श्री गणेश लेखमालेतील लेख

लेखकः प्रभाकर पेठकर

---------------

भक्तीमार्गातील अडथळे.

काही दिवसांपूर्वी जन्माष्टमी झाली. जन्माष्टमीच्या आधी झी-२४ तास वर अत्यंत उद्बोधक चर्चा (रोखठोक) ऐकायला मिळाली. गेल्या जन्माष्टमीला मानवी मनोरा कोसळून, खालच्याच थरावर असलेला, एकजण जबर जखमी झाला होता. मानेला दुखापत झाल्याने कमरेखाली लुळा पडला होता. ६ महिन्यांच्या उपचारांनंतर कुबड्याघेऊन चालण्याइतपत परिस्थिती सुधारली तरीपण कोणाच्या आधाराविना जगू शकत नाही. २० वर्षाचा मुलगा त्याच्या पुढे डोंगराएव्हढे आयुष्य आहे. चर्चेत तो आणि त्याची आई आले होते. त्याच्या आईला एकंदर प्रकाराबद्दल मत विचारले असता ती म्हणाली, 'ह्याच्या आयुष्याची वाट लागली आहे. मी जिवंत असे पर्यंत करीन ह्याचे सर्व काही पण माझ्या पश्चात काय? आम्हाला सरकारने मदत करावी.' म्हणजे त्या बाईलाही घटनेचे भांडवल करून सरकारकडून आर्थिक मदत हवी होती. पण 'हा प्रकार अयोग्य आहे. एखाद्या तरुणाच्या जीवाशी खेळ होतो आहे, तेंव्हा हे ताबडतोब थांबवा' अशी आर्त हाक तिच्या शब्दांमध्ये कुठेही नव्हती. कदाचित ती अशिक्षित असेल आणि एव्हढा व्यापक दृष्टीकोन तिच्याजवळ नसेल तरीही, प्रसंगाचे गांभिर्य कुठेही कमी होत नाही. दरवर्षी जन्माष्टमी येते, वाहिन्या तथाकथित 'सकारात्मक' चर्चा घडवून आणतात. पुन्हा जन्माष्टमीच्या दिवशी आख्ख्या दिवसाचे चित्रिकरण आणि सादरी करण आपल्या वाहिनीवर दाखवून 'गोविंदांचा जल्लोष' मोठ्या कौतुकाने दाखवितात, सेलीब्रेटीज हजेरी लावून, राजकारण्यांच्या खांद्याला खांदा लावून (की राजकारणी ह्या सेलीब्रेटीज च्या खांद्याला खांदा लावायला उत्सुक असतात कोण जाणे...) प्रसिद्धी वलयात राहण्याचा, वलय वाढविण्याचा प्रयत्न करतात, गोविंदांच्या दिशेने चुंबने फेकतात, तमाशा नृत्य, अंगविक्षेप करून गोविंदांना आणि उपस्थित जनसागराला चेकाळवतात. सेलीब्रेटीज आणि राजकारणी, 'स्वतःच्या जीवाला सांभाळून खेळा' असा, सिगरेटच्या पाकिटांवर असलेल्या 'तंबाखू सेवनाने कॅन्सरसारखे प्राणघातक रोग होऊ शकतात' ह्या कुणावरही सकारात्मक परिणाम होणार नाही पण आपल्याला मात्र एक नैतिक कार्य 'उरकल्याचे' श्रेय मिळेल अशा वाक्यासारखे वाक्य फेकून स्वतःची एक 'खेळी' खेळतात. पण सिगरेटवर जशी कायमस्वरूपी बंदीची मागणी कोणी करीत नाही तशीच गोविंदा ह्या खेळात शिरलेल्या प्राणघातक प्रथांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही. ह्या वर्षी १ मृत्यू आणि ५७ जखमी (त्यातले कांही गंभीर) अशी मी ऐकलेली शेवटची बातमी. होऊदे मृत्यू आणि जखमी. त्याहून जास्त तर रस्त्यावरच्या अपघातातही होतात. त्याचं काय एव्हढं? त्या विषयावर किती चर्चा करणार? आता पुढच्या वर्षी पुन्हा जन्माष्टमी येईल तेंव्हा बघू. सेलीब्रेटीज, राजकारणी आणि वाहिन्यांनी जे कांही कमवायचे ते कमवून घेतले आहे.

