मँगो मस्तानी

साहित्यः
दूध ५०० मिली.
कस्टर्ड पावडर ३ मोठे चमचे (टेबलस्पून) सपाट.
साखर २ मोठे चमचे शीग लावून
मँगो आईस्क्रीम २ गोळे (स्कूप्स)
मँगो एसेन्स अर्ध बूच
पिवळा रंग ३ थेंब
लाल रंग २ थेंब
कृती:
दूधातून २-४ मोठे चमचे दूध वेगळे काढून त्यात कस्टर्ड पावडर मिसळून/विरघळवून घ्या.
बाकीचे दूध तापत ठेवा. त्यात साखर मिसळून ढवळत राहा.
दूधाला उकळी आली की आंच मंद करून कस्टर्ड पावडर मिसळलेले दूध एकदम त्यात मिसळा.
दूध ढवळत राहा. कस्टर्ड शिजून दूध जरा घट्ट होईल. आंच बंद करा.
दूध थंड होऊ द्या. थंड झालं की फ्रीज मध्ये ठेवून अगदी थंड करा.
तासाभराने (जास्त ठेवल्यास उत्तम. मस्तं थंड झालं पाहिजे.) त्यात अर्ध बूच मँगो एसेन्स आणि दोन्ही रंग मिसळा. चवीनुसार रंग आणि एसेन्स कमीजास्त करा.
आता त्यातील ग्लासभर दूध वेगळे काढून त्यात १ गोळा (स्कूप) मँगो आईस्क्रिम मिसळा आणि ते मिक्सर मध्ये फिरवून घ्या. आईस्क्रीम एकजीव झालं पाहिजे. (दुसरी मस्तानी करताना कृतीची ही पायरी पुन्हा करा.)
आता आपल्या आवडत्या ग्लासात हे मिश्रण ओतून त्यावर आईस्क्रीमचा एक गोळा आणि चमचा ठेवून मस्तानी सजवा.
मस्त मँगो मस्तानी ओठी लागण्यास सज्ज आहे. बाजीराव बना.
ह्याच प्रमाणे पिस्ता मस्तानी, चॉकलेट मस्तानी, बटरस्कॉच मस्तानी, ड्रायफ्रूट मस्तानी (ड्रायफ्रूटचे तुकडे आणि व्हॅनिला आईस्क्रिम) स्ट्रॉबेरी मस्तानी इ.इ. 'मस्तान्या' आपल्या कल्पकतेने बनवा.
शुभेच्छा....!