यापूर्वीचे लेखन
भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक
भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान
भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ
सुरवातीला महाराष्ट्रात २००९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काय झाले हे बघू.
table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}
महाराष्ट्रलोकसभाविधानसभा २००९ लोकसभा२००९ लोकसभा२००९ विधानसभा
मते %मते %मतांमधील फरकलोकसभा जागाविधानसभा जागा आघाडीविधानसभा जागा
कॉंग्रेस१९.६%२१.०%१.४%१७७९८२
राष्ट्रवादी१९.३%१६.४%-२.९%८५२६२
रिपब्लिकन पक्ष (आठवले)१.३%०.९%-०.४%०१
भाजप१८.२%१४.०%-४.२%९६१४६
शिवसेना१७.०%१६.३%-०.७%११६१४४
मनसे४.१%५.७%१.६% ८१३
बसपा४.८%२.४%-२.४%
बहुजन विकास आघाडी०.६%०.५%-०.१%१३२
स्वाभीमानी पक्ष१.३%०.८%-०.५%१४१
इतर१३.८%२२.८%९.०%११९३८
लोकसभा निवडणुकांमध्ये ’इतरांना’ २८८ पैकी तब्बल १९ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली.यापैकी कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलीक यांना ४ विधानसभा मतदारसंघातून तर सांगलीमधील अपक्ष उमेदवार अजित घोरपडे यांना ३ विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली.वेरूळचे स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी औरंगाबादमधून अपक्ष म्हणून निवडणुक लढवून दोन विधानसभा मतदारसंघांमधून आघाडी घेऊन आश्चर्याचा धक्का दिला. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की २००९ मध्ये महाराष्ट्रातील परिस्थिती बऱ्यापैकी गुंतागुंतीची होती.
२००९ मध्ये देशभर युपीएसाठी अनुकूल वातावरण असतानाही महाराष्ट्रातील कौल मात्र त्याविरूध्द होता असे म्हणायला हरकत नाही. युपीए ने ज्या २५ जागा जिंकल्या त्यापैकी ८ जागा (मुंबईतील उत्तर मध्य मुंबई सोडून अन्य पाच, ठाणे, भिवंडी, पुणे आणि नाशिक) मनसेने शिवसेना-भाजपची मते फोडल्यामुळे जिंकल्या होत्या. यावेळी शिवसेना-भाजप बरोबरच रिपब्लिकन पक्ष, राजू शेट्टींचा स्वाभीमानी पक्ष तसेच महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष अशी पाच पक्षांची महायुती आहे. यापैकी रिपब्लिकन पक्ष मुंबई आणि विदर्भात तर स्वाभीमानी पक्ष आणि काही प्रमाणात राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्रात युतीसाठी फायदेशीर ठरू शकतो. केंद्रातील युपीएसरकारच्या गेल्या दहा वर्षातील (विशेषत: गेल्या पाच वर्षातील) कारभाराविरूध्द आणि महाराष्ट्रातील गेल्या १५ वर्षातील प्रस्थापित सत्तेमुळे राज्यातील जनमत यावेळी युपीए विरूध्द जाईल असे गृहितक आहे. याची सुरवात २००९ मध्येच झाली होती पण त्यावेळी मनसेमुळे युपीए तरली.