आता गणेशोत्सव. मागे वळून पाहू नका. लालबागचा गणपती मोठा की जीएसबी गणपती मोठा, गेल्यावर्षी दानपेटीत किती रक्कम जमा झाली, किती सोने-नाणे आले त्यापेक्षा जास्त ह्या वर्षी यायला हवे. मग काय? जाहिरात करा, दूरदर्शनवर चर्चा घडवा, लालबागचाच राजा(?) कोणाला कसा पावला ह्याच्या बातम्या पसरवा, गेल्या २५-३० वर्षात किंवा 'वयाच्या तिसर्‍या वर्षापासून आज ६५ वर्षांचा होई पर्यंत लालबागच्या गणपतीच्या पहिल्या दिवशीच्या दर्शनात कधी एकदाही खंड पडू दिला नाही' वगैरे शेखी मिरविणार्‍यांना शोधून काढा, त्यांच्या मुलाखती घ्या, ज्यांना अनेक वर्षे (प्रयत्न करूनही) मूल होत नव्हतं त्यांना 'बाप्पाच्या' नुसत्या दर्शनानेही कसे विनासायास मूल झाले अशांना पुढे आणा. त्यांच्या भक्तीचे गोडवे गा. एखाद्याला कांही नको असेल, पण राजाच्या नुसत्या दर्शनानेही विचलीत मन शांत होऊन अगम्य आनंद प्राप्त होत असेल त्यांनाही येऊ द्या. काहीही करा पण लालबागच्या, जीएसबीच्या, कोळीवाड्याच्या गणेशोत्सवाला विराट स्वरूप प्राप्त झालं पाहिजे. आमदनी वाढली पाहिजे. महिलांना धक्काबुक्की झाली तरी चालेल (त्याच महिला पुन्हा पुढच्या वर्षी येतीलच), गर्दीत चेंगराचेंगरी झाली तरी चालेल. सेलीब्रेटीज आणि राजकारण्यांना मात्र वेगळी वागणूक द्या. देवाच्या चरणी सगळे सारखे असतात हा जुना बुरसटलेला विचार झाला. आता तसे करून नाही चालत. राजकारण्यांना, सेलिब्रेटीजनां जर 'खास', इतरेजनांपेक्षा वेगळी, प्राधान्यक्रमाची वागणूक मिळाली तरच ते दरवर्षी हजेरी लावतील आणि त्यावरच आपल्या मंडळाची, आपल्या गणपतीची प्रसिद्धी अवलंबून असते. आणि प्रसिद्धीवरच पैसा अवलंबून असतो. व्यापार.. व्यापार वाढवलाच पाहिजे. भक्तीमार्गात मोक्ष असेल नसेल पण पैसा मात्र भरघोस आहे.

