पाटिशप्ता

पाटिशप्ता

बंगाली मिठाया ह्या बंगाली मुलींप्रमाणेच गोड असतात. की त्या मिठायाच लहानपणापासून खाल्ल्यामुळे बंगाली मुली एवढ्या गोड होत असतील? तात्पर्य काय, तर त्या (म्हणजे मिठाया) न आवडणारा विरळाच.

पाटिशप्ता हा असाच सणासुदीला केला जाणारा एक पारंपारिक पदार्थ. मूळ रेसिपीत गूळ-खोबर्‍याचं सारण करून ते तांदळाच्या पॅनकेकमधे भरून त्याचा रोल करतात. तसं बघायला गेलं तर हे म्हणजे आपल्या मोदकांचंच फ्लॅट व्हर्जन आहे. पण हेच जरा खालील वेगळ्या पद्धतीने केल्यावर डिश एकदम रिच झाली.

घ्या तर मग... दिवाळीला घरच्यांना हा वेगळ्या चवीचा पदार्थ खायला घालून आनंद द्विगुणित करा. ही दिवाळी तुम्हां सगळ्यांना उत्तम आरोग्याची, स्वस्थ मनाची आणि भरभराटीची जावो.

shapta1

साहित्यः

पॅन केक साठी:

१. मैदा - १ बाउल
२. तांदळाचं पीठ - ५ चमचे
३. चवीनुसार मीठ
४. तेल/पाणी आवश्यकतेनुसार

स्टफिंग साठी:

१. कॅन्ड मँगो प्युरे / पल्प - १/२ बाउल
२. डेसिकेटेड कोकोनट - १ मोठा बाउल
३. बदाम, पिस्ता आणि काजू भरडसर चिरलेले - ३ चमचे प्रत्येकी
४. पिस्ता पावडर
५. मिल्क मेड - आंब्याच्या गोडीनुसार कमी/जास्त

shapta2

कृती:

१. पॅनकेकसाठी एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ, मैदा आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करा. गरजेप्रमाणे त्यात पाणी घालून सरसरीत भिजवा (घावनांचं पीठ असतं त्या घनतेत).

shapta3 shapta4

२. मंद आचेवर नॉनस्टिक तवा तापला की १ चमचा तेल घालून सर्व बाजूंनी पसरून घ्या. पिठामधून एक एक डाव मिश्रण घालून बाईट साईज पॅनकेक दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राउन होईस्तोवर भाजून घ्या. जर छोटे छोटे पॅन केक घालायला कंटाळा असेल तर एकच मोठा घाला. असे सर्व पॅन केक बनवून घ्या व पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपरवर काढा, जेणेकरून अतिरिक्त तेल शोषलं जाईल.

shapta5 shapta6

३. पॅन केक गार होईस्तोवर दुसर्‍या एका बाउलमध्ये अनुक्रमे कॅन्ड मँगो प्युरे, डेसिकेटेड कोकोनट, बदाम, पिस्ता आणि काजू घालून हलक्या हाताने मिक्स करा. मिश्रण अगदीच घट्ट वाटलं तर गरजेप्रमाणे दूध घालून पातळ करा (अगदी पातळ नाही; साधारण स्प्रेड होईल ह्या घनतेचं).

shapta7 shapta8

४. मिक्स केलेल्या मिश्रणाची चव घेऊनच मिल्क मेड कमी/जास्त प्रमाणात घाला. मिल्कमेड घालूनही गोडी कमी वाटली तर पिठीसाखर घालून मिश्रण सारखं करा. आता पोळपाटावर एक एक पॅनकेक घेऊन तयार मिश्रण त्यावर पसरा.

shapta9 shapta 10

५. वरून चिमूट-चिमूट ड्रायफ्रूट्स पुन्हा भुरभुरवा आणि पॅनकेकचा रोल करून मँगो पाटिशप्ताचा आनंद लुटा!

shapta 11

टिपा:

१. मिश्रणाला अजून रिचनेस देण्यासाठी त्यात केशरमिश्रित दूध घालू शकता.

२. मँगो प्युरे ऐवजी हर्शलेचं चॉकलेट सिरप किंवा कॅडबरीची ड्रिंकींग चॉकलेट पावडर घालून चॉको/चॉकलेट फ्लेवर पाटिशप्ता बनवू शकता.

३. ड्रायफ्रूट्स नको असतील तर बारीक चिरलेला खजूर आणि बदाम हे कॉम्बोदेखील मस्त लागेल. खजुरांऐवजी सुकवलेले प्लम/अननस/अंजीर इत्यादी मिक्स करूनही पाटिशप्ता बनवू शकतो.

४. बारीक चिरलेली फ्रेश फळं (संत्री, मोसंबी यांसारखी रसाळ फळं सोडून) उदा. केळी, सफरचंद, चिक्कू, स्ट्रॉबेरी विथ व्हिप्ड फ्रेश क्रीम हेही कॉम्बो छान लागेल असा अंदाज लावतो... अर्थात कल्पनाशक्तीला मर्यादा नसते!

हॅप्पी दिवाली..!