आम आदमी पक्षाचा परिणाम
आता यावेळी परिस्थिती कशी असेल याविषयीचा माझा अंदाज व्यक्त करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे. राज्यात आम आदमी पक्षाने उमेदवार उभे केले आहेत त्याचा कितपत परिणाम होईल? जेव्हा निवडणुकीत बऱ्यापैकी नाव आणि सामर्थ्य असलेला नवखा पक्ष येतो तेव्हा पहिल्यांदा तो फ्लोटिंग मते खातो. ही फ्लोटिंग मतांना धक्का पोहोचवल्यानंतर तो ताकदवान असेल तर प्रस्थापित पक्षांना धक्का पोहोचवतो. आता ही फ्लोटिंग मते म्हणजे नक्की काय? ज्या पक्षांचे सामर्थ्य लोकसभेची जागा जिंकता येईल इतके नसते तरीही स्थानिक पातळीवर उमेदवारांच्या सामर्थ्यावर किंवा अन्य कारणाने हे पक्ष बऱ्यापैकी मते घेतात यांना मिळालेली मते मी फ्लोटिंग मते म्हणून धरतो. उदाहरणार्थ बहुजन समाज पक्षाला विदर्भात २००९ मध्ये विविध मतदारसंघांमध्ये १० ते १७% मते मिळाली होती. तर मनसेला मुंबईत २०% च्या आसपास तर नाशिकमध्ये ३३% पर्यंत मते मिळाली होती. तसेच महाराष्ट्रात इतरांना २००९ मध्ये तब्बल १३.८% मते मिळाली होती. अशा फ्लोटिंग मतांवर आम आदमी पक्षासारख्या नव्या पक्षाचा हल्ला होईल.यापैकी मनसेची मते सगळ्या मतदारसंघांमध्ये ’फ्लोटिंग’ नक्कीच नाहीत.अशा पक्षाने एखादा तगडा उमेदवार दिल्यास तो उमेदवार लोकसभेची जागा जिंकू शकतो पण अन्यत्र अशी मते नव्या पक्षाकडे काही प्रमाणात जातील ही शक्यता जास्त.
नवा पक्ष पहिल्यांदा फ्लोटिंग मते घेतो आणि नंतरच प्रस्थापित पक्षांच्या मतांना धक्का पोहोचवतो याविषयी या लेखमालेच्या पहिल्या लेखावरील एका प्रतिसादात गुजरात-१९९८ आणि दिल्ली-२०१३ च्या निवडणुकांची आकडेवारी देऊन स्पष्ट केले आहे.
१. मुंबई (६ जागा)
मुंबई उत्तर: या मतदारसंघात भाजपकडून गोपाळ शेट्टी तर कॉंग्रेसकडून संजय निरूपम उमेदवार आहेत. आआपकडून सतीश जैन आहेत. मागच्या वेळी मनसेने मते खाल्ल्यामुळे कॉंग्रेसला ही जागा जिंकता आली.यावेळी मनसे रिंगणात नाही.तसेच गोपाळ शेट्टी हे भाजपचे स्थानिक उमेदवार आहेत.तसेच नरेंद्र मोदींमुळे बोरिवली-मागाठाणे मधील बरीचशी गुजराती मते भाजपला मिळतील असे वाटते.सतीश जैन यांनी वीजघोटाळा बाहेर आणण्यात महत्वाचे काम केले असले तरी ते मेधा पाटकर किंवा मीरा सन्याल यांच्यासारखे ’हाय प्रोफाईल’ उमेदवार नाहीत.तसेच आआपने मोदींना लक्ष्य बनविल्यामुळे त्याचा फटका पक्षाला गुजराती मते दूर जाऊन नक्कीच बसेल असे वाटते. तेव्हा मुंबई उत्तर मधून भाजप जिंकेल हा अंदाज.
मुंबई उत्तर पश्चिम: या मतदारसंघात शिवसेनेकडून गजानन किर्तीकर, कॉंग्रेसकडून गुरूदास कामत, आआपकडून मायांक गांधी तर मनसेकडून महेश मांजरेकर उमेदवार आहेत. या मतदारसंघात २००९ मध्ये सुमारे ३०% फ्लोटिंग मते होती (अबू आझमी:समाजवादी पक्ष: १२% मते, शालीनी ठाकरे: मनसे: १७.५%).यावेळी समाजवादी पक्षाचा उमेदवार नाही. तेव्हा ती १२% मते आआप, कॉंग्रेस आणि काही प्रमाणावर शिवसेना यात विभागली जातील. कॉंग्रेसचे गुरूदास कामत मुळातले या मतदारसंघातले नाहीत.ते मुंबई उत्तर-पूर्वमधून निवडून येत.याउलट गजानन किर्तीकर मालाडमधून विधानसभेवर निवडून जात.कॉंग्रेसला मुळातच प्रस्थापितविरोधी मतांचा सामना करावा लागत आहे त्यात हा मुद्दा फार सुखावह नक्कीच नाही.मनसेने महेश मांजरेकर हे अराजकीय उमेदवार दिले आहेत. २००९ चा अनुभव लक्षात घेता मतविभागणी होऊन कॉंग्रेस निवडून यायला नको या उद्देशाने आणि विशेषत: नंतर मोदींना पाठिंबा द्यायचे राज ठाकरेंनी जाहिर केले आहे या पार्श्वभूमीवर मांजरेकर मागच्या वेळी शालिनी ठाकरेंनी घेतली होती तितकी मते नक्कीच घेणार नाहीत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना जिंकेल हा अंदाज. कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिल तर तिसऱ्या क्रमांकासाठी मनसे आणि आआपमध्ये चुरस असेल हा अंदाज.