गणपती सरता सरता नव्या तयारीला लागा.. नवरात्र येते आहे. गरबा देवीचा उत्सव. जोरजोरात बँड-डिजे, पुन्हा सेलीब्रेटीज, पुन्हा तरूणाईचा जल्लोष, तोच उन्माद, स्वातंत्र्य आणि स्वैराचारातील धूसर सीमारेखा. गर्भनिरोधक गोळ्यांची आकाशाला भिडणारी विक्री, मुलींवरून, अगदी चाकू-सुरे आणि लाठ्या काठ्या घेऊन, होणार्‍या मारामार्‍या, एकमेकांची डो़की फोडणं..... भक्तगणाची भक्ती कुठे गेली?........अंबे माता की जय.
ह्या काळात नवजात अर्भकं, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती आणि अभ्यास करू इच्छिणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी ह्यांना त्रास झाला म्हणून काय झालं? त्यांनी थोडं सहन केलं तर काय हरकत आहे? समाजाच्या भक्तीमार्गाआड, धर्माआड कसे येऊ शकतात कोणी? आमचे उत्सव साजरे करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. धर्मावर होणारे अत्याचार आम्ही सहन करणार नाही. कांही अस्मिता वगैरे आहे की नाही? हे सणवार संपले तर पदयात्रा आहेत. १२-१२, १५-१५ हजारांच्या संख्येने सहभागी होऊन दोनअडिचशे किलोमिटर्सच्या पदयात्रा करायच्या. रस्त्यावरच्या वाहनचालकांना त्रास, जिथे जिथे म्हणून विश्रांतीचे पडाव असतील तिथे तिथे खाण्यापिण्याच्या वस्तूंचा, प्लॅस्टिकच्या पेल्यांचा कचरा, त्या त्या गावच्या नदी काठी एव्हढ्या मोठ्या संख्येने आघोळी, मल-मूत्र विसर्जन करून तिथली स्वच्छ नदी प्रदुषित करायची. त्या गावात कोणी त्या नदीचे पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी वापरत असेल. तान्ह्या बाळांना पाजत असेल. असेना का. मला पदयात्रेचे पुण्य मिळतय नं, मग झालं तर. मी तर दरवर्षी जातो. भरपूर पुण्य, मनःशांती, आत्मबळ वगैरे वगैरे कमवितो.

पाप म्हणजे काय? पुण्य म्हणजे काय? हे प्रश्न आपण स्वतःच स्वतःला विचारले पाहिजेत. त्याचे उत्तर शोधले पाहिजे. 'वैष्णव जन तो तेणें कहिए जे पीर पराई जाणे रे' हे आपण का स्विकारू इच्छित नाही? त्यात कसली पिडा? माझी देवावर श्रद्धा आहे आणि जोपासण्याचा मला हक्क आहे. हा 'मी आणि माझ्या' पलीकडे न जाणारा विचारच समाजात दुभंग निर्माण करतो आहे.

देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी

ह्या विचारांमधील गोडवा, सहजता आणि सत्यता का आपल्याला भावत नाही? आपण तसे आचरण का करीत नाही ह्यावर आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे. 'देव भावाचा भुकेला' असे आपण म्हणतो पण तो 'भाव'च हरवून बसलो आहोत हे भीषण सत्य आपण केव्हा स्विकारणार? आपल्यातली ही कमतरता दूर करून, कर्मकांडांपेक्षा मनाने इश्वरचरणी केंव्हा रुजू होणार? फकीराचे जीवन जगलेल्या, लोकांना ज्ञानाचा प्रकाश देणार्‍या साईबाबांना आपण चांदीच्या सिंहासनावर बसवून आणि सोन्याचा मुकुट घालून सामान्य माणसाप्रमाणे ऐहिक सुखाच्या कल्पनांच्या जोखडात अडकवतो आहोत हे आपल्या लक्षातच येत नाही. बुद्धीची देवता गणपती तिलाही आपण सोन्या-रुप्यात तोलतो. सिद्धीविनायकाला सोन्याचा मुलामा दिलेल्या कळसात आपण 'देवालय' शोधतो. देवाचे देवत्व विसरून, विश्वाचे निर्माण करणार्‍या त्या परमात्म्याला, पैसाअडका, सोनं-नाणं देऊन आपापल्या इच्छापूर्तीसाठी माणूस साकडे घालू लागला. ऐहिक उपभोगाची ही साधनं देवाला नको असतात. श्रीमंत देवालयं(?) त्यांच्या कडे जमा होणार्‍या पुंजीतून समाजकार्य करतात ह्यावरही माझा विश्वास नाही. आणि तो नसण्याचं कारण कानावर येणार्‍या देवालयातील भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या. अनेक देवालयांच्या बेहिशोबाच्या कथा पेपरमधून येत असतात. विश्वस्तपदावर वर्णी लागावी म्हणून अनेक राजकारणी धडपडत असतात. हे देवालय तुमचं तर ते देवालय आमचं अशी वाटणी असल्याचेही ऐकले आहे. ते कांही भक्तीभावने भारलेले नसतात.

