिळतो तो रोमन लिपीच्या कॅलिग्राफीसाठी योग्य असतो. त्याने देवनागरी सुलेखन करता येत नाही. देवनागरीसाठी उजवीकडे कातरलेला बोरू मिळतो, तो घ्यावा. तसेच शाई वापरावी. त्यासाठीही खास गडद शाई मिळते. मी खालील सुलेखन हे घरात बरेच दिवस पडून असलेल्या साध्या A-4 कागदांवर काळ्या जलरंगाने व चार नंबरच्या सपाट (फ्लॅट) ब्रशने केले. त्यामुळे त्या कागदांचा सदुपयोगपण झाला आणि जलरंगांच्या पेटीतील कधीही न वापरला जाणारा एक रंगही संपला! (FYI: जलरंगचित्रणात काळा आणि पांढरा रंग वापरला जात नाही. कागदाचा पांढरेपणा आणि वेगवेगळे रंग एकत्र करून बनवलेले गडद मिश्रण वापरले जाते.) बोरूने जास्त सुबक सुलेखन करता येईल.
आता वेळ नाही. आकृत्यांमध्ये जास्तीत जास्त पायर्या दाखवल्या आहेत. काही शंका असल्यास अजिबात विचारू नये. :-D
स्वर - अ अॅ आ ऑ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ऋ ॠ ऌ ॡ
यातील अ, इ, उ, ऋ आणि ऌ हे र्हस्व स्वर आहेत तर उरलेले दीर्घ स्वर आहेत.

ब्रशने दिलेल्या स्ट्रोकची जाडी सुमारे आठ ते दहा मिमी इतकी येत असल्याने मी त्याच्या सहापट मिडल झोनची उंची ठेवली. तसेच अडीच-अडीच पट जागा ही टॉप झोन आणि बॉटम झोनसाठी ठेवली. टॉप झोनमध्ये वेलांट्या, मात्रा वगैरे येतात. बॉटम झोनमध्ये 'द' सारख्या अक्षरांचे पाय तसेच उकार वगैरे येतात.
दुसरे असे, की तुम्ही जर साध्या पेनने किंवा बोरूने सुलेखन करणार असाल तर देवनागरी अक्षरांवरील आडवी दांडी ही सर्वात शेवटी दिली जाते. पूर्ण शब्द किंवा अक्षर काढून झाल्यावर. इथे साइनबोर्ड पेंटिंगची पद्धत वापरली आहे. त्यात आधी आडवी रेघ देतात. (ज्ञानामृत स्रोत - लहानपणी पेंटरांचं नीरस शासकीय पाट्या रंगवण्याचं काम तासन् तास न्याहाळणे. आता तो वर्गच दुर्मिळ झाला बिचारा. फ्लेक्सने वाट लावली या धंद्याची!)













अं आणि अः (अनुस्वार आणि विसर्ग) हे स्वर नसून व्यंजने मानली जातात.
व्यंजने -
कंठव्य - क, ख, ग, घ, ङ


ख च्या दोन पद्धती दाखवल्या आहेत. जी आवडेल ती वापरा. जुन्यासारखी 'रव' ही पद्धत आता वापरात नाही. महाराष्ट्र शासनाने अशा श, ल यांच्या वळणांसारख्या काही गोष्टी हिंदीतून आयात केल्या असे मध्ये कधीतरी वाचले होते. असोत.



तालव्य - च, छ, ज, झ, ञ





मूर्धव्य - ट, ठ, ड, ढ, ण





दंतव्य - त, थ, द, ध, न





ओष्ठव्य - प, फ, ब, भ, म





विशिष्ट व्यंजने - य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ



ल जुने मराठी वळण आणि दांडीवाले हिंदीतून घेतलेले वळण.


श चे पण तसेच. डावीकडचे जुने वळण.






यातील ज्ञ, क्ष, श्र, क्त वगैरे व्यंजने ही जोडाक्षरे असल्याने काही वेळा त्यांचा समावेश वर्णमालेत स्वतंत्र व्यंजन म्हणून केला जात नाही. पण मी बालवाडीत वगैरे जे शिकलेलो आठवतंय त्यानुसार इथे क्रम दिला आहे.
वेलांटीची पद्धत - र्हस्व आणि दीर्घ वेलांट्या. यात वेलांट्यांच्या कुठल्या बाजू टेकलेल्या आहेत व कुठपर्यंत त्या खेचायच्या याकडे लक्ष द्या.

उकार - र्हस्व आणि दीर्घ

रु आणि रू

काही जोडाक्षरे -
र इतर अक्षरांना जोडण्याच्या पद्धती



ह इतर अक्षरांना जोडण्याचा पद्धती

द्य - हे वळण मी दिले आहे तसे आधुनिक पद्धतीने काढावे. हीच पद्धत द्ध सारख्या इतर जोडाक्षरांनाही वापरावी. त्यामुळे 'मु्द्द्याचे' हा शब्द नीट लिहीता येईल. इथे मिपावर दिसतो तसा नका लिहू.

आणि हे अंक -

हुश्श...! बास झालं, आता तुमचं तुम्ही गिरवत बसा! आमची बेडरेस्ट संपली... ;-)
(गणपाशेठ, खुश?)
जाताजाता - शुद्धलेखनाशिवाय सुलेखन म्हणजे रंगलेल्या मैफिलीत गायिकेला लागला ठसका. तेव्हा आधी शुद्धलेखन शिकावे. :-)