हि गोष्ट मी गोव्यात असतानाची आहे. गोव्याच्या वास्को येथील नौदलाच्या रुग्णालयात काम करीत होतो. मी तेथील अधिकाऱ्यांच्या वसाहतीत राहत असे. दाबोळी विमानतळाच्या अगदी जवळ असलेली हि वसाहत अतिशय सुंदर आहे. दोन मजली इमारतीत चार घरे. खालच्या घरांना पुढे आणि मागे अंगण आहे. बाजूला मोटारीसाठी गैरेज आणि वरच्या मजल्यावर राहणार्यांना गैरेजच्यावर एक गच्ची. घरे सुद्धा सुटी सुटी आहेत. वसाहतीत रहदारी अशी नाहीच. त्यामुळे मुले फार सुखात आपल्या छोट्या सायकलींवर फिरत असत. त्यांची शाळा पण त्याच वसाहतीत आहे. त्यामुळे मुले दोन मिनिटात शाळेत पोहोचत. संध्याकाळी तेथिल रस्त्यांवर बायकोसह चालण्याचा व्यायाम करणे हा एक रोजच उद्योग असे. गोव्यात दाबोळी येथे नौदलाचा सर्वात मोठा वैमानिक तळ आहे. त्यामुळे आमच्या वसाहतीत अनेक वैमानिक आपल्या कुटुंबासह राहत असत. त्यातुं मी विक्रांतवर दोन वर्षे असल्याने माझ्या बर्याच वैमानिकांशी ओळखी होत्या. या वसाहतीतील साडे चार वर्षाचे माझे वास्तव्य हा माझ्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा काळ होता.
या वसाहतीत एक वैमानिक आपल्या कुटुंबासह राहत असे. त्याची चार वर्षाची मुलगी सिमरन अतिशय छान होती. मोठे गाल, मोठे डोळे, इतक्या लहान मुलीची छान कमरेपर्यंत वेणी यामुळे ती मुलगी फारच छान दिसत असे. या मुलीची आई निर्मल( नाव बदललेले आहे) तेथे आपल्या वैमानिक नवर्याबरोबर चालताना संध्याकाळी दिसली. मी तिच्या नवर्याला विक्रांत पासून ओळखत होतोच. त्यामुळे ओळखही झाली यानंतर बर्याच वेळेस तिला आम्ही वसाहतीत पाहत होतो.
एक दिवस निर्मल आमच्या रुग्णालयात माझ्या विभागात मुलीला घेऊन आली. सिमरनच्या पोटात दुखत असल्याने तिला बाल रोग तज्ञाने सोनोग्राफीसाठी पाठविले होते. पण आता निर्मलला पाहून लामा धक्काच बसला. कारण तिने घातलेला पोशाख एखाद्या नटी सारखा होता. अर्धी अधिक छाती उघडी होती. मला जर आश्चर्यच वाटले. पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करून तिच्या मुलीकडे लक्ष पुरवले. तिची सोनोग्राफी झाल्यावर मी रिपोर्ट लिहित होतो. तेंव्हा ती माझ्या टेबल समोर बसली होती. आपले उरोज टेबलावर टेकवून ती माझ्याशी रिपोर्ट बद्दल बोलू लागली. टेबलवर ठेवल्यामुळे उरोज तिच्या बळूज्मधून अधिकच बाहेर आले होते.
मला फारच विचित्र वाटत होते. मी तिच्या मुलीकडेच पाहत तिला सर्व गोष्टी सांगितल्या आणि रिपोर्ट घेऊन बालरोग तज्ञाकडे पाठविले.
असाच अनुभव परत एकदा तिचा पाय मुरगळला होता तेंव्हा ती एक्स रे काढायला आली असताना मला आला.
दोन दिवसांनी मी त्या बाल रोग्ताज्ञाकडे सहज फिरत फिरत गेलो तेंव्हा हि निर्मल परत मुलीला दाखवायला आलेली होती. परत कपडे तोकडे आणी अर्धी छाती उघडी असा वेष. मी परत एक चक्कर मारून आलो. तोवर ती गेलेली होती. मी त्या बालरोग तज्ञाला विचारले कि हि बाई तुला विचित्र वाटत नाही काय? मी हिला जेंव्हा जेंव्हा रुग्णालयात पाहतो तेंव्हा हिचे कपडे तोकडे असतात. यावर तो मला तेच म्हणाला. कि सर हि बाई आपण चालायला जातो तेंव्हा अगदी सती सावित्रीसारखी कपडे घातलेली असते. आणी रुग्णालयात हे असे कपडे काय घालते. काहीतरी विचित्रच आहे. हाच अनुभव आमच्या आणखी एका मित्राला (कान नाक घसा तज्ञाला) आला होता. अर्थात या गोष्टी आम्ही चहापानाच्या खोलीत बोलताना आम्हाला कळले. तिथे सर्वांचे म्हणणे हेच पडले कि सर्व साधारणपणे बायका फिरायला जाताना झकपक कपडे घालतात आणी रुग्णालयात मात्र सोज्ज्वळ कपड्यात असतात.
