आजच्या धावपळीच्या युगामधे वेळेत अपेक्षित ठिकाणी पोचण्यासाठी आपण वाहनाच्या कुठल्याना कुठल्या प्रकारावर सतत अवलंबुन असतो. नोकरीला ३०-४० कि.मी. जायचं असु दे किंवा शेजारच्या चौकातुन कोंथिंबिरीची गड्डी आणायची असु दे. ऐन पावसाळ्यात महत्त्वाच्या पिलिअन रायडर (मि.पा. वरच्या नाही) बरोबरची सहल असु देत. गाडीवर (मोदकरावांसारखे उत्साही लोकं आजही सायकलवर :) ) टांग टाकली की निघालं असा प्रकार असतो. आपल्या पे.रु.चा.पा.पा. एवढ्याच महत्त्वाच्या असणार्या गाडीच्या काम करायच्या पद्धतीविषयी मात्र बहुतांश लोकं उदासिन असतात. स्पाच्या ह्या धाग्यावर बर्याच लोकांनी बर्याच शंका एकमेकांना विचारलेल्या आहेत. त्यापासुन प्रेरणा घेऊन एक वाहनविश्वाची सफर घडवुन आणणारी एक लेखमाला मी आजपासुन सुरु करत आहे.
ह्या मालिकेचा मुख्य उद्देश असा आहे की,
१. वाचकवर्गाला वाहनविश्वाचा इतिहास समजावा.
२. ईंधनावर चालणार्या वाहनांचे वेगवेगळे प्रकार काय असतात?
३. वाहन नक्की कसं काम करतं?
४.काळानुरुप वाहनांमधे आणि त्यामधे वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानामधे कसे बदल होत गेले?
५. आत्ताच्या काळात प्रोटोटाईप स्टेज ला असणार्या आणि भविष्यात वाहन क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवुन आणणार्या वाहनांची आणि त्यावर चालु असणार्या संशोधनाची माहीती देणं.
६. काही ब्रँड स्पेसिफिक टेक्नॉलोजिज.
७. काही प्रसिद्ध स्पोर्ट्सकार्स.
८. वाहनाची देखभाल.
ह्या सगळ्या गोष्टींची जमेल तेवढ्या साध्या सोप्या भाषेमधे माहीती द्यायचा प्रयत्न मी करणार आहे.
वाहनांशी संबंधित शेकडो तांत्रिकी नावं आहेत. मराठी प्रतिशब्द सुचवता आले तर सुचवाच. पण किचकट अणि जडबंबाळ शब्दप्रयोग टाळण्यासाठी मी शक्यतो प्रचलित ईंग्रजी नावचं वापरणार आहे. जसे की स्पार्क प्ल्ग (ईंधन प्रज्वलक), हायड्रॉलिक ब्रेक (तैल गतिनिंयंत्रक ईत्यादी), फ्युएल ईंजेक्श्न (ईंधन टोचक =)) )
ईथेच आपण आपल्या वाहनाविषयी काही शंका असतील तर त्याविषयीही चर्चा करु. कोणाला वाहन उद्योगाविषयी अजुन जास्तीची माहीती हवी असेल तर तिही तुम्ही इथे विचारु शकता. कोणाला माहीतीमधे भर घालायची असेल तर तीही मला सांगाच. तसं सांगायचं झालं तर ही लेखमाला ६० ते ७० भाग एवढी मोठी होऊ शकते. वाचकांचा कसा प्रतिसाद मिळतोय त्यावर किती खोलात माहीती द्यायची हे ठरवीन :) . चला तर मग उद्यापासुन सुरु करु वाहन विश्वाची एक मोठ्ठी सफर.

(फोर्ड टी- मॉडेल वर्ष १९१७)
(क्रमशः)
*सर्व चित्रे आं.जा. वरुन साभार.