लहान असताना मी एक स्वप्न पाहिलं होतं, सर्व बाजूनी पुस्तकांनी भरलेल्या घरात मी राहते आहे. अभ्यास नाही, तहान भूक नाही. फक्त पुस्तकं आणि मी. पहाटे पडलं होतं का काय माहिती नाही पण ते स्वप्न मी प्रत्यक्षात अवतीर्ण झालेलं पाहिलं, आमच्या बदलापूरच्या ग्रंथसखा ग्रंथालयात, वाचन संस्कृतीच्या माहेरी, माझ्या माहेरी, माझ्या काकामुळे .
बदलापूरभूषण श्याम जोशी सर हे बदलपूरातलं चिरपरिचीत नाव. जोशी सर म्हणजे मराठी साहित्याचा चालताबोलता ज्ञानकोश! जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तकं पोचली पाहिजेत्, वाचली गेली पाहिजेत्, बदलापूरासारख्या ठिकाणी संदर्भ ग्रंथ उपलब्ध झाले पाहिजेत या वेडाने झपाट्लेला हा माणूस.
सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मधुन टेक्सटाइल डिझाइनींगची पदवी घेतल्यानंतर शिक्षकी पेशा स्विकारला. काका अत्यंत विद्यर्थीप्रिय शिक्षक ! त्याबरोबरच गोनिदांच्या सहवासात दुर्गभ्रमंती, इंटीरीयर डिझाइनींग्, फोटोग्राफी, ग्रंथ संकलन असे अनेक छंद. वाचनवेड तर रक्तातच होतं. आमचे आजोबा साने गुरुजींच्या सान्निध्यात राहिलेले, त्यांच्या विचार प्रभावातले. त्यांच्या खोलीत भिंत भरून ग्रंथसंपदा होती. आम्ही घरात कायम वाचणारी माणसंच पाहिली! त्यांचा मुलगा ग्रंथवेडा झाला यात काहीच आश्चर्य नाही! पण त्याने हे वेड खूप पुढे नेण्याचं स्वप्न पाहिलं. आणि २१ मार्च २००५ च्या मुहुर्तावर ग्रंथसखाची सुरुवात झाली. का तर सर्वांपर्यंत वाचनाचा आनंद जावा, पुस्तकं नुसती पाहायला नाही तर हाताळा, वाचा, विचार करा या हेतुने!
काकाला ग्रंथसखा हे नुसतं वाचनालय म्हणून अभिप्रेत नाही. त्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत अखंड भ्रमंती करुन जमा केलेली ही ग्रंथसंपदा लोकांपर्यंत पोचवणारा दुवा असावा असं वाटतं. त्यामुळे इथे नेहेमीच्याच फीमध्ये कोणतेही ग्रंथ्, पुस्तकं वाचता येतात्, डिपॉझिटच्या आडकाठ्याना इथे जागा नाही. लोकाना हवे ते पुस्तक हातात आणून देण्याची तळमळ असणारा इथला कर्मचारी वर्ग आहे. सध्या ग्रंथसखामध्ये पन्नास हजाराहून जास्त पुस्तकं उपलब्ध आहेत. दहा हजार दुर्मिळ पुस्तकं, मासिकं. मराठीतलं पहिलं प्रकाशित झालेलं मासिक सुद्धा या संग्रहात आहे.

‘वाचावे काय- का आणि कसे’ ही तर ‘ग्रंथसखा’ची तळ्मळ. काका आणि त्यांच्या सहकार्यांनी निवडक पंधराशे पुस्तकांची ग्रंथसूची आपल्या सभासदांसाठी उपलब्ध केली आहे. या निवडक पुस्तकांचा वाचनालयात स्वतंत्र कक्ष आहे. साहित्याचा अभ्यास करणार्या व्यक्तीला कोणताही ग्रंथ उपलब्ध व्हावा व वाचनालयात बसून त्याचा अभ्यास करता यावा म्हणून अभ्यासिकेचीही सोय आहे. वाचनालयाला शेषराव मोरे, गिरीश कुबेर, संजय भास्कर जोशी, भानू काळे, गंगाधर गाडगीळ, शंकर वैद्य, मंगेश पाडगावकर, प्रवीण दवणे, अनिल अवचट, अनंत सामंत, सुधीर मोघे, सुभाष भेंडे, फैय्याज अशा मान्यवर साहित्यिक-कलावंतांनी भेटी दिल्या आहेत. या बरोबरच इथे श्रवणशाळा, पालकशाळा, काव्यसंध्या, वातानुकुलित अभ्यासिका, कै. रवींद्र पिंगे कलादालन इत्यादी उपक्रमांचे आयोजन करून आपला वेगळा ठसा साहित्यिक व सांस्कृतिक जीवनावर उमटवला आहे. यासाठी काकाला मुंबई मराठी साहित्य संघाचा मंगेश नारायण कुलकर्णी पुरस्कार (२००९); तसेच ठाण्यात भरलेल्या चौ-याऐशीव्या मराठी साहित्य संमेलनात (२०११) ‘ग्रंथप्रसारक’ असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

एवढ्यावरच ग्रंथसखाचं काम थांबलेलं नाही. साहित्यिकांच्या कारकिर्दीचं डॉक्युमेन्टेशन जपणं, उपलब्ध करुन देणं, एक बूक युनिवर्सीटी जिथे कसं, काय्, केव्हा वाचावं याचं मार्गदर्शन मिळेल्, ग्रंथालयांच्या वाचकांची पातळी जाणून घेऊन ती उंचावण्यासाठी प्रयत्न करणं, पुस्तकांचा प्रवास दाखवणारं संग्रहालय उभारणं, बूक टूरीझम असे अनेक प्रकल्प डोक्यात ठेवुन काकाचं अखंड काम चाललेलं आहे. या अफाट कामासाठी लागणारा पैसा जमवताना स्वतासाठी काहीही शिल्लक ठेवलेलं नाहीच! पंधराशे स्क्वेअर फूटाचं पुस्तकांचं घर असलेल्या माणसाच्या घरात सर्वत्र पुस्तकं, बेड साठी जागा नाही, त्यामुळे पुस्तकांवरच गाद्या घालून झोपणं वगैरे गोष्टी नेहेमीच घडणार्या!
शब्द चि आमुच्या जिवाचे जीवन
शब्दे वाटू धन जनलोका !
हेच आयुष्याचे लक्ष्य मानून जगणार्या अवलिया ग्रंथसखा श्याम जोशी ना माझा शि.सा.न.!!