संवाद एका नटासोबतचा - मंदार पुरंदरे

(श्री मंदार पुरंदरे सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यासाठी श्री पुरंदरे यांना धन्यवाद!)

*****************

मूळ पोलिश कविता : Rozmowa z Aktorem ( रोझमोवा झ आक्तोरेम )
मूळ पोलिश कवि: Ildefons Gałczyński ( इल्देफोंस गौचीनस्की )

संवाद : एका नटासोबतचा !

नुकताच तो इथून गेला ,

अजूनही या खोलीत त्याचा वावर जाणवतो आहे
त्याची अर्धी सिगारेट मंद धूर सोडते आहे.

जाणवत आहेत त्याच्या हालचालींच्या सावल्या भिंतीवर
मेणबत्त्या हवेत काजळी सोडत आहेत
ऐकू येतो आहे घनगर्द बाख

जंगलात वाऱ्याची गाज घुमावी
तसा घुमतो आहे त्याचा आवाज
इथेच
त्याच्याशी झालेला संवाद घुमतो आहे मनात:

नाटकाबद्दल तो बोलत होता,
भूमिकेबद्दल तो बोलत होता,

तो म्हणाला:
व्हायोलिन कसं छान स्वरात लावतो न आपण ,
तसं प्रेक्षागृहाला ,
प्रेक्षकांना छान स्वरात लावायचं आहे मला ,
----
कधी कधी मला स्वप्न पडतं - म्हणाला :
तेलदिव्याच्या प्रकाशानं भरलेला रंगमंच
सगळीकडे दाटून राहिलेली ऊब

मंचावर नाटक घडतंय

मंचावारचे शब्द प्रेक्षकांकडे धाव घेताहेत,
त्यांच्या अगदी आत शिरू पाहताहेत
तेलदिव्यांच्या मशाली झाल्या आहेत

आणि अस्तित्वात आहेत फक्त : प्रेक्षक आणि नट
-----

- लिहिशील का अशी भूमिका माझ्यासाठी ?
- I hope so !
@-Mandar Purandare