मुंबई उत्तर पूर्व: या मतदारसंघात भाजपकडून किरीट सोमय्या, राष्ट्रवादीकडून संजय पाटील तर आआपकडून मेधा पाटकर उमेदवार आहेत.मनसेचा उमेदवार नाही याचा फायदा भाजपला होईल.तसेच मुलुंड-घाटकोपर मधली गुजराती मते मोठ्या प्रमाणावर सोमय्यांना मिळतील.मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाओ आंदोलनामुळे एकूणच गुजराती समाजात त्यांच्याविषयीचे मत फार चांगले नाही.त्यामुळे त्या स्वत: रिंगणात असल्यामुळे गुजराती मते अधिक प्रमाणावर किरीट सोमय्यांकडे वळतील. या मतदारसंघात मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी रहिवासी आहेत.रिपब्लिकन पक्ष युतीबरोबर आहे आणि मेधा पाटकर यांनी झोपडपट्टी रहिवाशांसाठी केलेल्या चळवळी लक्षात घेता या भागातून मते आआप आणि भाजप यांच्यात मुख्यत्वे विभागली जातील.मुंबई उत्तर पूर्व मधून भाजप नक्की.दुसऱ्या क्रमांकावर मेधा पाटकर येणार की संजय पाटील हेच बघायचे.
मुंबई उत्तर मध्य: या मतदारसंघात भाजपकडून पूनम महाजन, कॉंग्रेसकडून प्रिया दत्त, समाजवादी पक्षाकडून फरहान आझमी तर आआपकडून नानी पालखीवालांचे चिरंजीव फिरोझ पालखीवाला उमेदवार आहेत.हा मतदारसंघ कॉंग्रेससाठी सुरक्षित आहे. या मतदारसंघात भाजपकडे चांगला उमेदवार नाही.पूनम महाजन हा काही भाजपचा फार लोकप्रिय चेहरा आहे असे नाही.आमदार पराग आळवणींना उमेदवारी दिली असती तर त्यांनी थोडी चांगली लढत दिली असती असे वाटते.त्यातून पुनर्रचना झाल्यानंतर या मतदारसंघात कुर्ला आणि कलीना विधानसभा मतदारसंघही आले आहेत.तिथल्या झोपडपट्टीतील काही मते रिपब्लिकन पक्षामुळे पूनम महाजनांना मिळतीलही.पार्ल्यामधूनही त्यांना आघाडी मिळायला हरकत नसावी.तरीही कुर्ला-कलीना,बांद्रा पूर्व आणि पश्चिम येथून मते घेऊन प्रिया दत्त यांना जिंकण्यास फार अडचण येऊ नये. काही प्रमाणात समाजवादी पक्षही मते घेईल पण ती प्रिया दत्त यांना डोकेदुखी निर्माण करतील असे वाटत नाही. आआपने इथून बराच कमजोर उमेदवार दिला आहे.त्याचा फार फरक पडू नये. तेव्हा मुंबई उत्तर मध्य मधून कॉंग्रेस हा अंदाज
मुंबई दक्षिण मध्य: या मतदारसंघात शिवसेनेकडून राहुल शेवाळे, कॉंग्रेसकडून एकनाथ गायकवाड तर मनसेकडून आदित्य शिरोडकर उमेदवार आहेत.२००९ मध्ये मनसेच्या श्वेता परूळेकर यांनी मते खाल्ल्यामुळे एकनाथ गायकवाड जिंकले होते.या मतदारसंघात धारावी,सायन-कोळीवाडा आणि अणुशक्तीनगरमध्ये कॉंग्रेसला आघाडी मिळायला हरकत नसावी. माहिम आणि वडाळा या भागातून शिवसेना आघाडीवर असेल असा अंदाज.चेंबूरमध्ये मागच्या वेळी मनसेने बरीच मते घेतली होती.यावेळी रिपब्लिकन पक्ष युतीबरोबर असल्यामुळे ती मते शिवसेनेकडे जायला हरकत नसावी.या मतदारसंघात मुंबईतील सर्वात चुरशीची निवडणुक होईल असे वाटते. तरीही मनसेने मते खाल्ल्यामुळे शेवटी कॉंग्रेस जिंकेल असे वाटते. तेव्हा मुंबई दक्षिण मध्य मधून कॉंग्रेस हा अंदाज
