एक नाते — अनोखे
माणूस जन्मल्यापासून त्याच्या जीवनात अनेक नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरूवात होते. कोणतेही मूलभूत प्रश्न मनात येण्याआधीच ही नाती तयार होतात. पुढे ह्या नात्यांची दृढता किंवा कमजोरपणा व्यक्तिसापेक्ष ठरू शकते. आई-मूल, बाप-मूल, बहीण-भाऊ, पती-पत्नी, मित्र-मैत्रिणी, काका, मामा, मावशी, आत्या इ. अनेक नाती जन्माला येतात. आपल्या साहित्यात यातील अनेक नात्यांचे भरभरून गोडवे गायलेले ठिकठिकाणी दिसून येतात. परंतु ह्या सर्व नात्यांहून एक आगळेवेगळे, बोनस म्हणून पदरात पडलेले, तरीही अत्यंत गहिरे आणि हृद्य, तरीही थोडेसे उपेक्षित राहिलेले नाते म्हणजे आजी आणि नातवंडाचे नाते. ह्या नात्यासंबंधी कुठेही फारसे वर्णन केलेले आढळून येत नाही. असलेच तर अपवादात्मक आणि चित्रपटातून, कथाकादंबऱ्यांतून आईवियोगामुळे आईचाच रोल निभावण्याच्या भूमिकेत.
वास्तविक हे नाते कोणतीच अपेक्षा नसलेले असते. आईचे आपल्या अपत्यावर कितीही प्रेम असले तरी ह्या नात्यावर उभयपक्षी अपेक्षांचे ओझे असतेच. आपल्याला म्हातारपणी मुलाने आर्थिक नको असेल तरीही प्रेमाचा मानसिक आधार द्यावा ही तर प्राथमिक अपेक्षा असतेच. पण आजी-नातवंडाच्या नात्यात भविष्यातील कोणतीच अपेक्षा नसते. असलीच तर वर्तमानात एखाद्या पाप्याची किंवा मिठीची. अपेक्षाविरहीत अश्या ह्या नात्यात म्हणूनच कधीही घुसमट होत नाही, एकाकीपणा जाणवत नाही. दोन्ही पक्षांकडून वागण्यात अत्यंत निर्मळपणा असतो. आजीच्या आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा हा कोवळा, लहानगा जीव तिच्या मांडीवर ठेवला जातो तेव्हा तर ती क्षणभर सुन्न होऊन जाते, आनंदापेक्षा ती त्या लहानग्याच्या काळजीने गलबलून जाते आणि उत्तरायुष्यात पदरी पडलेले हे दान ती बोनस म्हणून स्वीकारते. जसा नियमित पगारापेक्षा बोनसचा आनंद अधिक, तशीच काहीशी आजीची मानसिक अवस्था असते. म्हणूनच ती अधिक आनंदाने कामाला लागते. पण नातवंडाचे करीत असताना ती आई असतानाच्या जगण्यापेक्षा अधिक निर्धास्त असते, कारण भविष्यात तिच्यावर कोणत्याही दोषारोपांची शक्यता नसते. आईप्रमाणे तिच्याकडे बोट दाखविले जाण्याची भीतीही नसते. म्हणूनच हे नाते अधिक गहिरे आणि हृद्य असते. आजीपण हे लांबविलेले आईपण असते (Extended motherhood) हे मान्य असले तरी त्या लहानग्यावर स्वतःच्या कोणत्याही अपेक्षा ती लादत नाही, कारण वयपरत्वे तिला तिच्याच अस्तित्वाची निश्चिती नसते त्यामुळे आलेला प्रत्येक दिवस ती आपल्या नातवंडासोबत "अजि सोनियाचा दिनु" म्हणून घालवू पहाते. आजीच्या प्रेमाला दुधाच्या सायीची उपमा दिली जाते हे खरे, पण तिला थोडीच इतरांप्रमाणे त्यापासून लोणी आणि तुपाची अपेक्षा असते? फक्त साय जपणे हेच काम ती करत असते.