हि मनोवृत्ती काय ते कोणालाच विश्लेषण करता येत नव्हते. पुढे जेंव्हा जेंव्हा आम्ही निर्मलला रुग्णालयात पहिले तेंव्हा ती तोकड्या कपड्यात होती. आणी गंमत म्हणजे यातील एकही डॉक्टर लघळ किंवा अशा स्त्रीला प्रोत्साहन देणारा नव्हता.( म्हणजे संशयाचा फायदा निर्मलला देता यावा).
काही महिन्यानंतर मी तातडीच्या कामावर( इमर्जन्सी ड्युटी) संध्यकाळी कैज्यूअल्टी मध्ये बसलो होतो आणी येणारे रुग्ण पाहत होतो. एवढ्यात नवर्याबरोबर निर्मल आली. यावेळेस तिचे कपडे पूर्ण होते. आणी तिच्या पोटात प्रचंड दुखत होते. तिला मी तपासले तेंव्हा तिच्या ओटीपोटात डावीकडे खूप दुखत होते आणी तिचा चेहरा पांढरा पडला होता. तिची परिस्थिती पाहून मी तिला कैज्यूअल्टी सोडून सरळ तिला सोनोग्राफीसाठी घेऊन गेलो. सोनोग्राफी करताच मला लक्षात आले कि तिला टयूबल एकटोपिक प्रेग्नन्सी ( म्हणजे गर्भ गर्भाशयात असण्या ऐवजी स्त्रीबिजवाहक नलिकेत आहे) आणी ती स्त्रीबिजवाहक नलिका फुटली आहे आणी त्यातून रक्तस्त्राव होत आहे. तच्या पोटात जवळ जवळ एक लिटर रक्त साठले होते. मी तेथूनच आमच्या स्त्रीरोग तज्ञाला फोन केला आणी सांगितले कि मी गाडी पाठवतो आहे तुम्ही ताबडतोब य़ा. त्यावर त्यांनी मला उलटे शस्त्रक्रिया गृह तयार कर आणी भूल तज्ञाला सुद्धा बोलावून घे म्हणून सांगितले. मी त्यांना म्हटले सर तुम्ही रुग्णाला बघून तर घ्या. त्यावर ते म्हणाले कि माझा तुझ्या सोनोग्राफीवर पूर्ण विश्वास आहे. तेंव्हा वेळ घालवू नको.
आता निर्मल आणी तिच्या नवर्याला तिची ताबडतोब शल्यक्रिया करणे आवश्यक आहे असे समजावून सांगण्याची जबाबदारी माझीच आली. मी त्यांना समजावून सांगितले आणी तिच्या नवर्याला सांगितले कि चार ते पाच बाटल्या रक्त लागेल तर त्याची सोय कर. मी आमच्या रक्तपेढीला तसे सुचित ही केले. शिवाय तेथल्या नौदलाच्या मुख्यालयात तसा बिनतारी संदेशही पाठविला. अर्ध्या तासात सर्व तयारी पूर्ण करून तिला शस्त्रक्रियेसाठी घेतले. सुमारे एक तासाने तिची शस्त्रक्रिया पूर्ण झाली. तिला तीन बाटल्या रक्त चढवावे लागले होते. ती शस्त्रक्रिया गृहाच्या बेहर आली आणी तिला अधिकारी कुटुंबाच्या कक्षात हलवले. मी थोड्यावेळाने जाऊन तिला पाहून आलो. तिने अर्धवट झोपेत कृतज्ञतापूर्वक स्मित केले. तिचा नवरा मला धन्यवाद देत होता. तीन दिवस ती रुग्णालयात होती. जातांना परत एकदा भेटून ती मला आणी स्त्रीरोग तज्ञाला धन्यवाद देऊन गेली. पुढे मी दोन वर्षे ए एफ एम सी पुणे येथे बदली होईपर्यंत त्या रुग्णालयात होतो. त्या दोन वर्षात मी तीला सात आठ वेळा रुग्णालयात कुणाला भेटायला किंवा स्वतःला आणी मुलीला दाखवायला आलेले पाहिले. पण आता तिने कधीही रुग्णालयात तोकडे कपडे घातलेले आमच्यापैकी कोणीहि पाहिले नाही.
ती परत मला चार वर्षांनी मी नौदल सोडल्यावर केरळ च्या सहलीला गेलो असताना मुन्नारला कानन देवन चहाच्या कारखान्यात भेटली. ती आणी तिच्या नवर्याने आमची आस्थेने विचारपूस केली.
ती आधी तसे का वागत होती याबद्दल आमच्या डॉक्टर मित्रांमध्ये चर्चा झाली होती परंतु नक्की असे काही कुणाला सांगता येत नव्हते. exhibitionism चा एक भाग असावा असे वाटले. मात्र खरे कारण कधीच कोणाला कळले नाही. तिचे तिलाच माहिती.
नंतर कदाचित मृत्यू फार जवळून पहिल्याने तिची डॉक्टरांकडे पाहण्याची नजर बदलली असावी. म्हणूनच म्हणतात ना
नाही देखिले पंचानना( सिंह)
तोवरी जंबुक( कोल्हा) करी गर्जना.