मुंबई दक्षिण: या मतदारसंघात शिवसेनेकडून अरविंद सावंत, कॉंग्रेसकडून मिलिंद देवरा, मनसेकडून बाळा नांदगावकर तर आआपकडून मीरा सन्याल उमेदवार आहेत.२००९ मध्ये भायखळा आणि मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद देवरांना मोठी आघाडी मिळाली होती.मुंबादेवी मतदारसंघात पुनर्रचनेनंतर नागपाडा आणि आजूबाजूचा अल्पसंख्यांक विभाग सामील झाला आहे.अल्पसंख्याकांमधील आआपची लोकप्रियता लक्षात घेता या मतदारसंघात आआप कॉंग्रेससाठी डोकेदुखी ठरणार असे वाटते.२००९ मध्ये मिलिंद देवरांना मलबार हिल आणि कुलाबामधूनही आघाडी होती. या भागातून मीरा सन्याल यांची पार्श्वभूमी लक्षात घेता त्या काही प्रमाणावर मते नक्कीच घेतील असे वाटते.बाकी शिवडी-परळ,वरळी येथून नांदगावकरांना आघाडी मिळायला हरकत नसावी.यावेळी शिवसेनेकडून अरविंद सावंत हा मोहन रावलेंपेक्षा कमी परिचित चेहरा आहे तर मनसेचे मुंबईतील आघाडीच्या नेत्यांपैकी एक बाळा नांदगावकर उमेदवार आहेत.यामुळे शिवसेनेकडून मते काही प्रमाणात मनसेकडे जातील असे वाटते.त्यातून आआप कॉंग्रेसची मते फोडायची शक्यता आहे. त्यातून मुंबई दक्षिणमधून मनसे जिंकेल हा अंदाज
२. मुंबई परिसर आणि कोकण (६ जागा)
ठाणे: या मतदारसंघात शिवसेनेकडून राजन विचारे, राष्ट्रवादीकडून संजीव नाईक, मनसेकडून अभिजीत पानसे तर आआपकडून संजीव साने उमेदवार आहेत. या मतदारसंघात ऐरोली आणि बेलापूरमधून राष्ट्रवादीला आघाडी मिळायला काहीच हरकत नसावी. २००९ मध्ये ठाणे शहरातून शिवसेना पहिल्या क्रमांकावर तर मनसे दुसऱ्या क्रमांकावर होती.शिवसेनेला निसटती आघाडी मिळाली होती. २००९ मध्ये शिवसेना उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा फटका पक्षाला बसला.यावेळी राजन विचारे हा परिचित चेहरा शिवसेनेने दिला आहे.त्याचा फायदा शिवसेनेला व्हायला हवा.तेव्हा ठाणे शहर आणि कोपरी-पाचपाखाडीमधून शिवसेनेला चांगली आघाडी मिळेल असे वाटते.ओवळा-माजीवडा मतदारसंघात २००९ मध्ये मनसेने मते फोडल्यामुळे राष्ट्रवादीला आघाडी मिळाली होती.यावेळी मनसेने शिवसेनेतून आयत्या वेळी आलेल्या अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे.२००९ चा अनुभव लक्षात घेता कॉंग्रेसविरोधी मते शिवसेनेकडे जास्त प्रमाणावर जातील हे गृहित धरतो त्यामुळे ओवळा-माजीवाडा आणि मीरा-भाईंदरमधून शिवसेनेला आघाडी मिळेल असे वाटते.तेव्हा ठाण्यातून शिवसेना हा अंदाज
कल्याण: या मतदारसंघात शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे तर मनसेकडून प्रमोद पाटील उमेदवार आहेत.२००९ मध्ये कळवा-मुंब्रा येथे राष्ट्रवादीला आघाडी चांगली मिळाली होती.यावेळी काही प्रमाणावर अल्पसंख्यांकांची मते आआपकडे जातील.तसेच २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून वसंत डावखरे उमेदवार होते.ते त्या भागात नक्कीच लोकप्रिय आहेत.पण ती लोकप्रियता आनंद परांजपे यांची नक्कीच नाही.कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथमधून शिवसेनेला आघाडी नक्की. त्या आघाडीच्या जोरावर श्रीकांत शिंदे जिंकतील असे वाटते. तेव्हा कल्याणमधून शिवसेना हा अंदाज