तुम्हाला समाजकार्यच करायचं असेल तर थेट करा नं. देवालयाच्या मार्फत कशाकरता? हे म्हणजे, एखाद्या भिकार्‍याला थेट पैसे देण्याऐवजी रस्त्याने जाणार्‍या कुणा अनोळखी माणसाला पैसे देऊन सांगायचं, 'तुम्हाला जमेल तेंव्हा एखाद्या भिकार्‍याला हे पैसे द्या.' अशा, समाजकार्याच्या, बेगडी समाधानामागे आपण धावतो आहोत. त्यापेक्षा बाबा आमटेंच्या आश्रमाला पैसे पाठवा, वनवासी फंडात पैसे पाठवा, भाऊबिज फंडात पैसे पाठवा, एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा भार उचला, कुणा गरीब वृद्धाच्या आजारपणात औषधे पुरवा. भरपूर मार्ग आहेत. तुम्ही स्वतः हे करू शकता. पुस्तकं दान करू शकता, तुमचे वापरलेले कपडे, तुम्हाला नको असलेल्या वस्तू गरीबांना दान करू शकता. श्रीमंत देवालयांना आणि त्यांच्या विश्वस्तांना अधिकाधिक श्रीमंत करण्यापलीकडे तुमची मदत पोहोचत नाही. सत्ता आणि त्या पाठोपाठ येणार्‍या पैशाच्या माजातून काळ्या मिळकतीचे असे अनेक मार्ग त्यांनी शोधून काढले आहेत आणि आपण त्यांच्या ह्या कृष्णकृत्याला हातभार लावत आहोत. त्यापेक्षा जो गरजवंत आहे अशाला थेट मदत करा. कपडा, अन्न, धन कसलंही दान करा पण थेट करा. नाहितर तेच होत राहणार भक्तीमार्गातले दलाल श्रीमंत होत राहणार आणि गरजू कायम वंचित राहणार....

जिस दर्गाह की मजार पर सेंकडो चादरे चढती रही है।
उसी दर्गाह का दरबान, सुना है, कल ठंड से मर गया।

हे जीवघेणं सत्यच आपल्या मनाला डाचत नाही तो पर्यंत आपल्यात बदल अशक्य आहे.

मी माझ्या पत्नीसह अनेकदा पुण्यातल्या दशभुजा गणपतीला, भवानी माता मंदिरात जातो. तिचाही कर्मकांडावर जास्त भर असतो. तिलाही मी अनेकदा सांगत असतो पण अजून कांही परिणाम झालेला मला दिसत नाही. दशभुजा गणपती मंदीरात अनेक भक्तगण येत असतात. बाहेरच्या विकलांग, वृद्ध भिकार्‍यांना शिताफीने टाळून मंदिरात जातात. दहा रुपयाचा नारळ, हार फुलं, उदबत्या वगैरे वगैरे तिथल्या पाषाणाच्या मूर्ती समोर ठेवतात. पण बाहेरच्या भिकार्‍यांना दहातले दोनच भक्त चार-आठ आणे देताना दिसतात. बाकीचे सर्व तोंडाने कांही स्तोत्र पुटपुटत भिकार्‍यांना टाळून निघून जातात. धडधाकट भिकार्‍यांना तर मीही मदत करीत नाही. पण जे वृद्ध, विकलांग आहेत त्यांना आवर्जून मदत करतो. त्यांना कांही पैसे, खाणे मिळाले नाही तर ते लवकरच मरून जातील. अर्थात भीक मागणे हा ही एक 'व्यवसाय' होतो आहे. तो विषय वेगळा आहे. राजस्थानातील कांही देवळांमध्ये देवाच्या माथी दूध ओतले जाते. दिवसभरात हजारो लिटर्स दूध वाया जात असते. आणि हे अनेक वर्षे चालू आहे. मला दूरचित्रवाणीवर दिसणारी कुपोषीत बालकांची, छातीच्या पिंजर्‍यावर नुसतेच कातडे ओढून बसविल्यासारखी चित्र डोळ्यासमोर येतात. वाईट वाटतं. चांगली साक्षर माणसं (त्यांना सुशिक्षित म्हणवत नाही) श्रद्धेच्या नांवाखाली अंधश्रद्धा जोपासताना दिसतात. आपल्या समाजाचं हे अंधश्रद्ध चित्र मला फार विचलीत करतं. खरंच, आपण कधीच बदलणार नाही का? आपल्या अंधश्रद्धेवरंच राजकारण्यांचं, व्यापार्‍यांचं, दलालांचं दुकान चालतं आहे. आपल्या अंधश्रद्धेलाच 'श्रद्धे' चं 'भक्तीमार्गाचं' लेबल लावून आपल्या भावना कुरुवाळणं हा त्यांच्या 'दुकानदारी'चाच भाग आहे. आपण सुशिक्षितांनी त्यांच्या ह्या चालीला, खेळीला बळी न पडता वाटचाल करावी, अशिक्षितांना ह्या चक्रव्युहातून ओढून बाहेर काढावं हे आपलं प्रत्येकाचेच राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हंटल्यास गैर होणार नाही.

