मागोवा लोकसभा निवडणुकांचा..१ पहिल्या लोकसभा निवडणुकीचे आव्हान
भारतात लोकशाही पद्धतीने निवडणुका आयोजित करणे किती आव्हानात्मक होते हे आपण पाहिले. त्यामुळेच जानेवारी फेब्रुवारी १९५१ मध्ये या निवडणुकांची रंगीत तालीम घेण्यात आली. त्यावरून निवडणुक आयोगाला एकूणच प्रक्रियेबाबत आणखी किती तयारी करावी लागेल हे समजून आले.

९ फेब्रुवारी, १९५१ 'मॉक ईलेक्शन' मध्ये मतपेट्याच्या व्यवस्थेची पहाणी करतांना तत्कालीन निवडणुक आयुक्त.
अखेर पहिल्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ या दरम्यान म्हणजेच जवळ जवळ चार महिने ही प्रक्रीया चालू होती. पुढे निवडणुकांचा कार्यक्रम १९ दिवसांपर्यंत करण्यात आला. परंतु एकाच दिवसांत संपूर्ण देशांत निवडणूक प्रक्रीया राबवणे अनेक कारणांमुळे अशक्य होते. १९५१ मध्ये ३१४ मतदार संघांमधून एक, ८६ मतदार संघांमधून दोन तर एका मतदार संघा मधून तीन खासदार निवडण्यात आले होते. अशा प्रकारे २६ राज्यांतून ४८९ प्रतिनिधींची निवड करण्यात येणार होती.

जनसंघाचा प्रचार (दिल्ली, जानेवरी, १९५२)

कॉगेस पक्षाचा प्रचार (दिल्ली, जानेवारी १९५२)
या निवडणुकीत सर्वात महत्वाचा पक्ष अर्थातच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष हाच होता. मात्र पहिली निवडणुक असली तरी निवडणुक लढवणारे पक्ष आणि उमेदवार यांची मात्र अजिबात कमतरता नव्हती. नेहरुंच्याच हंगामी सरकार मधील दोन सहका-यांनी दोन वेगवेगळ्या पक्षांची स्थापना केली होती. निवडणुकांच्या अगदी काही दिवस आधी म्हणजेच ऑक्टोबर १९५१ मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली. बाबासाहेब आंबेडकरांनी 'शेड्युल्ड कास्ट फेडरेशन'ची स्थापना केली. या व्यतिरीक्त १४ राष्ट्रिय पक्षांचे १२१७, राज्य पातळीवरील पक्षांचे १२४ आणि अपक्ष ५३३ असे १८७४ उमेदवार या निवडणुकीत आपले नशिब अजमावत होते. राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांचा समाजवादी पक्ष, आचार्य कृपलानी यांचा 'किसान मजदूर प्रजा परिषद, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, असे प्रमुख पक्ष निवडणुकांच्या रिंगणात होते. मात्र या सर्वच पक्षांना आपल्या तुटपुंज्या ताकदीची कल्पना होती. भारतात होणा-या सार्वजनिक निवडणुका हेच मोठे अप्रूप असल्यामुळे इतर मुद्देही यावेळी फारसे महत्वपूर्ण नव्हते.
पं. नेहरुंनी निवडणुक प्रचारासाठी संपूर्ण भारतात झंझावती दौरा केला याकाळात त्यांनी सुमारे ४०,००० कि.मी. प्रवास करून साडेतीन कोटी लोकांपुढे भाषणे केली. त्यावेळच्या मर्यादीत प्रवास साधनांत एवढा प्रवास ही विशेष बाब होती.

मालेरकोट्ला येथील प्रचार सभा आटोपून व्यासपीठावरून उतरतांना पं. नेहरु

निवडणुक प्रचार यात्रा:जयपूर

श्यामाप्रसाद मुखर्जी यांची प्रचारसभा
या निवडणुकीत ४५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेस पक्षाला ३६४ ठिकाणी विजय संपादून सत्ता मिळाली. 37 अपक्ष, १६ कम्युनिस्ट, ९ टिकाणी किसान मजदूर पक्ष ७ शिरोमणी अकाली दल तर जनसंघाला ३ जागा मिळाल्या. एकुण मतदानाच्या ७५% मते कॉंग्रेस पक्षाला मिळाली. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबईतून फारश्या प्रसिध्द नसणा-या काजरोळकर नांवाच्या उमेदवाराकडून पराभव, हा या निवडणुकीतील धक्कादायक निकाल होता.

मतदानासाठीच्या रांगा: मुंबई

आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे चिन्ह शोधणारा मतदार!
१७ एप्रिलला पहिली लोकसभा अधिकृतपणे अस्तित्वात आली आणि पहिले सभापती झाले ते गणेश वासुदेव मावळणकर ते त्यावेळच्या मुंबई राज्यातल्या अहमदाबाद (सध्याच्या गुजरात) मधून निवडुन आले होते.या लोकसभेने आपला पांच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला.
-छायाचित्रे आंतरजालावरुन साभार
-क्रमशः