भिवंडी: या मतदारसंघात कॉंग्रेसकडून विश्वनाथ पाटील, राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले कपिल पाटील भाजपचे उमेदवार म्हणून, आआपकडून जलालुद्दिन अन्सारी तर मनसेकडून सुरेश म्हात्रे रिंगणात आहेत. २००९ मध्ये विश्वनाथ पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली होती आणि भिवंडी (ग्रामीण) आणि शाहपूर मधून आघाडी मिळवली होती.यावेळी ते कॉंग्रेसचे उमेदवार आहेत.भाजपकडे स्वत:चा उमेदवार नव्हता अशी परिस्थिती आहे.त्यामुळे आयात केलेल्या उमेदवाराला तिकिट द्यावे लागले.भाजपला कल्याण (पश्चिम) मध्ये संधी नक्कीच आहे पण तिथे मनसे उमेदवार किती मते फोडतो यावर बरेच काही अवलंबून आहे. आआप भिवंडी शहरातील दोन विधानसभा मतदारसंघातून काही प्रमाणावर अल्पसंख्याकांची मते घेईल पण ती कॉंग्रेसला डोकेदुखी निर्माण करतील इतक्या प्रमाणावर असतील असे वाटत नाही. तेव्हा भिवंडीमधून कॉंग्रेस हा अंदाज
रायगड: या मतदारसंघात शिवसेनेकडून अनंत गीते, राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे तर शेकापकडून भाई कदम उमेदवार आहेत. २००९ मध्ये शिवसेना आणि शेकापची युती होती.त्याचा फायदा शिवसेनेला झाला.यावेळी शेकापने स्वत:चा उमेदवार उभा केला आहे तेव्हा शिवसेनेला त्याचा फटका बसेल. राष्ट्रवादीकडून मंत्री सुनील तटकरे उमेदवार आहेत याचा काही प्रमाणात त्यांना फटका बसेल असे वाटते.राष्ट्रवादीचा मंत्री (आणि तो पण भुजबळांसारखा तगडा नाही) हा एक मायनस पॉईंट नक्कीच आहे.तेव्हा शेकाप नुसती शिवसेनेचीच नाही तर राष्ट्रवादीचीही मते खाईल.शिवसेनेला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागरमधून आघाडी मिळायला हरकत नसावी.या मतदारसंघाविषयीचा माझा अंदाज असा की शिवसेना जिंकेल आणि दुसऱ्या क्रमांकासाठी शेकाप आणि राष्ट्रवादी यांच्यात लढत होईल.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग: हा मतदारसंघ इंटरेस्टिंग आहे.या मतदारसंघातून शिवसेनेकडून विनायक राऊत तर कॉंग्रेसकडून नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश राणे उमेदवार आहेत. २००९ मध्ये नीलेश राणे यांनी सुरेश प्रभूंचा ७% ने पराभव केला होता. नीलेश राणे यांनी कणकवली आणि कुडाळमधून चांगली आघाडी घेतली आणि त्या जोरावर ते निवडून आले.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि रत्नागिरी मध्ये नीलेश राणे यांना ५% पेक्षा कमी आघाडी होती तर राजापूरमधून सुरेश प्रभूंना निसटती आघाडी होती. सावंतवाडीमध्ये नीलेश राणे यांना २% पेक्षा कमी आघाडी होती.यावेळी राजापूर, रत्नागिरी, चिपळूण आणि सावंतवाडीमध्ये शिवसेनेला आघाडी मिळाली तर मला फारसे आश्चर्य वाटणार नाही. नारायण राणेंचा बालेकिल्ला कणकवली आणि कुडाळमध्ये नीलेश राणे किती आघाडी घेतात यावर निकाल ठरेल.त्यात नीलेश राणेंची डोकेदुखी वाढवायला राष्ट्रवादी त्यांना मनापासून साथ देत आहे असे चित्र नाही.या मतदारसंघात नारायण राणेंना धक्का देत शिवसेना विजयी होईल असे मला वाटते.