ह्या नात्याचे वर्णन आजोबा ह्या सदरात बसणाऱ्या समस्त पुरूष वर्गालाही तंतोतंत लागू पडते. पण आपल्याकडील पुरूषप्रधान संस्कृतीत पुरुषी दरारा थोडा जास्तच असल्यामुळे काही अपवादात्मक परिस्थिती सोडल्यास नातवंड आजोबांपेक्षा आजीलाच जास्त बिलगते हे खरे. हल्लीच्या कमावत्या स्त्रियांच्या काळात आजीची जबाबदारी थोडी वाढली आहे हे वास्तव आहे. एखाद्या पाळणाघरात मुलाला ठेवण्यापेक्षा धात्रीची भूमिका बजाविणे हे आजी आणि आई ह्या दोघींच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर आणि मानसिक संतुलन राखणारे असते. आजीच्या दृष्टीने ती तारेवरची कसरत ठरू शकते. ती निभावून नेत असताना प्रतिपक्षांकडून (सून, जावई, प्रसंगी पुत्र व कन्याही) शाब्दिक मारही खाण्याची तयारी ठेवावी लागते. पण नातवाच्या एखाद्या मिठीत ती तो सल विसरून जाते आणि उरते ते फक्त शब्दांचे निर्माल्य. हे आजकालचे आजीपण संभाळताना तिला आपल्या नात्याच्या मर्यादांचे कसोशीने पालन करावे लागते. आजीपण सोडून आईपणाच्या भूमिकेत चुकून जरी पाऊल पडले तरी अर्थाचा अनर्थ ठरलेला. कर्तव्य चोखपणे बजावित असताना आपल्याला नातवंडाच्या बाबतीत कोणतेही अधिकार नाहीत ह्याचे तिला घरातील स्वास्थ्यासाठी सतत भान ठेवावे लागते.
ह्या नात्याचा मला साकल्याने विचार करता आला ते आजीपण प्राप्त झाल्यावरच. यामध्ये कोणत्या एका नात्याला श्रेष्ठ-कनिष्ठ ठरविण्याचा हेतू नाही, पण ह्या नातेसंबंधाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहाता आले. "संध्याछाया भिवविती हृदया" अश्या कातर अवस्थेत हाती आलेला हा कोवळा जीव आपले डोळे मिटण्यापूर्वी देवाने आपले मन गुंतविण्यासाठी पाठविलेला छोटा देवदूतच वाटावा इतके हे नाते सुंदर आहे. नातवंडाच्या बाबतीत विचार करता ऐकलेली एक गोष्ट आठवते. वाळवणाचे राखण करीत बसलेल्या आजीकडे पाहून नातू कावळ्याला म्हणतो, "ए कावळ्या, माझ्या आजीचा डोळा फोडू नकोस नाहीतर मलाच तिची काठी होऊन रहावे लागेल." यात आजीची काळजी आणि जबाबदारीची जाणीव दिसते. आजच्या काळात तर बंद दरवाजांच्या घरांत आजी ही त्यांची सर्वांत जवळची मैत्रीण असते. आईवडिलांशी शेअर न करता येणारी त्यांची सिक्रेटस ती आजीशी मनमोकळेपणाने सांगतात. आजी ही 'रम्य ते बालपण' असे म्हणत त्यांच्या लुटूपुटीच्या खेळांत सहभागी होते आणि मनमुराद आनंद लुटते. प्राजक्ताच्या फुलासारखे टवटवीत, आपल्या मंद सुगंधाने आसमंत भारून टाकणारे पण केवळ अल्पावधीतच मिटून जाणारे तरीही आठवणींचा मंद दरवळ कायम मनात झिरपत ठेवणारे हे आजी-नातवंडाचे अनोखे पण थोडेसे उपेक्षित नाते. म्हणूनच जेव्हा मला माझा मुलगा तक्रारीच्या सुरांत सांगतो "तू त्याला कधीच ओरडत नाहीस. तुझ्याकडे त्याला सगळेच माफ आहे," तेव्हा मी नुसतेच हसते, उत्तर देणे शक्य नसते कारण त्या हसण्यात असतो एक समाधानाचा आणि तृप्तीचा हुंकार..!