मी नास्तिक आहे का? मी अश्रद्ध आहे का? ह्या प्रश्नांचे उत्तर मी ठामपणे 'नाही' असे देऊ शकतो. श्रद्धा असावी. इश्वराचे अस्तित्व स्विकारणे किंवा नाकारणे हा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. मी त्याचा नक्कीच आदर करतो. पण कर्मकांडांचा अतिरेक नसावा. प्रत्येक कृती ही मनःचक्षु उघडे ठेवून करावी. प्रत्येक गोष्ट तार्किक कसोटीवर पडताळून पाहावी. आपली ईश्वरसेवा आपल्या घरापुरतीच बंदिस्त असावी. बाकी जमेल तशी समाजसेवा करावी.
मुंबईत साजर्‍या होणार्‍या आंबेडकर जयंतीला आपण, 'आंबेडकरी' जनता शहरात घाण कचरा पसरवते म्हणून नांवे ठेवतो आणि आषाढीला वारीला मात्र न चुकता हजेरी लावतो. मुसलमानांच्या रस्त्यावरच्या नमाजाला, ध्वनीक्षेपकांना विरोध करतो पण गणेशोत्सव, नवरात्र, जन्माष्टमी आदी मोठ्या हिरीरीने उत्सवात साजरे करतो. आपल्या पदयात्रांप्रमाणे इतर सर्व धर्मियांनी, जाती-जमातींनी त्यांच्या त्यांच्या चालीरिती पाळायच्या ठरवल्या तर आपल्या देशात एव्हढे विविध धर्म, जाती, जमाती आहेत की वर्षभर रस्त्यांवर फक्त पदयात्रा करणारेच दिसतील. रस्ते, महामार्ग वाहनांसाठी बंद करावे लागतील. की इतरांनी त्यांच्या धर्माचे, चालीरितींचे पालन करू नये? ही मुभा फक्त माझ्याच धर्माला असावी का? शिर्डीच्या वाटेवर कफनी, चिमटा, चिलिम बाळगणारे सर्वच साईबाबा असतात का? उत्तरेत तर अनेक साधूंच्या जथ्थ्यात कित्येक गुन्हेगार, गांजेकस, भोंदू माणसांचा भरणा असतो. कोणावर विश्वास ठेवावा? मला वाटतं फक्त स्वतःवर ठेवावा, स्वतःच्या विचारशक्तीवर ठेवावा.

माझं एव्हढंच म्हणणं आहे श्रद्धा जरूर बाळगा, भक्तीमार्गावर वाटचाल करा पण कर्मकांडांचा अतिरेक करू नका. तुमच्या भक्तीभावनेचा कोणी गैरफायदा घेईल, इतरांना थेट किंवा अप्रत्यक्ष त्रास होईल असे वागू नका. भक्तीमार्गावरील हे सर्व काटेकुटे टाळून मार्गक्रमणा करा. देवाला कुठे बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात त्याची स्थापना करा. चराचरात ईश्वर आहे. त्याचा सन्मान करा. तुम्ही उपासतापास, साधना, नैवेद्य, देवालयांना दान नाही केले तरी तुम्हाला देवाच्या मनांत स्थान प्राप्त होईल. देव भावाचा भुकेला आहे. पैशांचा नाही.

-oOo-