पालघर: या मतदारसंघात भाजपकडून चिंतामण वनगा, बहुजन विकास आघाडीकरून बळीराम जाधव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून लडक्या खर्पडे तर आआपकडून पांडुरंग पारधी हे उमेदवार आहेत.आपण जिंकू शकणार नाही असे गृहित धरून कॉंग्रेसने आपला उमेदवार (राजेन्द्र गावीत) मागे घेतला आणि बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.वास्तविकपणे हा निर्णय काहीसा आश्चर्यकारक आहे.या भागातून कॉंग्रेसचे दामू शिंगडा, राष्ट्रवादीचे शंकर नम हे नेते असतानाही आपण निवडून येणार नाही म्हणून आधीच शस्त्रे म्यान करणे अनाकलनीय आहे. २००९ मध्ये भाजपच्या चिंतामण वनगांचा १२ हजार मतांनी पराभव झाला होता.भाजपला विक्रमगड आणि पालघरमधून आघाडी होती, बहुजन विकास आघाडीला वसई, नालासोपारा आणि बोईसरमधून आघाडी होती तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला डहाणूमधून आघाडी होती. कॉंग्रेसने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहिर केला म्हणून सगळी कॉंग्रेसची मते त्या आघाडीला जातील असे नक्कीच नाही.विशेषत: हितेन्द्र ठाकूर या फारसा चांगला चेहरा नसलेला बविआचा नेता असताना.त्यातील बरीच मते भाजपकडे वळतील असे वाटते.मुंबईच्या इतर भागात भाजप-सेना युतीला अनुकूल वातावरण लक्षात घेता विशेषत: वसई-विरार आणि नालासोपारा या मुंबईचाच भाग बनलेल्या भागातून बहुजन विकास आघाडीला निवडणुक २००९ इतकी सोपी जाऊ नये. २००९ मध्ये बळीराम जाधव यांना नालासोपारामधून ३० हजारांची तर वसई आणि बोईसरमधून ६ हजारांची आघाडी मिळाली होती.यात वसईमध्ये बळीराम जाधव यांना बऱ्यापैकी आघाडी नक्कीच मिळेल. नालासोपारामध्ये भाजप नक्कीच कडवी लढत देईल. विक्रमगड आणि पालघरमध्येही वनगांना आघाडी मिळायला कठिण जाऊ नये. डहाणूमध्ये कम्युनिस्टांचा जोर असतो. तिथे बविआ त्यामानाने कमजोर आहे.तेव्हा डहाणूमध्ये कम्युनिस्ट आणि भाजप यांच्यात कडवी लढत होईल असे वाटते.या सगळ्यांचा परिणाम म्हणून या मतदारसंघात बरीच चुरशीची निवडणुक होईल असे वाटते.२००९ मध्ये वनगा थोडक्यात हरले होते.यावेळी ते थोडक्यात जिंकतील असे वाटते.त्यातून वसई आणि नालासोपारामध्ये भाजपला मला वाटते तितकी मते मिळाली नाहीत तर बहुजन आघाडी नाहीतर भाजप अशी परिस्थिती असेल. तेव्हा सध्याचा अंदाज पालघरमधून भाजप.