विंडोजमधील क्रॅपवेअर आणि ब्लोटवेअर

बऱ्याचदा आपण क्रॅपवेअर आणि ब्लोटवेअर बद्दल ऐकतो, पण ते नक्की काय असतं असा प्रश्न पडतो. तर आज आपण विंडोजमधील क्रॅपवेअर आणि ब्लोटवेअर यांची माहिती घेउ.

क्रॅपवेअर म्हणजे तुमच्या पीसीमध्ये तुमच्या कळत अथवा नकळत इंस्टाल झालेले प्रोग्राम्स. उदा. ब्राउझरमधील टूलबार्स, पीसी चालू झाल्यावर आपोआप सुरु होणारे काही बिनकामी प्रोग्राम्स आणि सर्वात भयानक, ब्राउझरमधील सेटींग बदलणारे प्रोग्राम्स. या क्रॅपवेअरचा तुम्हाला कसलाही फायदा होत नसतो. उलट यांतील काही प्रोग्राम्स तुमची गोपनीय माहिती मिळवून इतरांना विकण्याचा धोका असतो.

ब्लोटवेअर म्हणजे असे सॉफ्टवेअर्स ज्यांचा उपयोग कदाचित तुम्हाला होऊ शकतो, परंतु ते तुमच्या इच्छेविरुद्ध इंस्टाल केलेले असतात. उदा. नवीन पीसी घेतल्यावर सोबत येणारे मोफत अँटी-व्हायरस, निरो सारखे ३० दिवस चाचणी अवस्थेतील सॉफ्टवेअर्स आणि पीसीमध्ये सुरुवातीपासूनच असलेले बिनकामी सॉफ्टवेअर्स. बहुतेक ब्लोटवेअर तुमच्या पीसीवर सुरुवातीपासूनच इंस्टाल केलेले असतात. हे ब्लोटवेअर मोबाईलवर सुद्धा सापडतात. मोबाईलवरील ब्लोटवेअरचे उत्तम उदाहरण म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एस ४. या फोनवरील ६ जीबी जागा (१६ जीबी पैकी) या ब्लोटवेअरमुळे वाया गेलेली आहे. तसेच मोबाईलवरील हे ब्लोटवेअर तुम्हाला काढून टाकणेही सहज शक्य होत नाही.

सर्वच क्रॅपवेअर किंवा ब्लोटवेअर सॉफ्टवेअर्स सुरुवातीपासूनच इंस्टाल केलेले नसतात. काही ब्लोटवेअर हे दुसऱ्या सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून इंस्टाल होतात. आता तुम्ही म्हणाल पीसीसोबत मोफत अँटी-व्हायरस येतोय, सॉफ्टवेअर्स येत आहेत, हे तर चांगलचं आहे की, पण तसे नाही. हे ब्लोटवेअर सॉफ्टवेअर्स, सुविधांच्या बाबतीत पिछाडीवर असतात. जास्तीत जास्त एक वर्षांपर्यत त्यांची वैधता असते, आणि बाजारातील इतर सॉफ्टवेअर्सच्या तुलनेने त्यांना रॅम आणि सीपीयूची जास्त शक्ती लागू शकते. त्यामुळे कोणताही सॉफ्टवेअर विचार करूनच इंस्टाल करावा.

दुसरा प्रश्न असा पडतो की, जर हे सुरुवातीपासूनच इंस्टाल केलेले ब्लोटवेअर सॉफ्टवेअर्स जास्त रॅम आणि सीपीयू शक्ती वापरून पीसीचा वेग कमी करतात, तर पीसी तयार करणाऱ्या कंपन्या हे ब्लोटवेअर कशाला इंस्टाल करतात?
याची दोन करणे आहेत. एक म्हणजे ब्लोटवेअर सॉफ्टवेअर्स त्यांच्या उत्पादनाचे वैशिष्ट्य असू शकते. असे वैशिष्ट्य सर्वांनाच उपयोगी पडत नाही. दुसरे कारण म्हणजे ब्लोटवेअर सॉफ्टवेअर्सवाली कंपनी पीसी तयार करणाऱ्या कंपनीला सॉफ्टवेअर इंस्टाल करण्यासाठी पैसे देते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे “नॉर्टन अँटी-व्हायरस”. नॉर्टन अँटी-व्हायरस तयार करणारी कंपनी ही गिगाबाईट, इंटेल सारख्या मदरबोर्ड बनवणाऱ्या कंपन्यांना नॉर्टन अँटी-व्हायरस सीडीवर टाकण्यासाठी पैसे देते. नॉर्टन अँटी-व्हायरसची काही दिवसानंतर वैधता संपते, आणि पीसी वापरणाऱ्याला तो विकत घ्यायची वेळ येते. नॉर्टन अँटी-व्हायरसची सवय पडल्याने काही वापरकर्ते आपसूकपणे जास्त किमतीने हा अँटी-व्हायरस खरेदी करतात. बाजारातील इतर स्वस्त आणि मस्त अँटी-व्हायरस प्रोग्रामकडे पहायची तसदीही घेत नाहीत.

आता क्रॅपवेअर आणि ब्लोटवेअर म्हणजे काय हे तुम्हाला कळाले. ते पीसीमधून कसे काढून टाकायचे याच्याविषयी पुढील भागात माहिती घेऊ.

मी लिहिलेले काही लेख तुम्ही माझ्या ब्लॉगवर वाचू शकता.